Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर अर्बनमध्ये होणार सोने तारण घोटाळा भूकंप ; 15 एप्रिलला उघडल्या जाणार शेवगावच्या त्या 364 पिशव्या

नगर अर्बन बँकेतील 3 कोटीचा चिल्लर घोटाळा व पिंपरी-चिंचवड शाखेतील 22 कोटीच्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता सोनेतारण घोटाळा भूकंप होण्याची चिन्हे आहेत.

अहमदनगर मनपा सभागृह नेतेपदी अशोक बडे यांची नियुक्ती
कलावंत प्रतिष्ठानच्या तालुकाध्यक्षपदी संजय शिंदे
देशभक्तीची ज्योत कायम तेवत ठेवा : महेश बनकर

अहमदनगर/प्रतिनिधी- नगर अर्बन बँकेतील 3 कोटीचा चिल्लर घोटाळा व पिंपरी-चिंचवड शाखेतील 22 कोटीच्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता सोनेतारण घोटाळा भूकंप होण्याची चिन्हे आहेत. येत्या 15 रोजी बँकेच्या नगर येथील मुख्य कार्यालयात शेवगाव शाखेतील त्या बहुचर्चित 364 सोनेतारण कर्ज पिशव्यांचे लिलाव होणार आहेत व ते होण्याआधी या पिशव्या उघडून त्यातील तारण सोन्याची तपासणी होणार आहे. त्यातील सोन्याच्या खरेपणाबद्दल काही संशयास्पद आढळले तर संबंधित कर्जदार व गोल्ड व्हॅल्युअर यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाईची तयारी बँक प्रशासनाने ठेवली आहे. 

 नगर अर्बन बचाव कृती समितीच्या पाठपुराव्याने बँकेच्या प्रशासनाने चिल्लर घोटाळा व पिंपरी चिंचवड शाखेतील 22 कोटीच्या फसवणुकीबद्दल पोलिसात गुन्हे दाखल केले असून, या दोन्ही प्रकरणात काही संचालक, कर्जदार व बँकेच्या कर्मचार्‍यांना पोलिसांनी अटक केली आहे. आता शेवगाव शाखेतील सोनेतारण प्रकरणाचा पाठपुरावा नगर अर्बन बचाव कृती समितीने सुरू केला असून, प्रशासनानेही त्यांच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत 15 एप्रिलला नगरला शेवगाव शाख़ेतील 364 सोनेतारण पिशव्यांचा लिलाव ठेवला आहे.

 नोटिशीद्वारे दिला इशारा

बँकेच्या प्रशासनाने शेवगाव शाखेत सोने तारण कर्ज घेतलेल्या 364 कर्जदारांना नोटिशीद्वारे कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. आपल्या वैयक्तिक मालकीचे सोने दागिने तारण ठेवून बँकेकडून कर्जावू रक्कम घेतली आहे. या कर्जाची परतफेड मुदत संपून कर्ज खाते थकबाकीत गेल्याचे वारंवार नोटीस देऊन कळवूनही करारनाम्यात नमूद केल्यानुसार कर्जदारांनी रक्कम भरून तारण सोने सोडवून नेलेले नाही. तारण असलेले सोने दागिन्यांचे पुनर्मुल्यांकन, तपासणी व वस्तुस्थिती स्पष्ट होण्यासाठी बँकेच्या शेवगाव शाखेत येण्याचे सांगूनही कोणीही कर्जदार आला नाही. त्यामुळे वकिलामार्फत नोटीस पाठवून सोनेतारण कर्जाची व्याजासह परतफेड करून तारण दागिने घेऊन जावे व कर्ज खाते बंद करण्याचेही कळवले असतानाही कोणीही कर्जरक्कम भरून कर्ज खाते बंद केलेले नाही, असे बँकेने या नोटीशीत नमूद केले आहे. तसेच येत्या 14 एप्रिलपर्यंत कर्ज रक्कम भरून परतफेड केली नाही तर नियम व करारनाम्यानुसार गोल्ड व्हॅल्युअर, पंच व बँकेच्या अधिकार्‍यांसमक्ष 15 एप्रिल रोजी बँकेच्या नगर येथील प्रधान कार्यालयात सोनेतारण पिशव्यांचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावासाठी सोनेतारणच्या सीलबंद पिशव्या गोल्ड व्हॅल्युअर, पंच व बँक अधिकार्‍यांसमक्ष उघडण्यात येऊन त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावादरम्यान व तपासणीमध्ये तारण ठेवलेल्या सोन्यांच्या दागिन्यांबाबत काही तफावत आढळली वा काही गैरप्रकार आढळल्यास पंच व गोल्ड व्हॅल्युअर मार्फत प्रत्येक पिशवीतील दागिन्यांची तपासणी करून, त्याचा पंचनामा करून व अहवाल घेऊन संबंधितांविरुद्ध पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे व त्याची जबाबदारी संबंधित कर्जदार व गोल्ड व्हॅल्युअर यांच्यावर राहील, असे बँकेने स्पष्ट केले आहे.

