प्रशासनाने यात्रांवर बंदी घातलेली असताना वाई तालुक्यातील बावधन येथे नियमांचे उल्लंधन करून बगाड मिरवणूक काढल्याप्रकरणी 104 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यापैकी 83 जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले.
104 जणांवर गुन्हा दाखल; 83 जणांवर अटकेची कारवाई
वाई / प्रतिनिधी : जिल्हा
प्रशासनाने यात्रांवर बंदी घातलेली असताना वाई तालुक्यातील बावधन येथे नियमांचे उल्लंधन करून बगाड मिरवणूक काढल्याप्रकरणी 104 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यापैकी 83 जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. बगाड गावात पोचल्यानंतर मंदिरातून आलेल्या 25 ते 30 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर दिवसभर बावधन येथे पोलिसांनी धरपकड सुरू केली होती. तहसीलदार रणजित भोसले यांनी याबाबतची तक्रार दिली असून, बगाडावर उभे असलेले आणि बैल ओढणारे मानकर्यांवर गुन्हा दाखल केला. दोन ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने यात्रेवर घातलेले निर्बंध धुडकावून काशिनाथाच्या नावाचं चांगभलंच्या गजरात आणि सनई वाजंत्रीच्या निनादात बावधन (ता. वाई) येथील ग्रामदैवत भैरवनाथाच्या बगाडाची मिरवणूक शुक्रवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात झाली. संपूर्ण गावात संचारबंदी आणि प्रतिबंधित क्षेत्र असताना ग्रामस्थांनी अत्यंत गोपनियता पाळून गमिनी काव्याने बगाड यात्रेची शेकडो वर्षांची परंपरा जपली.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी सर्व यात्रा-जत्रांना जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यानुसार बावधनची बगाड यात्रा रद्द करण्याचा आदेश प्रांताधिकार्यांनी दिला होता. त्याशिवाय जिल्हाधिकार्यांनी संचारबंदीचा आदेश जारी केला होता. याबाबत स्थानिक प्रशासनाने ग्रामपंचायत कार्यालयात बैढक घेऊन तशा ग्रामस्थांना सूचना दिल्या होत्या. दरम्यान, गावात कोरोना रुग्ण आढळल्याने संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. गेली आठ दिवस गावात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. सपोनिच्या मार्गदर्शनाखाली जलद कृती दलाची एक तुकडी व आवश्यक पोलिस असा मोठा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता. बगाड मिरवणूक पाहण्यासाठी व देवदर्शनासाठी बगाड मार्गावर रस्त्यांच्या दुतर्फा हजारो भाविकांनी गर्दी केली होती. त्यामुळे पोलीस आणि स्थानिक प्रशासन हतबल झाले होते.
बगाड निघाल्याची माहिती मिळताच सकाळपासून अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर- चौगुले, तहसीलदार रणजित भोसले, पोलिस उपअधीक्षक शीतल जानवे-खराडे, पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्यासह महसूल व पोलिस प्रशासनातील अधिकारी परिस्थितीचा आढावा घेत होते. ग्रामस्थांबरोबरील संघर्ष टाळण्यासाठी प्रशासनाने बगाड गावात येऊ दिले. सकाळी साडेनऊच्या सुमारास बगाड गावातील भैरवनाथ मंदिराजवळ पोचले. मंदिरातील धार्मिक विधी झाल्यानंतर बगाड मिरवणुकीचा समारोप झाला. त्यानंतर मंदिरातून आलेल्या 25 ते 30 जणांना पोलिसांनी शासनाच्या आदेशाचा व नियमांचा भंग केल्याप्रकरणी ताब्यात घेतले. त्यानंतरही दिवसभर धरपकड सुरू होती. अनेकांवर संचारबंदी व आपत्कालीन कायद्याचा भंग केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले. शासनाच्या नियमानुसार संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांनी दिली.
COMMENTS