अहमदनगर/प्रतिनिधी- कोरोना प्रतिबंधात्मक लसीसाठी नगरकरांचे हाल सुरू आहेत. शहरातील चार लाख लोकसंख्येसाठी अवघी आठ केंद्र असल्याने लसीकरणावेळी केंद्रांवर
अहमदनगर/प्रतिनिधी- कोरोना प्रतिबंधात्मक लसीसाठी नगरकरांचे हाल सुरू आहेत. शहरातील चार लाख लोकसंख्येसाठी अवघी आठ केंद्र असल्याने लसीकरणावेळी केंद्रांवर नागरिकांची तोबा गर्दी होत आहे व त्यामुळे गोंधळ उडत आहे. त्याचा मनःस्ताप आरोग्य केंद्रातील कर्मचार्यांनाही होत आहे. लसीकरण केंद्रांवर नगरसेवकांच्या समर्थकांकडून धटींगशाहीचे प्रकार घडत आहेत. लसीकरणातील सावळागोंधळ मनपा आयुक्तांना दिसत नाही का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यातच गेल्या पाच दिवसांपासून करोना लसीकरण बंद असल्याने लसीकरणाची प्रतीक्षा करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
मनपाकडून सुरू असलेल्या करोना लसीकरणाचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवस पूर्ण होऊनही नागरिकांना दुसरा डोस मिळत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. तर पहिल्या डोसपासून काही नगरकर अजून वंचित आहेत. मनपाच्या शहरातील आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जिजामाता आरोग्य केंद्र (बुरूडगाव रोड), महात्मा फुले आरोग्य केंद्र (माळीवाडा), मुकुंदनगर आरोग्य केंद्र, केडगाव आरोग्य केंद्र, नागापूर आरोग्य केंद्र, तोफखाना आरोग्य केंद्र, सिव्हिल आरोग्य केंद्र, तसेच बीडीसीडी (बाळासाहेब देशपांडे प्रसुतीगृह) या केंद्रांवर लसीकरण केले जाते. मनपाकडून आतापर्यंत पावणेदोन लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यात सुमारे 37 हजार लोकांना लसीचा दुसरा डोस मिळाला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मनपाच्या लसीकरणात सावळागोंधळ उडाला आहे. आठवड्यातून फक्त दोन-तीन दिवस लसीकरण होत असून इतर दिवशी लसीकरण मोहीम बंद राहत आहे.
केंद्रांवर दिसते गर्दीच गर्दी
मनपाकडून प्रत्येक केंद्रासाठी अवघे शंभर डोस उपलब्ध होत आहे. तर लस घेण्यासाठी केंद्रावर तीनशे-चारशे नागरिकांची गर्दी होतेे. दिवसभर केंद्रावर थांबूनही लस न घेताच नागरिकांना माघारी जावे लागत आहे. यात नागरिकांची हेळसांड होत आहे. नागरिकांना लसीसाठी केंद्रावर हेलपाटे मारावे लागत आहेत. आरोग्य विभाग व मनपा प्रशासनाच्या सावळ्या गोंधळाच्या कारभाराचा आरोग्य विभागातील कर्मचारी सुमारे सहा महिन्यांपासून सामना करीत आहेत. केंद्रांवर तोबा गर्दी होऊन हमरीतुमरीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रावरील कर्मचारी अक्षरश: वैतागले आहेत. या कर्मचार्यांना दुपारच्या वेळी जेवण करायलाही वेळ मिळत नाही. लसीकरण केंद्रावरील नाव नोंदणी रजिस्टरच्या ओढाओढीचे प्रकार घडत आहेत. मनपा प्रशासन व नगरसेवकांनाही या परिस्थितीचे काही देणे-घेणे नसल्याचे दिसून येत आहे. या सर्व परिस्थितीस जबाबदार कोण व नगरकरांना जाणीवपूर्वक वेठीस का धरले जात आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. लसीकरण सुरळीत होण्यासाठी व गर्दी कमी होण्यासाठी मनपाकडून उपकेंद्र का सुरू केले जात नाहीत, असा सवाल केला जात आहे.
करोना संसर्गाची भीती
लसीकरण केंद्रावर नागरिकांची झुंबड उडून रेटारेटीचे सुध्दा प्रकार घडत आहेत. याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. नागरिक आणि बहुतांश वेळा आरोग्य कर्मचार्यांकडूनही मास्कचा वापर केला जात नाही. लसीकरण केंद्रावरील या बेफिकिरीमुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका होऊ शकतो. मात्र, नियोजनबध्द लसीकरण मोहीम राबविण्याकडे मनपा आयुक्तांचे व आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे मनपा प्रशासन करते तरी काय, असा सवाल केला जात आहे.
COMMENTS