अहमदनगर/ प्रतिनिधी : नगर जिल्ह्यातील करंजी (ता. पाथर्डी) येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. गणेश शेळके यांच्या आत्महत्या प्रकरणी पाथर्डी तालुका आरोग्य अ
अहमदनगर/ प्रतिनिधी : नगर जिल्ह्यातील करंजी (ता. पाथर्डी) येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. गणेश शेळके यांच्या आत्महत्या प्रकरणी पाथर्डी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी दिली. डॉ. शेळके यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतील नावांच्या अनुषंगाने पोलिसांकडून चौकशीही सुरू करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.
डॉ. शेळके यांनी करंजी रुग्णालयात मंगळवारी लसीकरण सुरू असताना गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत तालुका आरोग्य अधिकारी, तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्या जाचास कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी नगरला आढावा बैठकीसाठी आलेल्या पालकमंत्री मुश्रीफ यांनी, डॉ. शेळकेंच्या आत्महत्या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही दिली. डॉ. शेळके यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन पुण्याला झाले असून, मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याचे सांगून ते म्हणाले, त्यांनी चिठ्ठीत लिहिलेल्या मजकुराची चौकशी केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार त्यांचे वेतन 2-3 महिन्यांपासून झाले नव्हते, तालुका आरोग्य अधिकार्यांशी ते याबाबत बोलले होते, पण पगार काढणारा कर्मचारी रजेवर होता, असे समजले. पण या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत तालुका आरोग्य अधिकार्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील पाचशेवर आरोग्य उपकेंद्रांसाठी 397 समुदाय आरोग्य अधिकारी घेण्यात आले असून, त्यांना संसर्गजन्य नसलेल्या म्हणजे मधुमेह व अन्य आजारांच्या तपासणी आणि औषधोपचारांचे काम दिले आहे. 25 हजाराचे निश्चित वेतन व 15 हजाराचे इन्टेन्सिव्ह वेतन त्यांना दिले जाते. कोरोना आधीच्या काळात या नियुक्त्या झाल्या आहेत. मात्र, नंतर कोरोनाच्या काळात कोविड केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालयांतून 24 तास वैद्यकीय सेवा सुरू केली गेली. यासाठी कर्मचारी संख्या कमी असल्याने समुदाय आरोग्य अधिकार्यांच्या यासाठी नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. मे महिन्यापर्यंतचे सर्वांचे वेतन अदा आहे. फक्त पाथर्डी व श्रीरामपूरबाबत तांत्रिक अडचणी होत्या. अशा स्थितीत डॉ. शेळके यांची आत्महत्या दुर्दैवी असून, त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीनुसार पोलिस तपास करीत आहेत, संबंधित तालुका आरोग्य अधिकार्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे, असे ते म्हणाले.
त्यांचीही होणार चौकशी
डॉ. शेळके यांनी मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तहसीलदार व जिल्हाधिकारी यांनीही जाच केल्याचा उल्लेख असल्याने त्यांचा याप्रकरणाशी काय संबंध आहे, चिठ्ठी त्यांची नावे का लिहिली, त्यांना जादा ड्युटी दिली होती का, याबाबतही पोलिस तपास करणार आहेत. यातील कोणत्याही दोषींवर कारवाई टाळली जाणार नाही, असेही मुश्रीफ यांनी आवर्जून स्पष्ट केले.
COMMENTS