कर्जत : किरण जगताप कर्जतमध्ये नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपा आणि राष्ट्रवादीकडून निवडणुकीची जोरदार तयार
कर्जत : किरण जगताप
कर्जतमध्ये नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपा आणि राष्ट्रवादीकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील व प्रमुख नेत्यांनी सक्रिय होत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. मंत्री थोरात यांनी काँग्रेसचे नेते प्रवीण घुले यांच्या नेतृत्वाखाली कर्जत नगरपंचायतमध्ये सर्व १७ जागांवर उमेदवारांची तयारी करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता काँग्रेसही ॲक्टिव्ह मोडमध्ये आली आहे.
नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची महाविकासआघाडी होणार की हे पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार याबाबत सध्यातरी स्पष्टता होताना दिसत नाही. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि आ. रोहित पवार यांच्यातील चर्चेनंतर याबाबतचा फॉर्मुला ठरणार असल्याचे समजते. महाविकासआघाडीबाबत आ. रोहित पवार हे सकारात्मक आहेत.
त्यांनी एका कार्यक्रमात कर्जतमध्ये महाविकासआघाडी होणार असल्याचे सूचित केले आहे. काँग्रेसच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांचीही वेगळी भूमिका दिसत नाही. मात्र वाटाघाटीत कोणत्या वार्डात कोण उमेदवार हे निश्चित होईल. त्यासाठी सर्व पक्षांकडे आपापले उमेदवार असणे गरजेचे आहे. त्यामुळे थोरातांनी १७ उमेदवार तयार ठेवण्याबाबत सुचित केल्याचे दिसते.
COMMENTS