भाजप-मनसेचा अ‍ॅडजेस्टमेंट ‘फॉर्म्युला’

Homeताज्या बातम्यासंपादकीय

भाजप-मनसेचा अ‍ॅडजेस्टमेंट ‘फॉर्म्युला’

मुंबईत आलेल्या परप्रांतियांवर नेहमीच हल्ला चढविणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये अ‍ॅडजेस्टमेंट युती होत असल्याची चर्चा आहे.

शिवनेरीतील सुंदरीचा घाट कशासाठी ?
सत्तेत असूनही शिवसेनची पिछेहाट
मेंदूचा वापसा झाला का ?


मुंबईत आलेल्या परप्रांतियांवर नेहमीच हल्ला चढविणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये अ‍ॅडजेस्टमेंट युती होत असल्याची चर्चा आहे. भाजपचे केंद्रीय ग्रामविकास मंत्री आणि भाजप खासदार कपिल पाटील यांनी यास दुजोरा दिला. महाराष्ट्र राज्यातील निवडणूकांबाबत भाजपचे केंद्रीय मंत्री ढवळा-ढवळ करत असल्याचे यामधून दिसून येत आहे. गेल्या महिन्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सकाळी-सकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थान चहा-पानासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी राज ठाकरे परप्रांतियांचा मुद्दा सोडणार आहेत का? मग कशी काय युती होणार असे पाटील यांनी वक्तव्य केले होते. मात्र, आज झालेल्या अ‍ॅडजेस्टमेंट ‘फॉर्म्युल्याच्या युतीचा अर्थ काय? असा सवाल जनता विचारणार यात नवल नाही.
राज ठाकरे आणि परप्रांतिय साप-मुंगसाचे वैर जनतेने पाहिले आहे. तर भाजपाकडून मतांच्या राजकारणासाठी केलेल्या खेळीमध्ये हा एक नवा डाव टाकण्यात आला असल्याचे यामधून दिसून येत आहे. भाजप सोबत युती केल्यास परप्रांतियांविरोधात मनसे कसे वर्तणूक करणार? येत्या काही दिवसात विविध विभागाच्या परिक्षा महाराष्ट्र राज्य सरकार घेत आहे. तसेच केंद्र शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदेही भरण्यासाठी परिक्षा होणार आहेत. मराठी माणूस मुंबईत रहावा, असा मनसेचा अजेंडा असल्याचे जनतेला भासविले जाते मात्र, खरोखर हे सर्व मराठी माणसासाठी मनसेकडून केले जात होते का? याचा आता सोक्ष मोक्ष लागणार आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये युती होणार का याबद्दल राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरु असताना दुसरीकडे पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकांसाठी भाजपा-मनसे एकत्र आल्याचे चित्र दिसत आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागांसंदर्भात महत्वाचा अंतिम निर्णय झाला असल्याची माहिती केंद्रीय ग्रामविकास मंत्री आणि भाजपा खासदार कपील पाटील यांनी दिली. पालघर जिल्ह्यातील 15 जिल्हा परिषद व 14 पंचायत समिती जागांसाठी 5 ऑक्टोबर रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसानंतर जिल्ह्यतील 144 उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी बहुरंगी लढती होत असून बहुतेक उमेदवारांची प्रचाराची पहिली फेरी संपली असल्याचे खा. कपील पाटील यांनी सांगितले. भाजपा-मनसेमध्ये थेट युती झाली नसली तरी आम्ही जागांसंदर्भात अ‍ॅडजेस्टमेंट ‘फॉर्म्युला’ अवलंबला असल्याचे समोर येत आहे. जागा वाटपास दोन्ही पक्षांनी समहती दर्शवली आहे. ज्या ठिकाणी भाजपाचा प्रभाव जास्त आहे तिथे मनसे उमेदवार देणार नाही आणि जिथे मनसेचा दबदबा आहे तिथे भाजपा उमेदवार देणार नाही, असा अ‍ॅडजेस्टमेंट ‘फॉर्म्युला’ बनविण्यात आल्याचे खा. कपील पाटील म्हणत आहेत. विकास आणि चांगल्या कामांसाठी मनसे सोबत जाण्यास काय हरकत आहे?, असा सवाल कपील पाटील यांनी उपस्थित केला. मात्र मनसेने जर परप्रांतियांचा मुद्दा उपस्थित करून दगाफटका केल्यास भाजपला मुंबई मनपामध्ये मोठा भोपळा मिळण्याची दाट शक्यता निर्माण होवू लागली आहे.
शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी जर सरकार बनवू शकत असेल तर आम्ही का नाही? असा विचार करून भाजपने मनसेसोबत मुंबई मनपा निवडणूक लढविण्यासाठी अ‍ॅडजेस्टमेंट ‘फॉर्म्युला’ अवलंबण्याचा निर्णय घेतल्याचे भाजपच्या खासदाराने स्पष्ट केले आहे. मात्र, परप्रांतियांचा मुद्दा राज ठाकरे सोडणार आहेत का? असे वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील याच्या मतानुसार राज ठाकरे मराठी माणसासाठी आपला आवाज वाढविणे सोडून देणार असल्याबाबतही काही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षासमवेत सरकार स्थापन करण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न भाजपने केला होता. त्यावेळी झालेल्या नाचक्कीचा भाजपला विसर पडल्याचे यामधून समोर येत आहेत. अन्यथा मनसेच्या नादाला लागून भाजपला मुंबई मनपा निवडणूकीत किमान खाते तरी खोलता येईल का? असा तज्ञांसमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. भाजपा व मनसेमध्ये झालेल्या समझोत्याचा मुंबई मनपा निवडणुकीचा अ‍ॅडजेस्टमेंट ‘फॉर्म्युला’ काम करणार का? हा एक प्रश्‍न निर्माण होत आहे.

COMMENTS