टाळेबंदीचाफटका दैनंदिन व्यवहारांवर झाला असला, तरी काहींबाबत ती इष्टापत्ती ठरली आहे. टाळेबंदीमुळे नगर-पुणे रस्त्यावरील वाहतूक कमी झाल्याने या रस्त्यावर उभारण्यात येणार्या उड्डाणपुलाचे काम वेगात सुरू आहे.
अहमदनगर/प्रतिनिधीः टाळेबंदीचाफटका दैनंदिन व्यवहारांवर झाला असला, तरी काहींबाबत ती इष्टापत्ती ठरली आहे. टाळेबंदीमुळे नगर-पुणे रस्त्यावरील वाहतूक कमी झाल्याने या रस्त्यावर उभारण्यात येणार्या उड्डाणपुलाचे काम वेगात सुरू आहे. आतापर्यंत या पुलाचे 85 खांब उभे राहिले असून, दोन वर्षांच्या नियोजित वेळेआधीच हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील हा बहुचर्चित उड्डाणपूल नगरची वाहतूक कोंडी दूर करणारा ठरणार आहे. पुण्या-मुंबईहून विदर्भ-मराठवाड्याकडे जाण्यासाठी नगर शहरातून जावे लागते; पण बाहेरची वाहतूक व स्थानिक शहरांतर्गत वाहतूक यामुळे शहरात नेहमी वाहतूक कोंडीचा त्रास होतो. त्यामुळे शिरूर-नगर रस्ता चौपदरीकरणात नगरला उड्डाणपूल मंजूर होता; पण त्या वेळी या पुलासाठी लागणार्या जागेचे भूसंपादन उशिरा झाल्याने ठेकेदाराने पुलाचे काम करण्यास नकार दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने स्वखर्चातून या पुलाचे काम करण्याचे जाहीर केले, त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूदही केली; पण या कामालाही मुहूर्त लागला नाही. अखेर कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाच्या कामात या पुलाच्या कामाचा समावेश झाला आहे. 372 कोटी रुपये खर्चून स्टेशन रस्त्यावरील सक्कर चौकापासून जीपीओ चौकापर्यंत तीन किलोमीटर अंतरात हा पूल होणार आहे. त्याचे काम सुरू होऊन अद्याप वर्षही झालेले नाही; पण मागील वर्षीचा व आता सुरू असलेला कोरोना काळ या पुलाच्या कामाला वेग देऊन गेला आहे. खूप दिवसांपासून शहरात उड्डाणपुलाचा विषय चर्चेत होता. विविध राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत होते. पूल नसल्याने या रस्त्यावर झालेल्या अनेक अपघातात निष्पापांचे बळी गेल्याने आंदोलनेही झाली होती. अशी अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत शहरातील सक्कर चौक ते स्टेट बँक चौकापर्यंत उड्डाणपूल मंजूर झाला. त्यानंतर लष्करी भूसंपादनाचा अडथळा होता. नंतर तोही मार्गी लागल्यानंतर उड्डाणपुलाचे काम सुरू झाले. काम सुरू असतानाही वाहतुकीचा अडथळा होता; परंतु कोरोना संसर्गाच्या दुसर्या लाटेमुळे राज्य सरकारने अनेक निर्बंध लागू केले. ते निर्बंध अजून सुरू आहेत. त्यात अनेक विकासकामे वगळली; पण रस्त्यावरील वाहतुकीला निर्बंध असल्याने पुलाच्या कामास रहदारीचा होत असलेला अडथळा काहीसा कमी झाला आणि उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू झाले.
वेळेच्या आत पूर्ण होणारः दिवाण
सध्या टाळेबंदी असल्याने रस्त्यावर वर्दळ कमी आहे. त्यामुळे शहरात होत असलेल्या बहुचर्चित उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू आहे. उड्डाणपुलाचे सुमारे 85 खांब उभे राहिले असून, त्यातील काही खांबावर कॅप टाकण्याचेही काम सुरू झाले आहे. उड्डाणपुलाचे काम वेळेच्या आत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक प्रफुल्ल दिवाण यांनी सांगितले.
COMMENTS