बार मालकांकडून मिळालेल्या वसुलीचा पैसा अनिल देशमुखांनी चॅरिटेबल ट्रस्टकडे वळवला, ईडीचा दावा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बार मालकांकडून मिळालेल्या वसुलीचा पैसा अनिल देशमुखांनी चॅरिटेबल ट्रस्टकडे वळवला, ईडीचा दावा

मुंबईतील बार, पब मालकांकडून वसूल केलेले कोट्यवधी रुपये निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना दिले होते.

चंद्रपूरमध्ये मजुरांच्या बसचा भीषण अपघात
पुण्यातील तरुणीची ऑनलाइन टास्कच्या नावाने फसवणूक
चोरी गेलेला 9 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी फिर्यादींकडे  केला सुपूर्द

मुंबई : मुंबईतील बार, पब मालकांकडून वसूल केलेले कोट्यवधी रुपये निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना दिले होते. पुढे देशमुखांनी त्यातील ३.१८ कोटी रुपये हवालामार्फत दिल्लीला पाठवून पुन्हा नागपुरात चॅरिटेबल ट्रस्टकडे वळवले, असा महत्त्वपूर्ण दावा शनिवारी ईडीने न्यायालयात केला.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटी रुपयांच्या आरोपांनंतर वेगवेगळी माहिती समोर येत आहे. अधिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार ईडीने दावा केला आहे की, वाझेने देशमुख यांच्या सांगण्यावरून डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये मुंबईतील विविध पब, बारच्या मालकांकडून सुमारे ४.७० कोटी रुपये वसूल केले. सदर रक्कम वाझेने देशमुखांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना दिली. त्यानंतर या रकमेतील ३.१८ कोटी रुपये दिल्लीतील दोन व्यक्तींना हवालाद्वारे पोच केली. त्या दोघांनी बोगस कंपन्या आणि देशमुखांनी त्यांचा मुलगा ऋषिकेशच्या माध्यमातून तो पैसा नागपूरच्या श्री साई शिक्षण संस्था ट्रस्टमध्येे वळवला. या व्यवहारांमध्ये कुंदन शिंदेचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचेही न्यायालयाला सांगितले.

सचिन वाझेच्या जबाबाच्या आधारे ईडीचे दावे

सचिन वाझेने दिलेल्या जबाबात असेही सांगितले की, देशमुख यांनी काही प्रकरणांच्या तपासाबाबत थेट सूचना दिल्या होत्या. तसेच एका बैठकीत देशमुख यांनी शहरातील बार, पब मालकांकडून वसुली करण्यासही सांगितले. त्यासाठी शहरातील बार मालकांची बैठक घेतली. यावर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात दक्षिण, मध्य मुंबई आणि पूर्व उपनगरांतील ऑर्केस्ट्रा बारकडून एक कोटी ६४ लाख, तर पश्चिम उपनगरांतील बारकडून दोन कोटी ६६ लाख रुपये गोळा केले. त्याशिवाय गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात जया पुजारी आणि महेश शेट्टी या बार मालकांनी अन्य बारच्या माध्यमातून ४० लाख रुपये ‘गुड लक’ म्हणून दिले होते. ही सर्व रक्कम देशमुख यांचे स्वीय सहायक कुंदन शिंदे यांच्या हवाली केली होती.

 

COMMENTS