मोदी यांच्या लोकप्रियतेला ओहोटी

Homeसंपादकीयदखल

मोदी यांच्या लोकप्रियतेला ओहोटी

निसर्गाचा एक नियम असतो, तोच माणसांना, व्यक्तींना लागू होतो. समुद्राला जशी भरती येते, तशीच भरतीनंतर ओहोटी येते. लोकप्रियतेचंही तसंच असतं.

..तर, ‘लोकमंथन’ समाजासमोर ‘त्यांना’ नागवे केल्याशिवाय राहणार नाही!
सामाजिक ‘बेस’शिवाय राजकीय सत्ता नाही !
’समाज’ नष्ट होतोय का ?

निसर्गाचा एक नियम असतो, तोच माणसांना, व्यक्तींना लागू होतो. समुद्राला जशी भरती येते, तशीच भरतीनंतर ओहोटी येते. लोकप्रियतेचंही तसंच असतं. कधी ती शिखरावर असते, तर कधी तिची घसरण सुरू होते. राजकीय नेत्यांच्या बाबतीत तर भरती-ओहोटीचं चक्र सातत्यानं सुरू असतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचयाबाबतीतही ते सुरू झालं आहे. जगातील अनेक लोकप्रिय नेत्यांनाही कधी ना कधी त्यांची लोकप्रियता घटल्याचा अनुभव आला आहे. इंदिरा गांधी 1972 ला लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या. 

