महागाई विरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे वाहनांना धक्का मारो आंदोलन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महागाई विरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे वाहनांना धक्का मारो आंदोलन

केंद्रातील भाजप सरकारने पेट्रोल, डिझेल, घरगुती एलपीजी गॅसचे वाढवलेले दर तसेच राज्य सरकारने वाढवलेले वीज बिल व खाद्यतेलाच्या दरवाढीविरोधात बहुजन मुक्ती पार्टीच्यावतीने मंगळवारी धक्का मारो आंदोलन करण्यात आले. वाहनांना धक्का देत शहरातून मोर्चा काढण्यात आला.

चौंडीत आज अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी अभिवादन समारंभ
Sangamner : अज्ञात चोरट्यांनी डिटोनेटरच्या सहाय्याने फोडले एटीएम मशीन | LOKNews24
झेंडीगेट दक्षिणमुखी हनुमान मंदिरात 56 भोग अन्नकोट उत्साहात संपन्न

अहमदनगर/प्रतिनिधी- केंद्रातील भाजप सरकारने पेट्रोल, डिझेल, घरगुती एलपीजी गॅसचे वाढवलेले दर तसेच राज्य सरकारने वाढवलेले वीज बिल व खाद्यतेलाच्या दरवाढीविरोधात बहुजन मुक्ती पार्टीच्यावतीने मंगळवारी धक्का मारो आंदोलन करण्यात आले. वाहनांना धक्का देत शहरातून मोर्चा काढण्यात आला. जुन्या बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला व तेथे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

    बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिसाळ, शहर जिल्हाध्यक्ष शिवाजी भोसले, बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र करंदीकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात बाळासाहेब पातारे, मनोहर वाघ, गणेश चव्हाण, राधेलाल नकवाल, किरण सोनवणे, सुधीर खरात, घुगे महाराज, अजय साळवे, प्रताप सौदे, जहीर सय्यद, सागर ठाणगे, यश साळवे, कन्हैय्या गट्टम, बी.आर. गोहेर, दादाभाऊ पटेकर, हनिफ शेख, कानिफ आंबेडकर आदी सहभागी झाले होते. जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. आंदोलकांनी केंद्र व राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच दुचाकी व रिक्षांना धक्का देत शहरातून मोर्चा काढला. माळीवाडा येथे महात्मा फुले व मार्केटयार्ड चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करुन मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नेण्यात आला.

केंद्र सरकारवर टीका

2014 पासून सत्तेवर आलेल्या मोदीप्रणीत भाजप सरकारने महागाई कमी करण्याऐवजी महागाईचा बकासुर निर्माण केला आहे. गेल्या सात वर्षापासून महागाई कमी होण्याचे नाव घ्यायला तयार नाही. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्या असून, सर्वसामान्यांना जगणे अवघड झाले आहे. त्यात पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमतीचा भडका उडाला आहे. यात सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे. एकीकडे टाळेबंदी असल्याने लोकांचे दरडोई उत्पन्न घटले आहे. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी जनता जीवाचे रान करत आहे. तर दुसरीकडे महागाईचा आगडोंब उसळला आहे. केंद्रातील भाजप सरकारने सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल केले आहे, असा आरोप मोर्चाच्यावतीने करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. न्यूयार्कपेक्षाही भारतात पेट्रोल महाग झाले आहे. दैनंदिन जीवनात गरजेचे असलेले पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती वापराच्या गॅसच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असताना सर्वसामान्य जनतेला इंधन, तेलाच्या किमती कमी होण्याची आशा होती, पण तसे न होता किमती वाढतच राहिल्या. सर्वसामान्य जनतेची लूट करण्यासाठी केंद्र सरकारने उत्पादन शुल्क वाढविले. परिणामी पेट्रोल, डिझेल गॅसचे किमती कमी होण्याऐवजी वाढल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल, डिझेल, गॅसच्या भरमसाठ वाढलेल्या किमती कमी कराव्या, खाद्यतेल तसेच जीवनावश्यक खाद्यपदार्थांचे भाव कमी करावे, वीज बिल माफ करण्याची मागणी मोर्चाच्यावतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन प्रमुख पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले.

गॅसची घनता केली कमी

भाजप सरकारने जनतेचे पंचवीस लाख कोटी रुपये टॅक्सच्या नावाने लुटले. पूर्वी गॅसची सबसिडी मिळत होती, आता सबसिडी न देता जनतेला खुल्या किमतीत गॅस खरेदी करावा लागत आहे. गॅसची किंमत 930 झाली आहे. पूर्वी गॅस तीन महिने चालत होता. आता तोच गॅस एक महिन्यात संपतो, याचा अर्थ गॅस कंपनीने पैसा वाढवून गॅसची घनता कमी केली. अशा पद्धतीने दोन्ही बाजूने जनतेची लूट सुरू असल्याचा आरोप संघटनेच्यावतीने करण्यात आला आहे.

COMMENTS