मराठवाडयात दोन तरूण शेतकर्‍यांच्या आत्महत्या ; औरंगाबाद आणि बीड येथील शेतकर्‍यांनी कवटाळले मृत्यूला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठवाडयात दोन तरूण शेतकर्‍यांच्या आत्महत्या ; औरंगाबाद आणि बीड येथील शेतकर्‍यांनी कवटाळले मृत्यूला

औरंगाबाद/बीड : अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड मोठया प्रमााणात नुकसान झाले असून, हातात आलेले पिक निसर्गाने हिरावून नेले, अशा परिस्थितीत बँकेचे कर्ज, लोका

मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली
उच्चशिक्षित वकिलाला जातीमुळे नाकारली सदनिका ; बांधकाम व्यावसायिकांविरोधात अ‍ॅट्रासिटीनुसार गुन्हा दाखल
केसीआरची ऑफर स्वाभिमानीच्या राजू शेट्टींनी नाकारली

औरंगाबाद/बीड : अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड मोठया प्रमााणात नुकसान झाले असून, हातात आलेले पिक निसर्गाने हिरावून नेले, अशा परिस्थितीत बँकेचे कर्ज, लोकांची देणी आणि कुटुंब कसे चालवावे ? या आर्थिक विवंचनेतून औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील कैलास पुंडलिक काटकर या 36 वर्षीय शेतकर्‍याने तर बीड जिल्ह्यातील परळी येथील नागनाथ श्रीरंग सातभाई या 40 वर्षीय शेतकर्‍यांने आत्महत्या केली.
फुलंब्री तालुक्यातील खामगाव (गोरक्ष) येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. सलग दोन वर्षे अस्मानी संकटाने हाता-तोंडाला आलेला घास हिरावून घेतल्याने तरुणावर कर्जांचा डोंगर निर्माण झाला होता. सावकारांचे कर्ज कसे द्यायचे. याची चिंता त्याला सतावत होती. त्यातूनच संबंधित तरुण शेतकर्‍याने आपल्या शेतातील एका झाडाला गळफास घेत मृत्यूला कवटाळले आहे. या घटनेची माहिती मिळताच वडोद बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्राथमिक माहितीच्या आधारे पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. काटकर यांची खामगाव शिवारात त्यांची शेती असून त्यांच्या नावावर वि.वि.का सोसायटीच्या कर्जासह, खाजगी फायनान्सचे गृहकर्ज होते. तसेच काही खाजगी सावकाराकडून देखील त्यांनी उधार पैसे घेतले होते. पण गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून डोक्यावरील कर्ज कसं फेडायचं याची चिंता त्यांना सतावत होती. यावर्षी देखील मराठवाड्यात कोसळलेल्या अतिवृष्टी सदृश्य पावसात त्याचे पीक वाहून गेले होते.
तर दुसरी आत्महत्या बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील तडोळी येथे घडली. सातभाई या शेतकर्‍याच्या आत्महत्येने पुन्हा एकदा आर्थिक विवंचनेतून शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असल्याचे समोर आले आहे. सरकारची मदतीची घोषणा झाली. मात्र अद्याप रुपयाही मदत मिळाली नाही म्हणून तात्काळ मदत देणे गरजेचे आहे. अन्यथा आत्महत्येचे सत्र सुरुच राहणार आहे. विशेष म्हणजे या आत्महत्या पाठीमागे पोखरा या कृषी विभागाच्या योजनेमधील अधिकार्‍यांची अनास्था देखील जबाबदार आहे. पेरु लागवडीचे अनुदान वेळेवर दिले नाही. त्यातच आस्मानी संकट यातून ही आत्महत्या झाली असल्याचे नातेवाईकांचा आरोप आहे. तडोळी येथील नागनाथ यांनी गेल्या तीन वर्षांपासून पेरुच्या झाडांची लागवड केली होती. तीन वर्षांपासून कृषी कार्यालयाकडून आजतागायत अनुदान त्यांना भेटले नाही. त्यातच आता अतिवृष्टीने हाता-तोंडाशी आलेली पिके वाया गेली. जमिनीही वाहून गेल्या. नागनाथ यांचे यात मोठे नुकसान झाले होते. तसेच आगोदरच डोक्यावर एवढे कर्ज असल्याने फेडायचे कसे? असा प्रश्‍न त्यांच्यासमोर होता.

शेतकर्‍यांना मदत कधी मिळणार ?
शेतकरी सततच्या आस्मानी संकटाने हतबल झाला आहे. सणासुदीचे दिवस असल्याने कुटुंबाच्या काही गरजा आहेत. पण अतिवृष्टीमुळे हातचे पीक निघून गेले. त्याममुळे निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेने अनेक शेतकरी हताश झाले आहेत. राज्य सरकारने शेतकर्‍यांसाठी दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. मात्र ते शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी 2022 चे वर्ष उजळावे लागणार की काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. यातच सरकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या अनास्था यामुळे शेतकरी टोकाचं पाऊल उचलत आहेत.

COMMENTS