मामा-भाचे टोळीला मोक्का  ; दोन खुनी हल्ले; कॅश लुटणारी नऊ जणांची टोळी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मामा-भाचे टोळीला मोक्का ; दोन खुनी हल्ले; कॅश लुटणारी नऊ जणांची टोळी

शहरात एक नवीन टोळी सक्रिय झाली असून, दोन दिवसांत दोन ठिकाणी खुनी हल्ले करून कॅश लुटणार्‍या मामा भाचे टोळीवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

 दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनोज सिसोदिया यांच्या समर्थनार्थ बीड मध्ये आप समर्थकांची निदर्शने
प्रकाश कामगारांचा एक दिवसासाठी अन्नत्याग; पोलिसासह आरोग्य अधिकार्‍यांच्या बेकायदेशीर कारवाई विरोधात उपोषण
संपकरी बेस्ट कर्मचार्‍यांना कंपनीकडून नोटीस

पुणे/प्रतिनिधी : शहरात एक नवीन टोळी सक्रिय झाली असून, दोन दिवसांत दोन ठिकाणी खुनी हल्ले करून कॅश लुटणार्‍या मामा भाचे टोळीवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. हे दोन्ही गुन्हे हे नऊ आरोपींनी मिळून केल्याचे निष्पन्न झाले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन एप्रिल रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास पुणे सातारा रोडवरील अरण्येश्‍वर कॉर्नर येथील व्ही. आर. गुप्ता, देशी दारूचे दुकान, सुप्रील इंडस्ट्रीयल इस्टेट येथे सहा व्यक्ती दुकानात घुसल्या. दुकानाचे मॅनेजर व कामगाराला रिव्हॉल्वरचा धाक दाखवला. पालघनने व दारू मोजण्याच्या लोखंडी मापाने मारहाण करून त्यांच्याकडून 57 हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून नेले होते. याबाबत दुकानाचे मॅनेजरच्या फिर्यादीनुसार संबंधितांवर सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार एप्रिलला सात वाजण्याच्या सुमारास सुमारास स्वारगेट येथील लक्ष्मीनारायण थिएटरसमोरच्या उड्डाणपुलाखाली एका 50 वर्षीय वृत्तपत्र विक्रेत्याला चाकूने धमकावून त्यांच्याजवळील पेपर विक्रीचे जमलेले नव्वद हजार तीनशे रुपये असलेली बॅग अनोळखी व्यक्तींनी हिसकावून नेली. याबाबत दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना दत्तवाडी पोलिसांनी गौरव फडणीस (वय-30 वर्षे, रा. पर्वती दर्शन, पुणे) व अक्षय गरुड (वय-20 वर्षे, रा. व्ही.आय.टी. कॉलेजच्या मागे, अपर इंदिरानगर, पुणे) या दोन आरोपींना अटक केली. या दोघांसह सचिन पांडुरंग सोंडकर (वय-31वर्षे, रा. अपर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे), महादेव सुरेश नंदुरे (वय-20 वर्षे, रा. दत्तनगर, कात्रज, पुणे)  चिराग संजय देशमुख (रा. खोपडेनगर, कात्रज, पुणे) यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यातील चार आरोपींवर वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या आरोपींकडे पोलिसांनी आणखी चौकशी केली असता आरोपी ऋषिकेश उर्फ हुक्या श्रीकांत गाडे (रा. व्ही.आय.टी. कॉलेजच्या मागे, अपर इंदिरानगर,बिबवेवाडी, पुणे) याने स्वत:च्या नेतृत्वाखाली संघटीत टोळी तयार केली आहे. त्याने व त्याच्या टोळीने पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण भागात अनेक गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.

टोळीप्रमुख ऋषिकेश उर्फ हुक्या गाडे याने टोळीचे वर्चस्व व दहशत कायम ठेवण्याच्या उद्देशाने संघटीत गुन्हेगारी कृत्य सातत्याने चालू ठेवले. तसेच या टोळीने बेकायदेशीर मार्गाने आर्थिक व इतर फायदा मिळविण्यासाठी वरील गुन्हे केलेले आहेत. त्यामुळे सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद गंभीरे यांनी या गुन्ह्याला मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पश्‍चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांना सादर केला. त्यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली. त्याप्रमाणे वरील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली असून या गुन्ह्याचा पुढील तपास स्वारगेट विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त सुषमा चव्हाण करीत आहेत.

टोळीवर 66 गुन्हे

या टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा टाकणे, दरोड्याचा प्रयत्न, घरफोडी, गंभीर दुखापती, अग्निशस्त्रे, घातक शस्त्रे घेऊन दहशत माजविणे यांसारखे गुन्हे करून वर्चस्व निर्माण करणे असे गुन्हे केल्याची वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत नोंद आहे. आरोपी गाडे याने स्वतंत्रपणे 57 गुन्हे केल्याची अशी एकूण 66 गुन्हे केल्याची नोंद पोलिसांना आढळून आली आहे.

COMMENTS