नगरमध्ये समस्या…दूषित पाणी-खड्डे-बंद पथदिवे-मोकाट कुत्री व जनावरे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरमध्ये समस्या…दूषित पाणी-खड्डे-बंद पथदिवे-मोकाट कुत्री व जनावरे

चार संस्थांनी मनपाकडे केली समस्या सोडवण्याची मागणी, काहींनी केली आंदोलनेअहमदनगर/प्रतिनिधी-दूषित पाणी, रस्त्यांतील खड्डे, बंद पथदिवे तसेच मोकाट जनावरे

शिर्डीत लाखो भाविकांची मांदियाली
अवैध वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई
फेसबुकवरील मैत्रीतुन जामखेडला हँनिट्रॅप  

चार संस्थांनी मनपाकडे केली समस्या सोडवण्याची मागणी, काहींनी केली आंदोलने
अहमदनगर/प्रतिनिधी-दूषित पाणी, रस्त्यांतील खड्डे, बंद पथदिवे तसेच मोकाट जनावरे व कुत्र्यांचा झालेला सुळसुळाट, या समस्या प्राधान्याने सोडवण्याची मागणी महापालिकेककडे करण्यात आली आहे. काही संस्थांनी या मागण्यांची निवेदने मनपाला दिली तर काहींनी खड्ड्यांत उभे राहून मनपाचा निषेध केला. काही नागरिकांनी दूषित पाण्याच्या बाटल्या मनपा आयुक्त शंकर गोरे यांना भेट दिल्या.
नगर शहरातील बहुतांश भागांतून सध्या नागरी समस्यांचे प्रश्‍न वाढले आहेत. पावसाळा सुरू असल्याने तसेच रस्त्यांतून भुयारी गटार योजनेचे खोदकाम झाल्याने दूषित पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर झाली आहे. स्टेशन रोडच्या जागरूक नागरिक मंचाने तर मनपाला याबाबत नोटिसही दिली आहे. याशिवाय रस्त्यात ठाण मांडून बसणारी जनावरे, कुत्र्यांच्या शहरभर फिरणार्‍या टोळ्या, रात्रीच्यावेळी बंद पथदिव्यांमुळे रस्त्यांवर पसरणारा अंधार आणि खड्डे दुरुस्ती होत नसल्याने पावसाचे पाणी साठून खड्ड्यांची वाढणारी लांबी-रुंदी यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

झेंडीगेटला मैलामिश्रित पाणी
झेंडीगेट परिसरातील सुभेदार गल्ली, आंबेडकर चौक, बुडन फौजदारी कॉलनी येथे गेल्या दोन महिन्यापासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याचबरोबर मैलामिश्रित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे या भागात साथीचे आजार उदभवले आहेत अनेक नागरिकांना पोटाच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सोमवारी या प्रभागातील नागरिकांनी आयुक्त शंकर गोरे यांची भेट घेऊन मैलामिश्रित पाण्याची बाटली त्यांना भेट दिली. येत्या शुक्रवारपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत करून स्वच्छ पाणी देण्याचे आश्‍वासन पूर्ण न केल्यास सोमवारी आयुक्तांच्या दालनात नागरिकांसमवेत आंदोलन छेडण्याचा इशारा भा कुरेशी यांनी दिला. यावेळी उपमहापौर गणेश भोसले उपस्थित होते.

स्टेशनरोडला पथदिवे बंद
नगर-दौंड रोड येथील स्टेशन रोड-सुभद्रानगर परिससरातील ड्रेनेज लाईन, पाण्याची लाईन व स्ट्रीट लाईट समस्यांबाबत मनपा आयुक्त गोरे यांना शिव राष्ट्र सेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे, बाबासाहेब करपे, अनिल शेकटकर, शंभु नवसुपे, आदेश बचाटे, राहूल तांबे, संदीप नन्नवरे, अनिल दळवी उपस्थित होते. कांबळे यांनी मनपाच्यावतीने मूलभूत सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आलेल्या नाहीत, असे सांगून आयुक्तांना या भागातील समस्यांचा पाढा वाचून दाखविला. आयुक्तांनीही याबाबत तातडीने कार्यवाही करुन या नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात येतील, असे आश्‍वासन दिले.

खड्ड्यात उभे राहून निषेध
शहरातील खड्डेमय रस्त्यावर आम आदमी पार्टीने आंदोलन केले. लोकप्रतिनिधींनी शहर खड्ड्यात टाकल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. शहरातील शनि चौकातील रस्त्यातील खड्ड्यात उतरून महापालिकेचा निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनात आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष राजेंद्र कर्डिले, महिला संघटक सुचिता शेळके, संपत मोरे, रवी सातपुते, दिलीप घुले, रेव्ह. आश्‍विन शेळके सहभागी झाले होते. पाईपलाइन व ड्रेनेजलाईनसाठी मोठ्या प्रमाणात रस्ते खोदण्यात आले होते. मात्र ते खड्डे व्यवस्थित बुजविण्यात आलेले नाही. लोकप्रतिनिधींनी टक्केवारीपायी शहर खड्ड्यात टाकले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

मोकाट जनावरे आवरा
मोकाट जनावरे, कुत्रे व डुकरांचा शहरात सुळसुळाट झाल्याचा दावा मनपाच्याच आरोग्य समितीने केला असून, याबाबत कारवाईची मागणी केली आहे. मनपाच्यावतीने उपाययोजना करण्यासाठी आरोग्य समितीच्यावतीने महापालिकेत बैठकीचे आयोजन करून उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य अधिकारी डॉ.सतीश राजूरकर यांना देण्यात आल्या. यावेळी आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ.सागर बोरुडे, सदस्य माजी नगरसेवक निखिल वारे, नगरसेवक सचिन शिंदे, स्थायी समितीचे माजी सभापती सचिन जाधव यांच्यासह संजय ढोणे, अजय चितळे, सतीश शिंदे उपस्थित होते. मोकाट कुत्रे हे लहान मुलांबरोबर ज्येष्ठ नागरीक व रात्री अपरात्री येणार्‍या नागरिकांवर टोळक्याने हल्ले करत आहे, दिवसेंदिवस त्यांची संख्या देखील वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यासाठी कुत्रे पकडण्याचे नियोजन होणे गरजेचे आहे, असे समिती सदस्यांनी सांगितले. प्रभागानुसार कुत्रे पकडण्याची मोहीम हाती घ्यावी, कुत्रे पकडणार्‍या गाडीवर जीपीएस लावावे व पकडलेल्या कुत्र्यांचे फोटो व शूटिंगचा संग्रह करून ठेवावा, कुत्र्यांच्या निर्बीजीकरण केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, अशा विविध सूचना बैठकीत देण्यात आल्या तसेच ठेकेदार व कर्मचार्‍यांनी कामात हलगर्जीपणा केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. दरम्यान, लवकरच ठेकेदारामार्फत मोकाट जनावरे उचलण्यास सुरुवात केली जाणार आहे तसेच रस्त्यावर सोडणार्‍या मोकाट जनावरांच्या मालकांवर देखील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे डॉ. राजूरकर यांनी यावेळी सांगितले.

मोफत रेबीज इंजेक्शन
महापालिकेच्या आठही आरोग्य केंद्रावर कुत्र्याने चावा घेतल्यानंतर उपचारासाठी वापरण्यात येणारे रेबीज इंजेक्शन नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी आरोग्य समितीने डॉ. राजूरकर यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी लगेच सर्व शहरातील मनपाच्या आरोग्य केंद्रांवर मोफत रेबीज इंजेक्शन देण्याच्या सूचना तात्काळ संबंधितांना दिल्या.

COMMENTS