नगर अर्बन बँकेची परिस्थिती अतिशय दयनीय झालेली आहे व याला जबाबदार प्रशासन आहे.
अहमदनगर/प्रतिनिधी- नगर अर्बन बँकेची परिस्थिती अतिशय दयनीय झालेली आहे व याला जबाबदार प्रशासन आहे. ऑडिट रिपोर्ट दिला जात नाही, माहिती लपवली जाते, वसुली होत नाही, 70 टक्के इतका एनपीए झालेला आहे, याला जबाबदार कोण? सभासदांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात व वेळकाढूपणा केला जातो, प्रशासकांना बँक वाचवायची नाही, असा आरोप नगर अर्बन बँक बचाव कृती समितीने बुधवारी केला.
बँकेचे प्रशासक महेंद्र रेखी व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश शिंगटे यांच्यात व बँक बचाव कृती समितीचे प्रमुख माजी संचालक राजेंद्र गांधी, पोपट लोढा व अन्य सदस्यांमध्ये जोरदार वादंग व हमरीतुमरी प्रशासकांच्या दालनात झाली. जिल्हाभर हा विषय बुधवारी चर्चेत होता. नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील बोगस सोनेतारण कर्ज वितरणाचा बुधवारी पर्दाफाश झाला. तेथील 364 सोनेतारण पिशव्यांपैकी उघडलेल्या पाच पिशव्यांमध्ये बेन्टेक्सचे दागिने निघाले. त्यामुळे बँकेने या पिशव्यांचा लिलाव स्थगित केला. या पार्श्वभूमीवर नगर अर्बन बँक बचाव कृती समितीने बँकेचे प्रशासक रेखी यांच्या दालनात लगेच धरणे आंदोलन केले. यावेऴी त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले व त्यावरून वादंग झाले. त्यानंतर दोन्ही बाजूंकडून पोलिसांकडे धाव घेण्यात आली. त्यामुळे या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल होण्याची शक्यता आहे.
एकमेकांच्या अंगावर गेले धावून
नगर अर्बन बँकेची परिस्थिती अतिशय दयनीय झालेली आहे व याला जबाबदार प्रशासन आहे. सभासदांना ऑडिट रिपोर्ट दिला जात नाही, त्यांच्यापासून माहिती लपवली जाते, थकबाकीदारांकडून वसुली होत नाही, 70 टक्के इतका एनपीए झालेला आहे, याला जबाबदार कोण असे विविध प्रश्न उपस्थित करून प्रशासक रेखी व बचाव समितीच्या सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी प्रशासकांच्या दालनात झाली. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. यावेळी नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे राजेंद्र गांधी, वकील अच्युत पिंगळे, मनोज गुंदेेचा, पोपट लोढा, बहिरनाथ वाकळे, ऋषिकेश आगरकर, अनिल गट्टाणी, प्रमोद मोहळे आदी उपस्थित होते. बचाव कृती समितीने, आम्ही बँकेचे नुकसान होऊ देणार नाही, कर्मचार्यांचे नुकसान होऊ देणार नाही, आम्हाला आमचे उत्तर द्या, असे म्हणत दालनामध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले. अनेक प्रश्न असताना आम्हाला उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, त्याला जबाबदार कोण असा सवाल प्रशासक रेखी यांना विचारण्यात आला, यानंतर केबिनमध्ये एकमेकांमध्ये हमरीतुमरी जोरदार झाली, जर आम्हाला तुम्ही अरेरावीची भाषा करत असाल तर आम्ही सुद्धा या बँकेचे सभासद आहोत, हे लक्षात ठेवा. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत आम्ही तुम्हाला सोडणार नाही, असे म्हणत अधिकार्यांना पाठीशी घालण्याचे काम प्रशासन करत आहे, असा गंभीर आरोप सुद्धा समितीने यावेळी केला. दरम्यान, प्रशासकांच्या दालनात सुरू असलेल्या गोंधळानंतर तब्बल दोन तासाने कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस बँकेच्या आवारामध्ये दाखल झाले व त्यांनी दोन्ही बाजूंकडील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण तो त्यावेळी थांबला व दोन्ही बाजूंकडून पोलिसात तक्रार देण्याची भूमिकाही घेण्यात आली.
शाब्दिक वाद रंगले
तुम्ही पोलिसांना बोलवा वा अन्य कोणाला बोलवा, आता आम्ही घाबरत नाही. आम्ही सत्याच्या बाजूने आहोत, असे सांगत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमची भूमिका सोडणार नाही, असे बचाव समितीच्यावतीने सांगण्यात आले. यावरून शाब्दिक खडाजंगी उडाली. प्रशासक रेखी यांनी, मी प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहे, मात्र, तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या असे सांगितले. पण, समितीच्या वतीने आम्ही जे प्रश्न विचारले, त्याला तुम्ही बगल देत आहात, कोणतेही उत्तर द्यायला तयार नाही. तुम्हाला दोन लाख रुपये पगार मिळतो तर तुम्ही आम्हाला येथे दररोज तुम्ही इथे येऊन बसा असे सांगता. आम्ही बँकेच्या संरक्षणासाठी यायला तयार आहोत, पण तुम्ही पगार घेतात व आम्हाला पुढे करत आहे, असे म्हणत माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले व वाद पेटला. पोपट लोढा म्हणाले, ऑडिट रिपोर्ट द्या अशी मागणी केली होती मात्र कुणीही ती द्यायला तयार नाही. उलट, मलाच लेखी पत्र देऊन हे तुम्हाला देता येत नाही असे सांगितले. मग तुम्हाला (प्रशासक) काय अधिकार असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला तर तुम्हाला ऑडिट रिपोर्ट द्यायचा नाही तर तुम्हाला प्रशासनाला पाठीशी घालायचे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केल्यावर तिथेच चांगलाच वाद झाला. सन 2016-17 या वर्षात संचालक मंडळाने कर्ज दिले आहे, पण कागदपत्रे का पाहिले नाही? अधिकारी याला जवाबदार आहे, या सर्वांनी मिळून फ्रॉड केला, असा आरोप गांधी यांनी केला. प्रमोद मोहळे, यांनी मार्केटयार्ड शाखेत घोळ झाला याला जबाबदार कोण आहे? तुम्ही फिर्याद लवकर दाखल केली नाही, आपण व ऑफिसर काय करत होते,अनेकांना सोडून दिले, असा दावा त्यांनी केला. यावेळी बँकेचे अधिकारी सतीश शिंगटे यांनी तुम्हाला जर काही आमच्या बाबी पसंत पडत नसतील तर तुम्ही न्यायालयात जा, असे सांगितल्यावर पुन्हा एकदा वादंग झाले व एकमेकांना अरेरावीची भाषा करत जोरदार खडाजंगी झाली. अखेरीला प्रशासक रेखी यांनी या ठिकाणाहून काढता पाय घेतला व त्या बँकेत त्यांच्या दालनाशेजारी असलेल्या एका केबिनमध्ये जाऊन बसले. त्याच वेळेला कोतवाली पोलिस या ठिकाणी आले व त्यानंतर थोडा वाद थांबला.
COMMENTS