मनपाच्या संभाव्य घरपट्टी वाढीविरोधात ; शहर काँग्रेस एल्गार पुकारण्याच्या तयारीत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनपाच्या संभाव्य घरपट्टी वाढीविरोधात ; शहर काँग्रेस एल्गार पुकारण्याच्या तयारीत

अहमदनगर/प्रतिनिधी-महापालिकेच्या प्रशासनाने प्रस्तावित केलेला व मनपातील महाविकास आघाडीतील सत्ताधा़री शिवसेना व राष्ट्रवादीने महासभेच्या अजेंड्यावर लगे

कर्जतचे भूमिपुत्र हवालदार हिंमत जाधव यांचे अकाली निधन
अकोल्यात शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप
Ahmednagar : पोलिस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 17 गंभीर गुन्हे दाखल | LOKNews24

अहमदनगर/प्रतिनिधी-महापालिकेच्या प्रशासनाने प्रस्तावित केलेला व मनपातील महाविकास आघाडीतील सत्ताधा़री शिवसेना व राष्ट्रवादीने महासभेच्या अजेंड्यावर लगेच घेतलेल्या संभाव्य तिप्पट घरपट्टी वाढीच्या विषयाचे महासभेत काय होणार, हे दोन दिवसांनी स्पष्ट होणार असले तरी अशा वाढीची मानसिकता ठेवल्याच्या निषेधार्थ शहर काँग्रेसने मनपा सत्ताधारी व प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला आहे. तिप्पट करवाढीच्या प्रस्तावाच्या विरोधात शहर काँग्रेस नगरमध्ये 1 लाख नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबविणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी सांगितले तसेच या करवाढीला विरोध न करणार्‍या आमदार, मनपा पदाधिकारी व नगरसेवकांच्या दारावर निषेध पत्रकेही चिकटविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
येत्या गुरुवारी (12 ऑगस्ट) मनपाची ऑनलाईन महासभा होणार असून, यात शहराच्या घरपट्टीत तिप्पट वाढ करण्याचा विषय अजेंड्यावर घेण्यात आला आहे. या विरोधात शहर काँग्रेसने भूमिका जाहीर केली असून हा तिप्पट करवाढीचा प्रस्ताव रद्द करण्यात यावा, अशी मागणी मनपा आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
यासंदर्भात बोलताना शहर जिल्हाध्यक्ष काळे म्हणाले, मागील अडीच वर्षांच्या सत्ताकाळात आर्थिक नियोजन शून्यतेमुळे मनपा सत्ताधार्‍यांनी मनपाची पुरती वाट लावली आहे. दिवाळखोरीमुळे महापालिकेला कंगाल करणार्‍या सत्ताधार्‍यांनी तिप्पट करवाढीचा घाट घातला आहे. तिप्पट करवाढीचा प्रस्ताव मागे न घेतल्यास कोरोनामुळे आधीच पिचलेल्या सामान्य नगरकरांना वेठीस धरणारे मनपा सत्ताधारी आणि शहराच्या लोकप्रतिनिधींच्या या तुघलकी प्रस्तावाविरोधात काँग्रेसच्यावतीने घरोघरी जाऊन नगर शहरात 1 लाख नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रस्ताव आणलाच कसा?
याबाबत पुढे बोलताना काळे म्हणाले, कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षांपासून नागरिकांना मोठ्या संकटातून जावे लागत आहे. सततच्या लॉकडाउनच्या कडक निर्बंधांमुळे शहरातील व्यावसायिक, व्यापारी, हातगाडीवाले, फेरीवाले, नोकरदार, उद्योजक, मोलकरीण कामगार, औद्योगिक कामगार, रिक्षावाले, हातावर पोट भरणारे अशा सर्वच घटकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. मध्यमवर्गीय, गोरगरीब, धनिक अशा सगळ्यांचीच आर्थिक स्थिती हालाखीची आहे. ही वस्तुस्थिती माहिती असताना सुद्धा मनपा प्रशासनाच्या आडून तिप्पट करवाढीचा प्रस्ताव महासभेत सत्ताधार्‍यांकडून ठेवलाच कसा जातो, असा सवाल करून ते म्हणाले, मनपाने तिप्पट करवाढीचा प्रस्ताव रद्द न केल्यास काँग्रेसच्यावतीने शहरातील सर्व प्रभागांमध्ये नागरिकांच्या बैठका घेऊन करवाढीला विरोध केला जाईल. मनपाच्या या तुघलकी निर्णयाविरोधात नागरिक, व्यापारी, उद्योजक यांच्यामध्ये जनजागृती केली जाईल, असे ते म्हणाले.