बँकेची पाच कोटीची फसवणूक

नगर अर्बन बँकेने शेवगाव शाखेतील 364 सोनेतारण पिशव्यांचा लिलाव जाहीर केल्याने येथील नगर अर्बन बँक बचाव समितीच्या पाठपुराव्याला आणखी एक यश मिळाले आहे. याबाबत बचाव कृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी सांगितले की, 2018 पासून दाबून ठेवलेल्या शेवगाव शाखा बनावट सोने तारण कर्ज घोटाळ्याबद्दल कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे. या एकूण 364 पिशव्यांद्वारे बँकेला जवळपास 5 कोटी पेक्षा जास्तीचे रक्कमेला फसविणेत आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. येत्या 15 रोजी या पिशव्या पंचासमक्ष व ईन-कॅमेरा उघडण्यात येणार आहेत. तोपर्यंत संबंधित कर्जदारांनी किंवा जे कोणी मास्टर माइंड या सर्व गैरव्यवहारामागे असेल, त्यांनी बँकेचे सर्व पैसे व्याज व खर्चासह परत केले तर त्यांना कायदेशीर कारवाईपासून वाचणेची शेवटची संधी आहे, असे ते म्हणाले. बँक बचाव समितीची प्राथमिकता ही बँकेची वसुली होण्याची आहे. 2014 ते 2019 बँकेच्या मल्टीस्टेट कारभाराच्या काळात अनेक भामट्यांनी बँकेला पाहिजे तसे लुटले. कोणी बनावट मूल्यांकन रिपोर्ट देवून, कोणी बनावट आयकर विवरण पत्रे देवून, कोणी प्रोजेक्टेड आर्थिक पत्रके बनवून, कोणी मशिनरीची खोटी कोटेशन्स जोडून, कोणी बनावट जामीनदार दाखवून,कोणी कोट्यावधीची चिल्लर भरल्याचे खोटेच दाखवून, कोणी अगोदर विकलेली मालमत्ता जुन्या सात-बारावर मॉरगेज दाखवून तर कोणी बनावट सोने ठेवून बँकेचे अक्षरशः लचके तोडले. बँकेचे संचालक मंडळ व वरिष्ठ अधिकारी यांच्या संगनमताने व संमतीने ही लूटमार मनसोक्त सुरू होती. मात्र, चिल्लर घोटाळ्याचा पर्दाफाश आपण केलाच आहे व लवकरच ती वसुली होईल. आता बनावट सोनेतारण घोटाळा उघड करून बँकेची वसुली होण्याचा मार्ग मोकळा केला आहे, असेही गांधी यांनी स्पष्ट केले. संबंधितांनी बँकेचे पैसे परत करून स्वतःला वाचवून घ्यावे. घोटाळे करणारे व त्यांना मदत करणारांनी जे काही वाटप करून घेतले असेल, ते परत करावे हा आमचा प्रेमाचा सल्ला आहे, असेही गांधींनी आवर्जून नमूद केले आहे.

COMMENTS