फुसका लेटरबाँब

Homeसंपादकीयदखल

फुसका लेटरबाँब

ज्या आमदारावर परागंदा होण्याची वेळ भाजपमुळं आली, त्यानंच आपल्या नेत्याला भाजपशी जुळवून घेण्याचा सल्ला द्यावा, यात पाणी कुठंतरी मुरतं आहे, असा संशय घ्यायला जागा आहे. सरकार एका आमदाराच्या सल्ल्यावर चालत नसतं.

संवैधानिक पदावरून अराजकता थांबवा !
बॅलट उरले फक्त स्मृती पटलावर ! 
चाचणी घोटाळ्यातील कंपनी भाजपशी संबंधित

ज्या आमदारावर परागंदा होण्याची वेळ भाजपमुळं आली, त्यानंच आपल्या नेत्याला भाजपशी जुळवून घेण्याचा सल्ला द्यावा, यात पाणी कुठंतरी मुरतं आहे, असा संशय घ्यायला जागा आहे. सरकार एका आमदाराच्या सल्ल्यावर चालत नसतं. कळसुत्री बाहली दुसर्‍याच्या इशार्‍यावर नाचते; परंतु ती दुसर्‍याला आपल्या इशार्‍यावर नाचवू शकत नाही. आमदार प्रताप सरनाईक यांचं पत्र याच कुळात मोडणारं आहे. 

    पंतप्रधान नरेंद्र यांची आठ तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकांतात भेट घेतात आणि दुसर्‍याच दिवशी आमदार प्रताप सरनाईक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहितात, हा निव्वळ योगायोग, की कुणी नेपथ्य रचून घडविलेलं नाट्य? मनी लॉड्रींग प्रकरणात सरनाईक यांच्यावर ईडीची कारवाई सुरू आहे. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना या कारवाईला सामोरं जावं लागतं आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सरनाईक बेपत्ता आहेत. ईडीनं त्यांच्या फॉर्म हाऊसवर छापे टाकले. किरीट सोमय्या यांनी तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सरनाईक यांना मातोश्रीवर लपवून ठेवल्याचा आरोप केला आहे. अशा वेळी सरनाईक यांचं पत्र बाहेर येतं, याचंही काही टायमिंग आहे. ज्या आमदारांवर कारवाईची टांगती तलवार आहे, ही कारवाई कुणामुळं होतं आहे, हे ज्यांना माहीत आहे, त्या आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भारतीय जनता पक्षाशी युती करावी, असा सल्ला द्यावा, हे आश्‍चर्यकारक वाटत असलं, तरी ती त्यांची वैयक्तिक मजबुरी आहे. या पत्राला काही तरी वेगळा अर्थ आहे. हे पत्र लिहिण्यामागं वेगळंच कारण असण्याची शक्यता आहे. या पत्राचा बोलविता धनी ईडी असली पाहिजे किंवा व्याहीप्रेम तरी असलं पाहिजे. सरनाईक यांच्या मुलाचं लग्न भाजपचे आमदार डॉ रणजीत पाटील यांच्या मुलीशी झालं आहे. त्यामुळं आ. पाटील यांच्यामार्फत तर त्यांच्यावर हे पत्र लिहून भाजपशी पुन्हा सोयरीक करायला सांगितलं जात नाही ना, अशी शंका घ्यायला जागा आहे. सरनाईक यांच्या पत्रानं भाजपच्या काही नेत्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आणि महाराष्ट्रात जणू सत्तेत आल्याचा भास झाला असला, तरी तो 24 तासही टिकला नाही. खरंतर पत्र बाहेर आल्यानंतर अवघ्या काही तासांत खासदार संजय राऊत यांनी सरनाईक यांच्यावर ही वेळ कुणी आणली, त्यांची चौकशी करण्याची मागणी केली, तर ज्यांच्यामुळं सरनाईक यांच्यावर ही वेळ आली, त्या किरीट सोमय्या यांनी सरनाईक यांनी पत्र लिहिलं असलं, तरी त्यांना खडी फोडायला जावंच लागेल, असा न्यायाधीशी पवित्रा घेतला. या दोघांच्या प्रतिक्रियाच सरनाईक यांच्या पत्रातील दारूगोळा निष्प्रभ ठरविणार्‍या होत्या. हे पत्र जसं भाजपशी जुळवून घेण्याचा सल्ला देणारं होतं, तसंच ते भाजपमुळंच आपल्यावर ही वेळ आली, हे सांगायलाही सरनाईक  विसरले नाहीत. भाजपच्या नेत्यांना जरी त्या पत्रातील जखमेवरचं मीठ कळले नसलं, तरी राऊत यांना ते कळलं. या पत्रात सरनाईक यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर काही आरोप केले आहेत; परंतु अलीकडच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेच्या कुणालाही आपल्या पक्षात सामावून घेतलं नाही, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निदर्शनास आणून दिलं. सरनाईक यांच्या मजकूर आणि त्यातला भावार्थ समजून घ्यायला हवा तसंच त्यांच्या पत्रामुळं सरकारला कोणताही धोका नाही, हे त्यांनी स्पष्ट केलं होतं. उलट, नागपूरमध्ये भाजपनं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सामावून घेऊन मुक्ताईनगरची परतफेड केली. आतापर्यंत काँग्रेसचे आमदार आपली कामं होत नसल्याची तक्रार करीत होते. आता तीच तक्रार सरनाईक यांनी केली आहे. खरंतर शिवसेनेच्या आमदारांना उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, अनिल परब यांच्यासारख्या पक्षाच्या सरकारमधील प्रमुखांकडं तक्रार करण्याला जागा असताना त्यांनी सरनाईक यांच्यांशी ते बेपत्ता असताना कधी आणि कसा संपर्क साधला, या प्रश्‍नांची उत्तरं मिळत नाहीत. पक्षनेतृत्वावरचा आमदारांचा विश्‍वास उडाला, की काय, असं या पत्रावरून वाटण्याचा संभव आहे; परंतु हे पत्र म्हणजे शिवसेनेच्या अन्य आमदारांच्या भावनांचं प्रतिबिंब नव्हे, हे समजून घ्यायला हवं. आपला पक्ष जर कोणी कमकुवत करत असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेलं बरं असं सरनाईक यांचं मत त्यांना तरी पटतं का, याचं त्यांनीच चिंतन करायला हवं. शिवसेनेचं जेवढं नुकसान भाजपनं मुंबई, कल्याण, नाशिकसह अन्य महापालिकेच्या निवडणुकीत केलं, तेवढं अन्य कुणीच केलं नाही. आता या महापालिकांच्या निवडणुका तोंडावर असताना सरनाईक यांचा जुळवून घेण्याचा सल्ला त्यांच्या सुपीक डोक्यातून नक्कीच निघालेला नाही. त्यांचा कळसुत्री बाहुलीसारखा वापर करून घेणार्‍यांचा हा सल्ला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये एकीकडं काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये स्वबळावर निवडणूक लढविण्यावरून टोलेबाजी सुरू आहे, तर दुसरीकडं आता सरनाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर पक्ष फोडत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळंच सरनाईक यांच्या या पत्रामुळं महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल राहणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. सरनाईक यांच्या पत्रामुळं सरकार अस्थिर होईल का, अशीही चर्चा सुरू आहे. अर्थात ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वर्धापनदिनातील भाषणानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सूर बदलला असून, ठाकरे यांच्याबरोबर सरकारमध्ये राहिलेला काळ पूर्ण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सूर मध्यंतराचा काही काळ वगळला, तर चांगलेच जुळले आहेत. त्यामुळं सरनाईक यांच्या पत्रामुळं सरकार अस्थिर होण्याची अजिबात शक्यता नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य पाहिलं, तर शिवसेना व भाजप इतक्यात तरी एकत्र येण्याची शक्यता नाही. त्यामुळं सरकारला धोका संभवत नाही.

