मी कारवाईला घाबरत नाही व माझ्याकडे सर्व पुरावे आहेत तसेच येथील लोकांना उत्तर देण्याची माझी जबाबदारी आहे.
अहमदनगर/प्रतिनिधी- मी कारवाईला घाबरत नाही व माझ्याकडे सर्व पुरावे आहेत तसेच येथील लोकांना उत्तर देण्याची माझी जबाबदारी आहे. जिल्ह्याबाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला मी याचे उत्तर देणे लागत नाही, असे स्पष्टीकरण डॉ. सुजय विखे यांनी दिले आहे. नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी अथवा कोणत्याही नागरिकांनी इंजेक्शनच्याबाबत प्रश्न केला असता तर मी निश्चितपणे उत्तर दिले असते. मात्र, जिल्ह्याबाहेरील नेत्यांना उत्तर देण्याच्या कोणताच प्रश्न नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे, ‘माझी बांधिलकी नगर जिल्ह्याशी आहे, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.
डॉ. विखे यांनी आपल्या मैत्रीचा वापर करत थेट विशेष विमानाने रेमडेसिवीर इंजेक्शनचासाठा नगर जिल्ह्यात आणला. या साठ्याचे वाटप केल्याबद्दल माहिती व्हिडिओ चित्रफितीद्वारे त्यांनी सामाजिक माध्यमांमार्फत प्रसारित केली. शिर्डी विमानतळावर त्यांनी हा साठा विशेष विमानांमधून उतरविला. तो रेमडेसिवीरचा साठा कोठून आणला हे त्यांनी जाहीर केलेले नाही. त्यावरून चांगलेच आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. रेमडीसिवीर इंजेक्शनसंदर्भात विखेंविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर बोलताना ते म्हणाले, टीका करणार्यांनादेखील मी उत्तर दिले आहे. मी किती रेमडिसिव्हर इंजेक्शन आणले याचा उल्लेख केलेला नाही, त्यामुळे दहा हजाराचा आकडा कुठून व कसा आला, हे मलाही माहीत नाही व मी यावर राजकारण करू इच्छित नाही, माझी बांधिलकी माझ्या नगर जिल्ह्याच्या जनतेसोबत आहे. जिल्ह्यात 12 आमदार आहे व या एकाही आमदाराने प्रश्न उपस्थित केला, की नेमके त्याच्यात काय होते व ही सगळी फसवेगिरी आहे, हा स्टंट आहे तर मी त्यांना उत्तर द्यायला बंधनकारक आहे, असे सांगून ते म्हणाले, मात्र जिल्ह्याबाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला मी उत्तर देण्यास बंधनकारक नाही. जर जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीने मला प्रश्न विचारला तर मी त्याला सर्व पुरावा देईल व कोणी काही दाखल केले असेल तर सर्व कागदपत्रे माझ्याकडे आहेत, असे ते म्हणाले.
…तर, साथ दिली नसती
खासदार बाळासाहेब विखेंपासून आम्ही नगर जिल्ह्यात कार्यरत आहोत. पन्नास वर्षे झाली आमच्या राजकारणाला. जनतेने साथ सोडलेली नाही, हा विश्वास आहे, असे स्पष्ट करून ते म्हणाले, आम्ही फसवेगिरी केली असती, तर जिल्ह्याने पन्नास वर्षे आम्हाला साथ दिली नसती. रेमडीसिवीरबाबत राजकारण सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.
COMMENTS