लग्नासाठी त्रास दिल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लग्नासाठी त्रास दिल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी - शहरात राहणार्‍या आबिद पापाभाई मोमीन शेख उर्फ मुन्ना शेख (रा.नालेगाव) या युवकाने अल्पवयीन मुलीला बळजबरीने लग्न करण्याची मागणी करीत

शेवटी महिलाच उतरल्या राखेसाठी रस्त्यावर l पहा LokNews24
नगरकरांचं टेन्शन वाढलं , हा तालुका पुन्हा कोरोना हॉटस्पॉट वर ! l Ahmednagar l LokNews24 l
मोदींना वाढदिवसानिमीत्त पाठविले पाच हजार पोस्ट कार्ड

अहमदनगर/प्रतिनिधी – शहरात राहणार्‍या आबिद पापाभाई मोमीन शेख उर्फ मुन्ना शेख (रा.नालेगाव) या युवकाने अल्पवयीन मुलीला बळजबरीने लग्न करण्याची मागणी करीत, जर लग्न केले नाही, तर तुझ्या आई-वडिलांना मारून टाकेल, अशी धमकी दिल्याने संबंधित अल्पवयीन मुलीने या त्रासाला कंटाळून विष प्राशन करत आत्महत्या केली. दरम्यान, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्यामुळे नातेवाईकांनी त्या मुलीचा मृतदेह बुधवारी (27 ऑक्टोबर) दुपारी कोतवाली पोलिस ठाण्यात आणल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. ’लव्ह जिहाद’चा हा प्रकार असल्याच्या चर्चेमुळे पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. 20 ऑक्टोबर रोजी या मुलीने विष प्राशन केले होते. उपचारादरम्यान बुधवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी आबिद पापाभाई मोमीन शेख उर्फ मुन्ना शेख (रा.नालेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येच्या प्रकारामुळे शहरामध्ये खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती अशी की, नगर शहराच्या मध्यवर्ती परिसरात राहणार्‍या संबंधित अल्पवयीन मुलीची सुमारे वर्षभरापूर्वी शेजारी राहणार्‍या एक दुसर्‍या मुलीने आरोपीशी ओळख करून दिली. ओळख झाल्यानंतर त्यांच्यात बोलणे व्हायचे. दरम्यानच्या काळात मुलाने तिचे फोटो काढले व तिच्याकडे लग्नाची मागणी सुरू केली. लग्नासाठी त्रास देत लग्न न केल्यास आई-वडिलांना मारून टाकेल, अशी धमकी या मुलाने दिली होती. आठ दिवसांपूर्वी ही मुलगी व तिची आई बाजारातून पायी जात असताना आरोपीने त्या दोघींना गाडी आडवी घातली. तुझ्या मुलीचे माझ्याशी लग्न लावून दे, नाहीतर तुला, तुझ्या पतीला व इतर नातेवाईकांना मारून टाकेल, अशी धमकी त्याने मुलीच्या आईला दिली होती. या सर्व त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी आरोपी मुन्ना शेख याच्याविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात कलम 305, 341, 354 (ड), 506 सह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सात दिवस मृत्यूशी झुंज
संबंधित अल्पवयीन मुलीने 20 ऑक्टोबरला विष प्राशन केले होते. त्यादिवशी रात्री साडे अकराच्या सुमारास तिला चक्कर येऊ लागल्याने व अंगाला मुंग्या आल्यासारखे वाटत असल्याने तिच्या आईने तिला खासगी रुग्णालयात नेले. त्यावेळी रिक्षातून जात असताना त्या मुलीने, मला खूप त्रास असून मी विष प्यायले आहे, असे आईला सांगितले. मुन्ना शेखने माझे फोटो काढले असून, लग्नाची मागणी करून तो खूप त्रास देत आहे, आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन पाठलाग करून त्रास देत असल्याचे तिने सांगितले होते. त्यानंतर तिला एका ख़ासगी रुग्णालयाने दाखल करून घेतले नसल्याने दुसर्‍या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे 25 ऑक्टोबरपर्यंत उपचार केल्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथे 27 रोजी पहाटे दीडच्या सुमारास तिचे निधन झाले, असे या मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

मृतदेह आणला पोलिस ठाण्यात
या घटनेची माहिती शहरात पसरताच नालेगाव परिसरातील नागरिक, तसेच नगरसेवक गणेश कवडे, शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह नागरिक पोलिस ठाण्यात जमा झाले. दुपारी दीड वाजल्यापासून पोलिसांनी या घटनेची फिर्याद घेतली नाही म्हणून पोलिस ठाण्याच्या आवारात त्यांनी तळ ठोकला होता. त्या मुलीचा मृतदेहही रुग्णवाहिकेतून कोतवाली पोलिस ठाण्याच्या आवारामध्ये आणण्यात आल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी, या प्रकरणासंदर्भांमध्ये आम्ही फिर्याद घेत आहोत. घडलेली घटना व माहिती फिर्यादीकडून घेतलेली आहे. तुम्ही मृतदेह बाहेर घेऊन जा, अशी विनंती केली. त्यानंतर त्या मुलीचा मृतदेह तिच्या घरी नेण्यात आला. त्यामुळे वातावरण निवळले.

COMMENTS