नवी दिल्ली : अनेक परंपरांनी समृद्ध अशा भारताच्या सर्वात मोठ्या आणि चैतन्यपूर्ण लोकशाहीच्या अद्वितीय यशाकडे जागतिक समुदाय आदरानं पाहत असल्याचे प्रतिपा
नवी दिल्ली : अनेक परंपरांनी समृद्ध अशा भारताच्या सर्वात मोठ्या आणि चैतन्यपूर्ण लोकशाहीच्या अद्वितीय यशाकडे जागतिक समुदाय आदरानं पाहत असल्याचे प्रतिपादन महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. देशाच्या 75 व्या स्वातंत्र्योत्सवाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी राष्ट्रपती म्हणाले की, स्वातंत्र्य लढ्यातील अनेकांचा त्याग, बलिदान, शौर्य आणि पराक्रमाच्या बळावर आजचा भारत मोकळा श्वास घेतोय. महात्मा गांधींच्या मार्गदर्शनात इंग्रजांच्या गुलामगिरीतून देश मुक्त झाला. सोबतच त्यांनी भारतीय जीवनमूल्ये आणि प्रतिष्ठेच्या पुनर्थापनेसाठी प्रयत्न केले. गेल्या 75 वर्षात देशाने प्रगतीचा मोठा टप्पा गाठला आहे. अनेक परंपरांनी समृद्ध अशा भारताच्या सर्वात मोठ्या आणि चैतन्यपूर्ण लोकशाहीच्या अद्वितीय यशाकडे जागतिक समुदाय आदराने पाहत असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.
मुलींना प्रगतीची दालने खुली करा
नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंचा उत्कृष्ट कामगिरीमुळे देशाचा लौकिक वाढला आहे. या स्पर्धेत मुलींनी सर्वाधिक पदके पटकावली आहे. भारतीय मुली अडचणींवर मात करत जागतिक पातळीवर आपले कर्तृत्त्व गाजवित आहेत. क्रीडा व इतर क्षेत्रात दर्जेदार कामगिरी करणाऱ्या मुलींकडे पाहुन देशातील सर्व माता-पित्यांनी आपल्या मुलींच्या प्रगतीच्या वाटा खुल्या करण्याची गरज असल्याचे आवाहन राष्ट्रपतींनी केले.
कोरोना काळात उत्तम कामगिरी
कोरोना संकटावर मात करण्यासाठी आपल्या वैज्ञानिकांनी खूप कमी वेळात लस तयार करण्याचे कठीण काम केले. त्यामुळेच या वर्षाच्या सुरुवातीला इतिहासातली सगळ्यात मोठी लसीकरण मोहीम सुरू होऊ शकली. तरीही विषाणूची नवी रूपे आणि इतर अकल्पित कारणांमुळे आपल्याला दुसऱ्या लाटेचा भयावह प्रकोप सहन करावा लागला. मला या गोष्टीचं खूप दुःख वाटतं की दुसऱ्या लाटेत बऱ्याच जणांचे प्राण वाचवता येऊ शकले नाहीत आणि अनेक लोकांना खूप अडचणी सहन कराव्या लागल्या. संपूर्ण देशाच्या वतीने आपल्या सर्व पिडीत कुटुंबांच्या दुःखात बरोबरीने सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले.
नेतृत्त्वाने आव्हान पेलले
कोरोना काळात देशाच्या नेतृत्वाने या आव्हानाचा कसून सामना केला. केंद्र सरकारच्या प्रयत्नांसोबतच, राज्य सरकारं, खाजगी क्षेत्रातल्या आरोग्य सुविधा, स्वयंसेवी संस्था आणि इतर सामाजिक गटांनीही आपलं सक्रिय योगदान दिलं. या असामान्य अभियानात, भारतानं ज्याप्रमाणे अनेक देशांना औषधं, उपकरणं आणि लसी पाठवल्या, त्याचप्रमाणे अनेक देशांनीही उदारपणे जीवनावश्यक वस्तू, आपल्याला पाठवल्याचा उल्लेख करत या मदतीबद्दल कोविंद यांनी जागतिक समुदायाचे आभार मानले. देशात 50 कोटींहून अधिक लोकांचे लसीकरण झाले असून उर्वरित लोकांनी देखील झटपट लस घेण्याचे आवाहन कोविंद यांनी केले.