दारावर लावणार निषेध पत्रके
नगर शहराच्या विकासासाठी एकत्र आल्याच्या वल्गना सातत्याने शहरात काही पुढारी करत असतात. पण, विकासासाठी नव्हे तर वैयक्तिक राजकीय स्वार्थासाठी एकत्र येणार्‍या या पुढार्‍यांनी स्वतःच्या राजकारणासाठी सर्वसामान्य नगरकरांना वेठीस धरण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. या पुढार्‍यांचे कार्यकर्ते असणार्‍या ठेकेदारांची बिले अदा करण्यासाठी मनपाकडे पैसे उरले नसल्यामुळे आता यांना करवाढ करून सामान्य नगरकरांच्या खिशातून पैसे काढत ठेकेदारांच्या घशात घालायचे असून यातून त्यांना टक्केवारी गोळा करायची आहे, असा आरोप काळे यांनी केला. पण, काँग्रेसचा याला तीव्र विरोध असून मनपा पदाधिकारी, नगरसेवक आणि मनपा सत्तेचे नेतृत्व करणारे शहराचे आमदार यांनी तिप्पट करवाढीच्या प्रस्तावास विरोध करीत तो रद्द करावा. अन्यथा, या प्रस्तावास विरोध न केल्याबद्दल शहराचे आमदार, मनपा पदाधिकारी, नगरसेवकांच्या दारावर निषेधाची पत्रके चिकटविणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. कर संकलन करून त्या माध्यमातून शहरातील नागरिकांना नागरी मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी ही मनपाची आहे. पण, इतर नागरी सुविधा तर जाऊ द्या पण साधे रस्ते सुद्धा करू न शकणार्‍या आणि नगरकरांना खड्ड्यात घालणार्‍यांना वाढीव कर का द्यायचा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सोयर्‍याधायर्‍यांची नुरा कुस्ती
नगर शहरामध्ये मनपा सत्ताधारी आणि विरोधक एक झाले आहेत. मनपात आता विरोधक असणारे भाजप मागील अडीच वर्ष राष्ट्रवादीबरोबर सत्तेत होते. त्यावेळी मनपातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असणार्‍या शिवसेनेला विरोधी पक्षनेते पद न देता ते राष्ट्रवादीने स्वतःकडे ठेवले होते. आता राष्ट्रवादीने सत्ता बदलाच्या चर्चेत भाजपाला विरोधी पक्षनेते पदाचा शब्द दिला असून शहरातील सोयरे-धायरे आता विरोधी पक्षनेते पदाचे नाव निश्‍चित करणार आहेत, असा दावा करून काळे म्हणाले, त्यामुळे नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करीत ही सोयर्‍या-धायर्‍याची नुरा कुस्ती सुरू असल्याने आज काँग्रेस सोडून तिप्पट घरपट्टी करवाढी विरोधात कोणताही प्रमुख पक्ष भूमिका घेत पुढे आलेला नाही. काँग्रेस हाच नगरकरांच्या हक्कांसाठी लढणारा आणि त्यांच्या मनातला खरा विरोधी पक्ष आहे. सामान्य नगरकरांचे करवाढ करून कंबरडे मोडले जात असताना शहराच्या आमदारांनी मात्र मूग गिळून गप्प बसणे पसंत केले आहे, अशी टीका काळे यांनी केली. पण, विरोधी पक्ष सत्ताधार्‍यांबरोबर असला तरी काँग्रेस मात्र सर्वसामान्य नागरिक आणि नगरकरांबरोबर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS