नवी दिल्ली : केंद्र सरकारने पूरग्रस्त शेतकर्यांसाठी तब्बल 701 कोटी मदतीची घोषणा केली आहे. मात्र ही मदत गेल्यावर्षी पावसाने नुकसान झालेल्या पिकांच्या
नवी दिल्ली : केंद्र सरकारने पूरग्रस्त शेतकर्यांसाठी तब्बल 701 कोटी मदतीची घोषणा केली आहे. मात्र ही मदत गेल्यावर्षी पावसाने नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईसाठी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून जून-ऑक्टोबर 2020 मध्ये आलेल्या पूरासाठी महाराष्ट्राला 701 कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली.
राज्यात जून-ऑक्टोबर 2020 मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. याचा फटका हा राज्यातील शेतीलाही बसला होता. पुराचे पाणी शेतात आल्याने प्रवाहाच्या वेगात ही पिकेही वाहून गेली आहेत तर काही ठिकाणी पाणी साचून राहिल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
गेल्या वर्षी मराठवाडा विशेषत: उस्मानाबाद आणि परभणी येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेती व बागायती पिकांच्या प्रश्नावर सरकारने लोकसभेत उत्तर दिले आहे. जून-ऑक्टोबर 2020 मध्ये झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, एनडीआरएफकडे आर्थिक मदतीसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने निवेदन सादर केले होते. याची नोंद घेत केंद्र सरकारने ही मदत जाहीर केली आहे.
दरम्यान, या वर्षीदेखील महाराष्ट्रातील कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले असून, दरडी कोसळून 200 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांचे मृतदेह देखील सापडले नाही. तसेच अनेकांचे संसार उघडयावर आले असून, व्यापार्यांच्या मालाचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. याचा फटका हा राज्यातील शेतीलाही बसला आहे. पुराचे शेतात घुसल्याने प्रवाहाच्या वेगात ही पिकेही वाहून गेली आहेत तर काही ठिकाणी पाणी साचून राहिल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने मदत करण्याची मागणी राज्यातून होतांना दिसून येत आहे. गुजरातमध्ये आलेल्या वादळानंतर मोदी सरकारने तात्काळ एक हजार कोटी रुपयांची मदत केली होती. मात्र महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी केंद्र सरकारने अजून कोणत्याही मदतीची घोषणा केलेली नाही.
दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी देखील विरोधी पक्षाने सभागृहात गोंधळ घातल्यामुळे कामकाज स्थगित करावं लागलं. सभापती ओम बिर्ला यांनी विरोधकांना वारंवार कार्यवाहीत सहभागी होण्याचं आवाहन केलं मात्र, प्रश्नोत्तराचा तास खूप वेळा तहकूब करावा लागला. त्यानंतर दुपारी 4 वाजता सभागृहाचे कामकाज सुरु करण्यात आले. या सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीमध्येच केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी महाराष्ट्रात सध्या आलेल्या पुराबद्दल वक्तव्य केले.
विरोधकांचा खरा चेहरा समोर आणा : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक घेतली. यावेळी संसदेच्या कामकाजात काँग्रेस अडथळा आणत असल्याचा आरोप मोदींनी केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस संसदेचे कामकाज आणि चर्चा दोन्ही होऊ देत नाही. काँग्रेसकडून बैठकांवर बहिष्कार टाकला जात आहे. कोरोनावर बैठक बोलावली त्यावर बहिष्कार टाकला आणि इतर पक्षांनाही त्यात सहभागी होण्यापासून थांबवले असेही त्यांनी म्हटले आहे. गेल्या आठवड्यात लोकसभा आणि राज्यसभेत काय कामकाज झालं याची माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि व्ही मुरलीधरन यांनी दिली. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा आणि इतर भाजप नेते उपस्थित होते. पंतप्रधान मोदी म्हणाले की, पक्षाच्या खासदारांनी विरोधकांचा खरा चेहरा समोर आणा. विरोधक संसदेत येत नाहीत आणि संसदेचं कामकाज होऊ देत नाहीत.
COMMENTS