     आणीबाणीनंतर त्यांची लोकप्रियता घटली आणि त्यांचं सरकार कोसळलं. दक्षिणेत तर करुणानिधी, जयललिता यांना त्याचा वारंवार अनुभव आला आहे. गेल्या सात वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत सातत्यानं वाढ होत गेली. लोकसभेच्या दोन निवडणुकांत त्यांनी भाजपला यश मिळवून दिलं. वेगवेगळ्या राज्यांतही भाजपची सरकारं आली. आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधानानं एवढ्या सभा घेतल्या नसतील, तेवढया सभा त्यांनी घेतल्या. निवडणुकीतील यश जसं लोकप्रियता वाढवीत असते, तसंच जागतिक राजकारणात सातत्यानं चर्चेत राहणंही आवश्यक असतं. मोदी यांना ती कला चांगलीच जमली होती. मोदी यांची एक जागतिक प्रतिमा तयार झाली होती. देशातील सर्वशक्तीमान नेता, कोणत्याही गंभीर संकटांतून देशाला सावरू शकेल असा लोकप्रिय नेता अशी त्यांची प्रतिमा तयार झाली होती. जगभर त्यांचे अनेक चाहते तयार झाले. समाजमाध्यमांत त्यांना कोट्यवधी फॉलोअर्स होते. मोदी यांच्याविरोधात कुणी टीका केली, तर हे फॉलोअर्स त्यांच्यावर तुटून पडत. जल्पकांच्या फौजा त्यांच्या पदरी होत्या. कोणत्याही घटनेचा इव्हेंट करण्यात मोदी यांचा हात कुणीच धरू शकत नव्हता. नोटाबंदी, जीएसटी, टाळेबंदीसारखे अतार्किक निर्णय घेऊनही त्यांच्या प्रतिमेवर काहीच परिणाम झाला नव्हता. त्यांचं कारण मोदी यांच्याविरोधातील नाराजी कॅश करण्यात विरोधकांना सातत्यानं अपयश येतं. काँग्रेस अजूनही पूर्वपुण्याईवर जगते आहे. विरोधकांत एकवाक्यता नाही. दिशाहीन विरोधक आणि भाजपत मोदी यांचं एकमुखी नेतृत्व यामुळंही मोदी यांच्यासमोर टिकणारं एकही लोकप्रिय नेतृत्व नाही. कोरोनाच्या हाताळणीत मोदी यांच्या सरकारला आलेलं अपयश आणि दुसर्‍या लाटेचा इशारा मिळूनही त्याकडं सरकारनं केलेलं दुर्लक्ष आता मोदी यांना भोवतं आहे. कोरोनाच्या हाताळणीत अपयश आलेले मोदी हे एकमेव नेते नसले, तरी आता त्यांच्याच अपयशाची जास्त चर्चा होत आहे. ब्राझील, अमेरिका, मेक्सिकोसारख्या देशाच्या नेतृत्वांना कोरोनाच्या हाताळणीच्या अपयशाचे परिणाम भोगावे लागले आहेत. मोदी ही त्याला अपवाद नाहीत. कोरोना संसर्गाची दुसरी लाट रोखण्यात आलेल्या अपयशाने मोदी यांच्यासारख्या ताकदवान नेत्याच्या गुणांकनात घट झाली असल्याचं दोन सर्वेक्षणांतून स्पष्ट झालं आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 मध्ये दणदणीत बहुमतासह सरकार सत्तेत आलं. 2019 मध्येही मोदी यांच्या करिष्म्यानं जादू केली आणि त्यांचंच सरकार पुन्हा निवडून आलं. या दोन विजयांमुळं देशातील सगळ्यांत मोठे नेते अशी मोदी यांची प्रतिमा तयार झाली; मात्र कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा फटका भारतीयांना मोठ्या प्रमाणावर बसला. कोरोना रुग्णांच्या संख्येनं अडीच कोटींचा आकडा ओलांडला आहे. या लाटेत सरकारचं अपयश ठळकपणे उघड झालं. या लाटेला सामोरं जाण्यासाठी मोदी सरकारनं पुरेशी तयारी केली नव्हती, हे भारतातील साथरोगतज्ज्ञांनी अधोरेखित केलं. जागतिक पातळीवरच्या दैनिकांतून तसे लेख प्रसिद्ध झाले. विज्ञानविषयक नियतकालिकांनीही मोदी यांच्यावर ठपका ठेवला. देशाला मुखपट्टी वापरण्याचा, ’दो गज की दुरी’ ठेवण्याचा आणि स्वच्छतेचा संदेश देणारे मोदी स्वतः मात्र कोरोनाविषयक नियमांचं पालन न करता लाखोंच्या सभा घेत होते. कुंभमेळ्यासारख्या धार्मिक मेळ्यांना त्यांच्याच पक्षाचं उत्तराखंडमधील सरकार परवानगी देत होतं. देशात बेडस् नाहीत. पुरेशा रुग्णवाहिका नाहीत. पीएम केअर निधीतील व्हेंटिलेटरमध्ये दोष, ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिरच्या वितरणातील गोंधळ, उपचाराअभावी तडफडून होणारे मृत्यू, नदीकिनारी वाहत येत असलेले कोरोनाबाधितांचे मृतदेह असं वास्तव अगोदर देशी वृत्तपत्रांनी मांडलं आणि नंतर ते विदेशी वृत्तपत्रांतून ही मांडलं गेले. नाही म्हटलं, तरी त्याचा परिणाम मोदी यांच्या लोकप्रियतेवर झाला. अमेरिकास्थित ’डेटा इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्ट’नं मोदी समर्थकांमध्ये घट होऊ लागली आहे असं म्हटलं आहे. ही कंपनी जागतिक नेत्यांसंदर्भात घडामोडींचा अभ्यास करत असते. ऑगस्ट 2019 पासून अमेरिकेची ही कंपनी मोदी यांच्या लोकप्रियतेचा, त्यांच्या पाठीराख्यांचा अभ्यास करते आहे. मोदी यांचं गुणांकन या आठवड्यात 63 टक्के एवढं आहे. एप्रिल महिन्यात मोदी यांच्या गुणांकनात 22 गुणांनी मोठी घट झाली. भारताच्या ’सी व्होटर कंपनी’नं केलेल्या सर्वेक्षणातही हीच बाब उघड झाली आहे. मोदी यांच्या कामगिरीवर अतिशय समाधानी असलेल्या नागरिकांमध्ये घट झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. गेल्या वर्षी मोदी यांच्या प्रदर्शनावर अतिशय समाधानी असलेल्या नागरिकांची संख्या 65 टक्के होती. ती आता 37 टक्क्यांपर्यंत घसरली आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून पहिल्यांदाच, सात वर्षांत मोदी सरकारप्रती नाराजी असणार्‍यांची संख्या मोदी सरकारची भलामण करणार्‍यांच्या तुलनेत जास्त आहे. पंतप्रधानांच्या राजकीय कारकीर्दीतील हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. कोरोनाचा संसर्ग शहरांच्या बरोबरीनं ग्रामीण भागात पसरू लागला आहे, तशी पंतप्रधान मोदी यांच्या लोकप्रियतेत घट होऊ लागली आहे. शहरांमध्ये नागरिकांना ऑक्सिजन, बेड्स, औषधे यांच्यासाठी वणवण करावी लागतं आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी पार्थिवांची रांग लागली आहे. सरकारची साथ नसल्यानं असहाय्य नागरिक ’सोशल मीडिया’वर व्यक्त होत आहेत. दिल्ली आणि मुंबई या मोठ्या शहरांना कोरोनानं घातलेला विळखा हळूहळू सैल होऊ लागला आहे; मात्र आता हा विषाणू ग्रामीण भागात वेगानं पसरतो आहे. या भागात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था तितकी सक्षम नाही. देशातल्या लोकांना हे उमगून चुकलं आहे, की त्यांना त्यांचं कुटुंबीय, नातेवाइक, मित्रपरिवार यांचीच साथ आहे. सरकार मदतीला येणार नाही असं चित्र आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं मोदी सरकारनं म्हटलं आहे. शतकात एकदाच येणारी अशी ही संसर्गाची साथ आहे, असं सरकार म्हणत असलं, तरी दोन्ही सर्वेक्षणातून आलेले निष्कर्ष पाहता सरकारच्या म्हणण्यावर जनतेचा विश्‍वास नाही, हेच दिसतं. कोरोनाला रोखण्यात सरकारला आलेल्या अपयशाच्या मुद्यावर मोदी यांच्या गुणांकनात घट झाली असली, तरी सरकारला घेरण्यात विरोधकांना यश न आल्यानं मोदी हेच अजूनही देशातील सगळ्यात लोकप्रिय नेते आहेत, असं ’सी व्होटर’च्या सर्वेक्षणात स्पष्ट झालं आहे. “अहंकार, अति-राष्ट्रवाद आणि प्रशासनाची अकार्यक्षमता यांच्यामुळं भारताचं संकट अधिक मोठं झालं. लोकप्रिय पंतप्रधानांचा आधार असलेल्या लोकांचा श्‍वास गुदमरला जात आहे,‘’ असं ऑस्ट्रेलियातील एका वृत्तपत्रानं म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियातील भारतीय दूतावासानं या लेखावर आक्षेप नोंदवला आहे; परंतु त्याचा काही फायदा झाला, असं सर्वेक्षणातील निष्कर्ष सांगतात. भविष्यात अशाप्रकारे निराधार बातम्या प्रकाशित करू नये, असं दूतावासानं म्हटलं आहे; परंतु जगभरात कुणाकुणाचं तोंड बंद करणार, असा प्रश्‍न आहे. आणखी एका सर्वेक्षणात ही मोदी यांची लोकप्रियता घटली असल्याचं स्पष्ट झालं आहे. मोदी यांनी स्वतःची प्रतिमा जगभरात सक्षम प्रशासक म्हणून पुढं आणली होती; पण सध्या भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होत असून या संकटासाठी जगभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच जबाबदार धरलं जात आहे. आता अनेक जण मोदींच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍न उपस्थित करत आहेत. संकटादरम्यान सरकार कमी पडलं, इतकंच नव्हे, तर परिस्थिती आणखी बिकट करण्यात त्यांनी हातभार लावला. अशा परिस्थितीत अडकलेले मोदी हे काही एकमेव नेते नाहीत; पण त्यांचं अपयश स्पष्टपणे दिसून येतं, ही वस्तुस्थिती आहे.

COMMENTS