सरनाईक यांच्या पत्रात विसंगती पुरेपूर भरली आहे. एकीकडं मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांनी केलेल्या कामाचं कौतुक करायचं आणि दुसरीकडं मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सहकार्याशिवाय ठाकरे चांगलं काम करू शकतील का, याकडं मात्र दुर्लक्ष करायचं. सरनाईक यांच्या पत्राचा महाविकास आघाडीवर काय परिणाम होईल, हा प्रश्‍न निर्माण होणं स्वाभावीक आहे. एका आमदाराच्या मागणीमुळं सत्ता बदलाचा निर्णय होत नाही. सरनाईक यांनी हे पत्र केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा थांबवण्यासाठी लिहिलं असावं, असा अंदाज आहे. सत्ता बदलासाठी चारही बाजूंनी विचार करावा लागतो. पुढच्या वर्षी मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. 27 जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आहेत. अशावेळी शिवसेनेनं भाजपची साथ सोडली, तर त्यात दोन्ही काँग्रेसपेक्षा शिवसेनेचं नुकसान जास्त आहे. ते न समजण्याइतकी शिवसेना दुधखुळी नाही. फक्त मित्रपक्षांवर दबाव आणण्याची खेळी म्हणून या पत्राचा वापर केला जात आहे, इतकंच. कोणत्याही पक्षाच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप करणं, हे काँग्रेसचं काम नाही. त्यामुळं त्यांच्या पक्षाचा तो प्रश्‍न त्याचा आमच्याशी काही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणावर दिली. दुसरीकडं या संपूर्ण प्रकरणामागं भाजपचा हात असल्याचाही आरोप केला जात आहे. भाजपनं ईडीच्या माध्यमातून सरनाईक यांच्यावर दबाव टाकल्यानं त्यांनी हे पत्र लिहिलं, असा अंदाज काही तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांनी हे आरोप फेटाळले असले, तरी हे पत्र जाहीर होताच चंद्रकांतदादांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या, सरकारवर कडवट टीका करणार्‍या राणे यांनाही नवं सरकार येण्याची स्वप्न पडायला लागली होती, त्यांचं काय?

COMMENTS