एका मराठी व्यक्तीला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याचा निर्विवाद आनंद मिळायला हवा होता; परंतु आनंद वाटण्याऐवजी आश्चर्य वाटण्याची वेळ या अभिनेत्यावर आली आहे.
एका मराठी व्यक्तीला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याचा निर्विवाद आनंद मिळायला हवा होता; परंतु आनंद वाटण्याऐवजी आश्चर्य वाटण्याची वेळ या अभिनेत्यावर आली आहे. दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांना ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. अपेक्षेप्रमाणे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यावरून वाद सुरू झाला. रजनीकांत यांचे चित्रपटसृष्टीतील काम अलाैकिक आहे, यात दुमत नाही. त्यांना दादासाहेब पुरस्कार दिल्यामुळे पुरस्काराची उंची वाढणार,यात कोणतीही शंका नाही; परंतु पुरस्कार जाहीर करण्याचे टायमिंग मात्र चुकले आहे. त्याचे कारण रजनीकांत यांचे तमिळी चित्रपटसृष्टीत मोठे योगदान आहे.
तमीळनाडूच्या विधानसभा निवडणुका आठवडयावर आल्या असताना आताच तो पुरस्कार जाहीर करण्याचा हेतू विशुद्ध नक्कीच नाही. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जरी याबाबतच्या प्रश्नावरून संताप व्यक्त केला असला, तरी आणि या पुरस्कारासाठी आशा भोसले, विश्वजीत चटर्जी, सुभाष घई मोहनलाल, शंकर महादेवन आदींच्या समितीने या पुरस्कारासाठी निवड केली आहे. अर्थात त्यासाठी भाजपला दोष देता येणार नाही. त्याचे कारण राजकीय टायमिंग सर्वंच राजकीय पक्ष साधत असतात. रजनीकांत यांची १९९६नंतरची कारकीर्द पाहिली, तर त्यांच्या चित्रपटाचा एक काळ असा आहे, की त्यांनी जनमाणसावर राज्य केले. भारतीय चित्रपटसृष्टीतील असामान्य योगदानासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात येतो. रजनीकांत यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान नक्कीच नाकारता न येण्यासारखे आहे. जवळपास पाच दशकांपासून त्यांनी भारतीयांचे मनोरंजन केले. ते कोणीही नाकारत नाही; परंतु त्यांच्या पुरस्कारावरून वाद व्हावा, हे त्यांनाही अवघडल्यासारखे वाटू शकते. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीला एक आठवडा शिल्लक राहिला असताना जाहीर झालेल्या पुरस्कारामुळे रजनीकांत यांनी आनंद व्यक्त केला असला, तरी तो खरेच निखळ आनंद आहे का, याबाबत साशंकता आहे. भारतीय जनता पक्ष तमिळनाडूमध्ये सत्ताधारी अण्णाद्रमुकसोबत मिळून निवडणूक लढवत आहे. अशात रजनीकांत यांना पुरस्कार देऊन राजकीय लाभ घेण्याचा भाजपचा मानस स्पष्ट दिसतो. तमिळनाडूमध्ये सहा एप्रिलपासून मतदानाला सुरुवात होईल. रजनीकांत यांनी तमिळनाडूच्या राजकारणात एन्ट्री करावी यासाठी भाजपने फिल्डिंग लावली होती. 2016 ला रजनीकांत यांना पद्म विभूषण पुरस्कार देण्यात आला, त्यानंतर 2017 मध्ये त्यांनी राजकारणात येण्याचे जाहीर केले. त्यादृष्टीने त्यांनी तयारीही सुरू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक भाजप नेत्यांसोबत त्यांनी चर्चा केली; पण प्रकृतीच्या कारणास्तव ऐनवेळेला त्यांनी राजकारणात येण्याचे नाकारले. कधी मोदी यांचे काैतुक, तर कधी स्वबळावर राजकारणात येण्याची तयारी असे त्यांचे तळ्यात मळ्यात चालले होते. दोनदा राजकारणात प्रवेश आणि दोनदा राजकारणातून निवृत्ती यामुळे त्यांच्या राजकारणाबाबतच्या गांभीर्याबाबत चर्चा सुरू झाली होती.
निवडणुकीच्या तोंडावर रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन भाजपने त्यांच्या लाखो चाहत्यांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला असला, तरी तेवढ्यावरून तमिळनाडूत लगेच सत्तेचा लोलक भाजपच्या दिशेने झुलेल असे नाही. दक्षिणेमध्ये रजनीकांत या नावाचे गारुड लोकांच्या मनावर आहे. सुपरस्टार रजनीकांत यांची मंदिरे तमिळनाडूमध्ये असून लोक त्यांची देवासारखी पूजा करतात. रजनीकांत निवडणुकीत आपल्याला पाठिंबा देतील अशी आशा भाजपला होती; परंतु तसे होऊ न शकल्याने भाजपने नवा फंडा वापरला आहे. रजनीकांत यांना पुरस्कार दिल्याने त्यांचे लाखो चाहते अण्णाद्रमुक-भाजप युतीला मतदान देतील, असे भाजपला वाटते. रजनीकांत यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदी, सीएए अशा निर्णयांचे समर्थन केले होते. तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत उतरलेल्या सुपरस्टार कमल हसान हेही दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी योग्य ठरतात. कमल हसन रजनीकांत यांच्यापेक्षा सिनिअर आहेत. जवळपास सहा दशके चित्रपटसृष्टीसाठीचे त्यांचे योगदान आहे. कमल हसन अगदी लहान वयापासून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी विविध भाषांच्या चित्रपटात काम केले . शिवाय त्यांनी चित्रपटात अभिनेता म्हणून अनेक प्रयोग केले. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांना तीनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केले; पण दुर्दैवाने कमल हसन सध्या राज्यात भाजपच्या राजकीय विरोधकाच्या भूमिकेत आहेत. त्यांनी मोदी यांच्यावर आणि त्यांच्या अनेक निर्णयांवर टीका केली आहे. त्यामुळे ते दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी योग्य नाहीत, असे केंद्र सरकारला वाटले असण्याची शक्यता आहे. या वेळी कोरोना संसर्गामुळे सर्व पुरस्कारांची घोषणा उशिरा करण्यात आली. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणाही करण्यात आली होती. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. वास्तविक कोरोनाचा आता संसर्ग वाढला असताना पुरस्काराची घोषणा करण्यात आली. त्यामुळे कोरोनामुळे उशीर झाला, या म्हणण्याला तसा काहीही अर्थ नाही. निवडणुकीचे अचूक टायमिंग साधण्यासाठी हा उशीर जाणीवपूर्वक करण्यात आला. रजनीकांत हे दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारे १२ वे दाक्षिणात्य अभिनेते आहेत. यापूर्वी डॉ.राजकुमार, अक्किनेनी नागेश्वरा राव, के. बालाचंदर या ज्येष्ठ कलाकारांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळूरमधील एका मराठी कुटुंबात झाला. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांनी कठोर परिश्रम आणि संघर्षानंतर टॉलीवूडमध्ये विशेष स्थान मिळवले. आपल्या खास स्टाइल आणि अंदाजामुळे त्यांनी बॉलीवूडमध्येही स्वतःचे वेगळ स्थान निर्माण केले. दक्षिण भारतात चाहते रजनीकांत यांना देवाच्या स्थानी मानतात.
COMMENTS