बोठे दाम्पत्याकडे बेनामी संपत्ती?…चौकशीची मागणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बोठे दाम्पत्याकडे बेनामी संपत्ती?…चौकशीची मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडातील आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे व त्याची पत्नी सविता बोठे यांच्या नावा

कॉ. कातोरेंवरील हल्ल्याच्या प्रतिकाराबद्दल माकपच्या कार्यकर्त्यांचे कौतुक : डॉ. अशोक ढवळे
कोपरगाव तहसील कार्यालयात 6 लाखाचा अपहार
कळसमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ

अहमदनगर/प्रतिनिधी- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडातील आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे व त्याची पत्नी सविता बोठे यांच्या नावावर असलेल्या बेनामी संपत्तीची चौकशी करून त्यांच्यावर योग्य कारवाई करावी, अशी मागणी मृत रेखा जरे यांचे चिरंजीव रुणाल भाऊसाहेब जरे यांनी आयकर विभागाच्या आयुक्तांकडे केली आहे.
जरे यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले की, बाळ जगन्नाथ बोठे व सविता बाळ उर्फ बाळासाहेब बोठे यांच्या नावावर बेनामी संपत्ती असल्याबाबत माहिती मिळाली आहे व त्यांची संपत्ती साधारणतः 1000 ते 1200 कोटी असण्याची शक्यता आहे तसेच बोठे याच्या नावे पुणे, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद यासह राज्यातही विविध ठिकाणी संपत्ती असल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय बाळासाहेब बोठे व त्यांची पत्नी सविता बाळासाहेब बोठे यांच्याव्यतिरिक्त त्यांच्या जवळच्या नातेवाईक, पाहुणे मंडळी, मित्र परिवार यांच्या नावे संपत्ती बेकायदेशीरपणे घेतलेली आहे, असा दावा जरे यांनी या पत्रात केला आहे.
बाळ बोठे हा पत्रकार ते संपादक या पदावर असताना एवढी मोठी संपत्ती गोळा करणे शक्य नाही. परंतु या पदाचा गैरवापर करून बोठे याने विविध शासकीय अधिकारी, पुढारी तसेच व्यापारी लोकांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून खंडणी स्वरुपात जमिनी स्वतःच्या व नातेवाईक व मित्र परिवार यांच्या नावे केली आहे, असाही दावा करून यात जरे यांनी पुढे म्हटले आहे की, तसेच विविध शासकीय कार्यालयामध्ये असणार्‍या कर्मचार्‍यांवर पाळत ठेवून त्यांना ब्लॅकमेल करून विविध ठिकाणी संपत्ती व बेहिशोबी पैसा गोळा केलेला आहे. त्याच पैशातून बाळ बोठे विविध देशांमध्ये फिरुन आलेला आहे. त्याच पैशांचा जोरावर लोकांवर दबाव निर्माण केला, असेही म्हणणे यात मांडण्यात आले आहे.
तसेच संपादक या पदाला साधारण किती पगार असू शकतो व त्यांच्या नावावर किती संपत्ती आहे, हा मोठा प्रश्‍न सामान्य नागरिकाला पडलेला आहे. या संपत्तीची विल्हेवाट लावण्याकरीता विविध डॉक्टर लोकांना हाताशी धरून महाराष्ट्रभर हॉस्पिटलमध्ये भागीदार म्हणून असल्याची चर्चा लोकांमध्ये व डॉक्टरांमध्ये आहे. तसेच पुणे, नाशिक येथील रियल इस्टेट व्यवसायामध्ये देखील मोठे प्रोजेक्ट सध्या चालू असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्याला असणारा महिना पगार व जमविलेली संपत्ती याच्यामध्ये विसंगती व तफावत दिसून येत आहे. बाळ ज. बोठे याची राजकीय क्षेत्रामध्ये सर्व पक्षीय नेत्यांशी जवळीक आहे, असे देखील समजले आहे. या संपत्तीची विल्हेवाट लावण्याकरीता त्याला साथ देणारे त्यांचे मित्र वकिलांचे देखील या व्यवहारात देवाण-घेवाण पाहणे, खरेदीखत करणे, तडजोडी करणे इत्यादी बाळासाहेब बोठे यांचे कायदेशीर व बेकायदेशीर कामे चालतात. त्यामुळे बाळ बोठे व त्याची पत्नी, मुले व त्यांचे नातेवाईक व मित्र परिवारांच्या नावे बेनामी मालमत्तेची आपल्यामार्फत सखोल चौकशी होऊन बेकायदा जमविलेल्या मालमत्तेची जप्ती करण्यात यावी व योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जरे यांनी केली आहे.

COMMENTS