पुण्यात टाळेबंदी नाही होणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात टाळेबंदी नाही होणार

महापालिका प्रशासनाने खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला असून, सगळ्या मिळून सुमारे पाच हजार खाटा ताब्यात आहेत.

शिवसेनेच्या आणखी एका नेत्याने केला १०० कोटींचा घोटाळा – सोमय्या | LOKNews24
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
शिंदेंचा भुजबळांना दणका; 600 कोटींच्या कामांना ब्रेक

पुणे/प्रतिनिधीः महापालिका प्रशासनाने खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला असून, सगळ्या मिळून सुमारे पाच हजार खाटा ताब्यात आहेत. ऑक्सिजनसज्ज आणि व्हेंटिलेटर असणाऱ्या खाटा अशा आणखी अडीच हजार खाटा वाढविण्यात येत असून, लवकरच खाटांचा आकडा सात हजारांच्या घरात पोहचणार आहे. सध्या शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत चार हजार ९०० रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातच आता दररोज वाढणारे रुग्ण आणि बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या समसमान येऊ लागल्याने रुग्णांना उपचारांसाठी खाटा उपलब्ध होण्याचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे शहरात लगेच टाळेबंदी करण्याची गरज भासणार नाही,’ असा दावा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे. 

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता महापौरांनी महापालिकेत तातडीची आढावा बैठक घेतली. महापालिका आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकताच टाळेबंदीला विरोध केला आहे. त्याची किनार या बैठकीला होती. महापालिकेत सध्या टाळेबंदी करण्याबाबत वारे वाहत असून, त्यास विरोध करायचा झाल्यास महापालिका प्रशासनाची काय तयारी आहे, याचा अप्रत्यक्ष आढावा या बैठकीत घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पुणे महापालिका हद्दीतील चार हजार ८४९ रुग्ण सध्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. पिंपरी-चिंचवड आणि जिल्हा मिळून १४ हजार २४२ रुग्णांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. पुणे शहराचा विचार करता कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटा नियंत्रित करण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्तांनी तसे आदेश काढले असले, तरी खासगी रुग्णालयांकडून या खाटा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे सध्या खाटांचा तुटवडा जाणवत असला, तरी येत्या चार ते पाच दिवसांत नव्याने दोन हजार चारशे खाटा कोरोनाबाधितांसाठी उपलब्ध होणार आहेत. महापालिका प्रशासनाने कोव्हिड केअर सेंटर्स तयार करण्यास सुरुवात केली असून, सध्या दोन हजार खाटा त्या ठिकाणी उपलब्ध केल्या आहेत. हा आकडा पाच हजारांपर्यंत नेण्यात येणार असून, त्यामध्ये ऑक्सिजनसज्ज खाटांची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यातही वाढणारी रुग्णसंख्या गृहित धरून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पुरेशी व्यवस्था निर्माण करण्यात येत असल्याचा दावा महापौरांनी केला आहे. शहरातील सध्याची रुग्णसंख्या सरासरी तीन हजार चारशेच्या प्रमाणात वाढत असून, तेवढेच रुग्ण आता बरे होऊ लागले आहेत. मध्यम लक्षणे असणाऱ्या रुग्णांना दहा दिवसांत घरी सोडण्याचे आदेशही खासगी रुग्णालयांना देण्यात आले असून, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांची हॉस्पिटलनिहाय नियुक्ती करण्यात आली आहे. दररोज वाढणाऱ्या रुग्णांमधील दहा टक्के रुग्णांना रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याची गरज भासते. त्याच वेळी दहा टक्के रुग्ण बरे होऊन घरी जाणार आहेत. हा समन्वय व्यवस्थित साधला गेल्यास आणि अतिरिक्त खाटांचा ‘बफर’ म्हणून वापर झाल्यास रुग्णांवर उपचार होणे सहज शक्य होणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

COMMENTS