सरकारकडून मदतीचा हात
या महासाथीचा परिणाम अर्थव्यवस्थेसाठीही तितकाच विनाशकारक आहे जेवढा लोकांच्या आरोग्यासाठी विनाशकारक ठरला आहे. सरकार गरीब आणि कनिष्ठ मध्यम वर्गाच्या गरजा लक्षात घेऊन सरकारनं गेल्या वर्षी त्यांना मदत पोहोचवण्यासाठी वेळीच पावलं उचलली होती. या वर्षीसुद्धा सरकारनं, मे आणि जूनमध्ये सुमारे 80 कोटी लोकांना अन्नधान्य उपलब्ध करून दिलं. आता हा मदतीचा कालावधी दिवाळीपर्यंत वाढवला आहे. याशिवाय कोविडच्या प्रभावामुळे मेटाकुटीला आलेल्या व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं नुकतीच 6 लाख 28 हजार कोटी रुपयांच्या प्रोत्साहन पॅकेजची सुद्धा घोषणा केली आहे. एक गोष्ट विशेष समाधानकारक आहे की वैद्यकीय सुविधांची उपलब्धता अधिकाधिक वाढवण्यासाठी एका वर्षभरातच तेवीस हजार दोनशे वीस कोटी रुपयांचा खर्च केला जात असल्याचे राष्ट्रपती म्हणाले.
काश्मिरात नवचैतन्य
जम्मू-काश्मीरमध्ये नवजागृती दिसून येत आहे. सरकारने, लोकशाही आणि कायद्याच्या राज्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व राजकीय पक्षांसोबत विचारविनिमयाची प्रक्रिया सुरू केली आहे. मी जम्मू-काश्मीरच्या नागरिकांना, विशेष करुन युवावर्गाला, या संधीचा लाभ उठवण्याची आणि लोकशाही संस्थांच्या माध्यमातून आपल्या इच्छापूर्तीसाठी कामाला लागण्याची विनंती त्यांनी केली. सर्वांगीण विकासाच्या दृश्य परिणामांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिष्ठा वाढत आहे. या बदलामुळे, प्रमुख जागतिक राष्ट्र गटांमध्ये असलेला आपला सहभाग,अधिक प्रभावी होत आहे, तसंच अनेक देशांशी असलेले आपले द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यावरणाची जागतिक आव्हाने
आधुनिक औद्योगिक संस्कृतीनं मानवजातीसमोर गंभीर आव्हानं उभी केली आहेत. समुद्रांच्या पाण्याची पातळी वाढत आहे. हिमनद-हिमकडे वितळत आहेत आणि पृथ्वीच्या तापमानात वाढ होत आहे. याच प्रमाणे हवामान बदलाची समस्या आपल्या जीवनावर परिणाम करत आहे. आपल्यासाठी अभिमानाची बाब ही आहे की भारतानं पॅरिस हवामानबदल कराराचं फक्त पालनच केलेलं नाही, तर हवामानबदलाच्या सुरक्षिततेसाठी निश्चित केलेल्या बांधिलकीत सुद्धा भारत जास्तीत जास्त योगदान देत असल्याचे त्यांनी अधोरेखीत केले. यावेळी त्यांनी देशासाठी प्राण संकटात घलणाऱ्या सैनिकांचे कौतुक केले आणि 2047 मध्ये स्वातंत्र्याच्या शताब्दीला देशाचे चित्र वेगळे असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
COMMENTS