मोदींना बांगला देशात विरोध

Homeसंपादकीय

मोदींना बांगला देशात विरोध

पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगला देशाच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त दौरा सुरू आहे.

देशाच्या पाच कंपन्या आणि महागाई ! 
बामनकावा की मराठा जातीयवाद ? 
आभासी चलनावरील अंकुश

पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगला देशाच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त दौरा सुरू आहे. कोरोना सुरू झाल्यानंतरच्या गेल्या एक वर्षानंतरचा मोदी यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. भारताने बांगला देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेली मदत जगजाहीर आहे. अमेरिका व अन्य देशांचा विरोध डावलून भारताने पाकिस्तानचे तुकडे करून दाखविले. इंदिरा गांधी यांची धडाकेबाज कृती त्याला जबाबदार होती. 

बांगला देशाच्या स्वातंत्र्ययुद्धात भारताने मदत करावी, म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सत्याग्रह केला होता. मोदी हे ही त्यात सहभागी झाले होते. एकीकडे मोदी बांगला देशाच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी होत असताना, दुसरीकडे चटगावमध्ये मोदी यांच्या विरोधात प्रदर्शन सुरू आहेत. या प्रदर्शनात आंदोलनकर्ते आणि पोलिस आमने-सामने आले. या आंदोलनावेळी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मोदी यांच्या दौर्‍याआधी शुक्रवारी नमाज संपल्यानंतर ढाका शहरातील बैतुल मुकर्रम परिसरात विरोधी प्रदर्शन करण्यात आले. पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली. यात काही पत्रकारही जखमी झाले. चटगावमध्ये शुक्रवारचा नमाज संपल्यानंतर हथाजरी मदरश्यातून विरोध मोर्चा काढण्यात आला होता. पोलिसांसोबत झालेल्या या झटापटीत अनेक लोक जखमी झाले आहेत. हिफाजत-ए-इस्लाम संघटनेचे नेते मुजिबुर रहमान हामिदी यांनी त्यांच्या काही आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांचा दावा आहे, की पोलिसांनी प्रदर्शन करणार्‍यांवर गोळीबार केला; मात्र याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून अनेक मुस्लिम संघटना आणि डाव्या पक्षांच्या संघटना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याविरोधात रॅली काढत आहेत. त्यांचा दावा आहे, की शेख मुजीबुर रहमान यांनी एका धर्मनिरपेक्ष देशासाठी संघर्ष केला आणि मोदी धार्मिक नेते आहेत. मोदी यांच्या दौैर्‍याआधीच तिथल्या काही लोकांनी त्यांच्या दौर्‍याचा विरोध सुरू केला आहे; मात्र एका गटाच्या विरोधामुळे चिंतेचे कारण नाही, असे बांगला देशाचे परराष्ट्र मंत्री ए. के. अब्दुल मोमेन यांनी म्हटले आहे. बांगला देश एक लोकशाही असलेले राष्ट्र आहे. इथे जनतेला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मोमेन यांच्या म्हणण्यानुसार जनता आमच्यासोबत आहे. केवळ काही लोक या दौर्‍याचा विरोध करत आहेत आणि त्यांना तो करू द्यावा. या मुद्द्यावरून चिंता करण्याचे कुठलेही कारण नाही. शुक्रवारी बांगला देशाची राजधानी ढाकामध्ये मुस्लिम आणि विद्यार्थी संघटनांनी मोदी यांच्या दौर्‍याचा विरोध करत रॅली काढली. बांगला देशाच्या स्वातंत्र्याला दोन दिवसांपूर्वी 50 वर्षें पूर्ण झाली. भारत आणि बांगला देशाचे संबंध गेल्या पाच दशकांत अपवाद वगळता सातत्याने चांगलेच राहिले आहेत. 26 मार्च 1971 रोजी बांगला देशाने स्वतःला पाकिस्तानपासून स्वतंत्र घोषित केले. तब्बल नऊ महिन्यांच्या रक्तरंजित संघर्षानंतर भारताच्या मदतीने बांगला देश या स्वतंत्र राष्ट्राची स्थापना झाली. शुक्रवारच्या नमाज पठणानंतर जवळपास पाचशे मुस्लिमांनी ढाक्यातील बैतुल मोकार्रम मशिदीबाहेरच्या रस्त्यावर मोर्चा काढला. रॅलीच्या पार्श्‍वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. निदर्शकांच्या हातात कुठलेही बॅनर नव्हते आणि ते कुठल्या संघटनेशी संबंधित आहेत, याचीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यांनी मोदी यांच्या पोस्टरचा अवमान केला. या मोर्चात भारतविरोधी आणि मोदीविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. काही निदर्शकांच्या हाती पोस्टर होते. त्यावर लिहिलं होतं – ’गो बॅक मोदी, गो बॅक इंडिया.’ याव्यतिरिक्त डाव्या विचारसरणीच्या जवळपास दोनशे विद्यार्थी कार्यकर्त्यांनी ढाका विद्यापीठाबाहेर मोर्चा काढला. या वेळी मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. बांगला देशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्या आमंत्रणावरून मोदी या  दौर्‍यावर आहेत. निदर्शक शेख हसिना यांच्यावरही टीका करत आहेत. मोदी यांना आमंत्रित करायला नको होते, असे त्यांचे म्हणणे आहे. निदर्शक मोदी यांचा विरोध करीत असताना तेथील परराष्ट्रमंत्री मोमेन यांनी मात्र मोदी आमच्या आमंत्रणाला मान देऊन येत आहेत, याचा आपल्याला अभिमान आहे, असे म्हटले आहे. पुराणमतवाद्यांना कसे हाताळायचे हे बांगला देशाच्या जनतेला आणि शेख हसिना यांना चांगलेच ठावूक आहे, असे मोमेन म्हणाले होते; परंतु प्रत्यक्षात मोदी यांच्या दौर्‍याच्या वेळीच दंगल झाली. गोनोशसथ्या केंद्राचे संस्थापक डॉ. जफरुल्लाह चौधरी आणि बीएनपीशी संबंधित इतर पक्ष आणि गटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याचा विरोध करून दुटप्पी भूमिका घेऊ नये, असेही त्यांनी म्हटले आहे. मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या कार्यकाळात याच सर्व लोकांनी मोदी यांना खूश करण्याचा प्रयत्न केला होता, असे त्यांचे म्हणणे आहे. मोदी गोपालगंजच्या मटुआ समाजातील लोकांची भेट घेणार आहेत. या कार्यक्रमामागे काही राजकीय किंवा पश्‍चिम बंगाल निवडणुकीचे कारण आहे का, या प्रश्‍नाचे उत्तर त्यात दडले आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) या दोन कायद्यांचा बांगला देशामध्ये विरोध होतो आहे. सीएए कायद्याविषयी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बांगला देशामध्ये हिंदूंवर अत्याचार होत असल्याचे म्हटले होते. यावर बांगला देशाने तीव्र आक्षेप नोंदवला होता. त्यावर बांगला देशाचे परराष्ट्र मंत्री ए. के. अब्दुल मोमेन म्हणाले होते, की हिंदूंवर अत्याचार होत असल्याचे म्हणणे  अनावश्यक आणि चूक आहे. बांगला देशामध्ये आहे तसा जातीय सलोखा असणारी राष्ट्रे मोजकीच आहेत. आमच्याकडे कुणी अल्पसंख्याक नाही. भारताच्या या दोन्ही नव्या कायद्यांचा विषय बांगला देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बीएनपीनेही उचलला होता. 

COMMENTS