अहमदनगर/प्रतिनिधी- महापालिकेचा ढिसाळ कारभार व शहर वाहतूक शाखेद्वारे अवजड वाहनांना शहरात केली जात नसलेली बंदी यामुळे शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्रा
अहमदनगर/प्रतिनिधी- महापालिकेचा ढिसाळ कारभार व शहर वाहतूक शाखेद्वारे अवजड वाहनांना शहरात केली जात नसलेली बंदी यामुळे शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी बुधवारी संताप व्यक्त केला. मनपाचे अधिकारी फक्त सह्याजीराव (सह्या करणारे) आहेत, असा आरोप त्यांनी केला तसेच शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक भोसलेंवर कारवाई करण्याची मागणी केली.
दिवाळीचा सण तोंडावर आला असताना सर्वत्र अनधिकृत पार्किंग,अस्वच्छता, ठिकठिकाणी कचर्याचे ढीग, विद्युत पोलवर जाहिरातींचे अनधिकृत फलके, शहरात धुळीचे साम्राज्य पसरले असल्याने आ. जगताप यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना शहरातील काही भागात नेऊन नागरी समस्या दाखवल्या. मनपाचे अधिकारी व कर्मचारी कुठल्याही प्रकारचे चांगले काम करत नाही, तुम्ही (आयुक्त गोरे), उपायुक्त यशवंत डांगे व सर्व अधिकारी-कर्मचारी आपल्या ए.सी. केबीनमध्ये बसून फायलींवर सह्या करण्यात व्यस्त आहेत. परंतु सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष करत आहे हे सर्व अधिकारी व कर्मचारी फक्त सह्याजीराव झाले आहे, असा आरोप आमदार जगताप यांनी शहरातील विविध नागरी समस्यांची पाहणी करताना केला. यापुढील काळात जो अधिकारी कामचुकारपणा करेल, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून दंडात्मक कारवाई करावी, असेही त्यांनी आयुक्तांना सांगितले. नगर शहर स्वच्छ,सुंदर,हरित राहण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे परंतु अधिकारीवर्ग फक्त ठेकेदारांच्या बैठका करण्यात व्यस्त आहे परंतु सर्वसामान्य नागरिकांना भेटण्यास व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिकार्यांकडे वेळ नाही असा आरोप त्यांनी केला. यापुढील काळात नागरिकांचे प्रश्न मार्गी लावा अन्यथा शासन दरबारी तक्रार केली जाईल, असा इशारा यावेळी त्यांनी दिला. यावेळी प्रा. माणिकराव विधाते, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, अजिंक्य बोरकर, अरविंद शिंदे, सुरेश बनसोडे,अभिजित खोसे, संतोष ढाकणे उपस्थित होते.
भोसलेंवर कारवाईची मागणी
नगर शहरातून अवजड वाहतूक सुरूच असल्याने तसेच जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांच्या आदेशाला वाहतूक शाखेकडून केराची टोपली दाखवली गेल्याच्या निषेधार्थ आ. जगताप यांनी वाहतूक शाखेत ठिय्या आंदोलन केले व शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक भोसलेंवर कारवाईची मागणी केली. शहरातून अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या बैठकीत झाल्यानंतरही शहर वाहतूक शाखेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा दावा करून जगताप यांनी वाहतूक शाखेच्या कार्यालयातच आंदोलन सुरू केले. पोलीस निरीक्षक भोसलेंवर कारवाई होत नाही, तोपर्यंत हटणार नाही, आजच्या आज अवजड वाहतूक बंद करा, तरच आंदोलन मागे घेतले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी पोलीस निरीक्षक भोसले यांना आमदार जगताप यांनी चांगलेच फैलावर घेतले. त्याचबरोबर नगर शहरामध्ये रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृतपणे वाहने उभी केली जातात यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ शहराचे विद्रूपीकरण होते. यावर ठोस कारवाई न केल्यास येत्या पंधरा दिवसात नागरिकांसह रस्ता रोको आंदोलन करू असा इशारा जगताप यांनी दिला. दरम्यान, वाहतूक समस्या सोडवण्याबाबच्या आवश्यक कार्यवाहीबद्दल लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संभाजी पवार, विजय सुंबे,आरिफ शेख,अमित खामकर, साहेबान जहागीरदार,भरत गारुडकर, पप्पू पाटील,अजिंक्य भिंगारदिवे उपस्थित होते.
COMMENTS