अहमदनगर/प्रतिनिधी- सोनईच्या मुळा एज्युकेशन संस्थेशी संबंधित संस्थेतील कर्मचारी प्रतीक काळे याने केलेल्या आत्महत्येशी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख संब
अहमदनगर/प्रतिनिधी- सोनईच्या मुळा एज्युकेशन संस्थेशी संबंधित संस्थेतील कर्मचारी प्रतीक काळे याने केलेल्या आत्महत्येशी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख संबंधित असल्याचे बोलते जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रतीक काळे आत्महत्या प्रकरणी मंत्री शंकरराव गडाखांची चौकशी करा, अशी मागणी नेवाशाचे भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केली असून, यासाठी वंचितच बहुजन आघाडीसमवेत त्यांनी सोमवारी (1 नोव्हेंबर) पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, प्रतीक काळे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी चारजणांना अटक केली असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.
मुळा एज्युकेशन संस्थेशी संबंधित संस्थेत नोकरी करणार्या प्रतीक काळे या युवकाने 29 ऑक्टोबर रोजी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने त्याला होणार्या त्रासाची माहिती देणारा व्हीड़ीओ तयार करून तो सोशल मिडियात व्हायरल केला होता. या व्हीडीओमुळे तसेच नंतर त्याने केलेल्या आत्महत्येमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. त्याच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन व त्यांच्यासमवेत नेवाशाचे माजी आ. मुरकुटे यांनीही उपस्थित राहून प्रतीक काळेच्या आत्महत्येशी मंत्री गडाखांचा संबंध असल्याचा दावा केल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे.
मुरकुटे व वंचित आक्रमक
प्रतीक काळे आत्महत्या प्रकरणात मंत्री शंकरराव गडाखांची चौकशी करा, अशी मागणी नेवाशाचे माजी आमदार मुरकुटे यांनी केली असून, या मागणीसाठी नेवासे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसमवेत त्यांनी सोमवारी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन केले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे नगर-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. प्रतीक काळे आत्महत्या प्रकरणी पोलीस दबावात असून, आत्महत्या करण्यापूर्वी प्रतीकने व्हाट्सअॅप मेसेज व ऑडिओ-व्हिडीओ क्लिपमध्ये जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, त्यांच्या पत्नी, तसेच भाऊ विजय गडाख यांचीही नावे घेतली आहेत. त्यामुळे या प्रकरणी शंकरराव गडाख यांची पोलिसांनी चौकशी करावी, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री शंकरराव गडाख यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी माजी आमदार मुरकुटे यांनी यावेळी केली. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय सुखदान यांच्यासह दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे, उत्तर जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, जिल्हा महासचिव योगेश साठे, सुरेश कोडलकर, मनोज साळवे, प्रवीण आल्हाट, फिरोज पठाण, संजय जगताप, गौतम पगारे, अमर निरभवणे, डॉ. जालिंदर घिगे, सुमित मकासरे, महेश पाखरे सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना माजी आमदार मुरकुटे यांनी गडाख कुटुंबावर विविध आरोप केले. मागील वर्षी गडाख कुटुंबातील एका महिलेने आत्महत्या केली होती. त्याचे पुढे काय झाले, यावर पोलीस प्रशासनाने प्रकाश टाकावा आणि प्रतीक काळे आत्महत्या प्रकरणी मंत्री असले म्हणून शंकरराव गडाख यांच्या दबावात न येता कार्यवाही करून चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय सुखदान यांना जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्याकडून त्रास होत असल्याचा निषेध करून पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. मंत्री गडाख यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
चौघांना झाली अटक
मुळा एज्युकेशन संस्थेमध्ये क्लार्क म्हणून नोकरीस असलेल्या प्रतीक काळे याने 29 ऑक्टोबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून सात जणांंवर गुन्हा दाखल असून यातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने एक व्हिडिओ तयार केला असून तो व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्याने संस्थेतील वरिष्ठ अधिकारी आणि संस्थाचालक म्हणून गडाख कुटुंबातील काही सदस्यांची नावे घेतल्याचे सांगितले जात आहे. प्रतीकची बहीण प्रतीक्षा बाळासाहेब काळे हिच्या तक्रारी वरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुळा एज्युकेशनमधील पाच आणि मुळा साखर कारखान्यातील दोन अशा सात जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या आत्महत्याप्रकरणी चार जणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये महेश कदम, विनायक देशमुख, राहुल राजळे, व्यंकटेश बेल्हेकर यांचा समावेश आहे.
COMMENTS