मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नांत वडील, मामाचा मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नांत वडील, मामाचा मृत्यू

तळेगावजवळील इंदोरी येथील कुंडमळा येथे तिघेजण फिरायला गेले होते.

शेडगेवाडी-मुंबई सेंट्रल एसटी बस सेवा सुरु; शिराळा तालुका प्रवासी संघाच्या पाठपुराव्यास यश
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांची आत्महत्या
राणेंचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला

लोणावळा/ प्रतिनिधीः तळेगावजवळील इंदोरी येथील कुंडमळा येथे तिघेजण फिरायला गेले होते. त्या वेळी तिथे सेल्फी काढत असताना सात वर्षीय मुलाचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारणारे त्याचे वडील आणि मामाचा बुडून मृत्यू झाला. नागरिकांच्या दक्षतेमुळे मुलाचा जीव वाचला. 

राकेश लक्ष्मण नरवडे (वय 36, रा. मोशी), वैष्णव विनायक भोसले (वय 30, रा. दांगट वस्ती, देहू रोड) अशी बुडून मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. आयुष राकेश नरवडे (वय 7, रा. मोशी) असे या घटनेत जीव वाचलेल्या मुलाचे नाव आहे. तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश नरवडे हे त्यांचा मुलगा आयुष व मेहुणा वैष्णव भोसले हे तिघेजण कुंडमळा येथे फिरायला गेले होते. त्या वेळी ते तिथे सेल्फी काढत असताना आयुषचा पाय घसरून तो पाण्यात पडला. राकेश आणि वैष्णव यांनी त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. या ठिकाणी इंद्रायणी नदीच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ते दोघेही पाण्यात वाहून गेले. आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखून आयुषला बाहेर काढल्याने त्याचा जीव वाचला; मात्र पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या आयुषच्या वडील व मामाचा बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप लोंढे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह काढण्यासाठी सुदुंबरे येथील राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पथकाला पाचारण केले. पथकाने कुंडमळा येथील नदीच्या पाण्यात दोघांचा शोध घेतला असता एक मृतदेह अर्ध्या तासाने तर दुसरा मृतदेह अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात यश आले. या घटनेचा पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप लोंढे करीत आहेत.

COMMENTS