Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरमधील कोविड रुग्णसंख्या लागली घटू ; रोजचा सातशेचा आकडा आला अडीचशेवर, लॉकडाऊनचा परिणाम

नगर शहरात मागील 12 दिवसांपासून कडक लॉकडाऊन सुरू असून, केवळ दूध विक्री व मेडिकल दुकाने सुरू आहेत.

जलजीवन मिशन योजने अंतर्गत कामाची चौकशी करावी
“त्या” गुरुजींच्या बदल्यांना यादीची प्रतीक्षा
सोमैया महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

अहमदनगर/प्रतिनिधी-नगर शहरात मागील 12 दिवसांपासून कडक लॉकडाऊन सुरू असून, केवळ दूध विक्री व मेडिकल दुकाने सुरू आहेत. यामुळे रस्त्यांवरील तसेच दुकानांतील गर्दी कमी होऊन कोरोना संसर्गाचे प्रमाणही घटले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला असलेली नगर शहरातील रुग्णांची सातशेवर संख्या आता कमी होऊन अडीचशेवर आली आहे. 

    मनपाने घेतलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळणे एकीकडे दुरापास्त झाले असताना  दुसरीकडे यामुळे कोरोना रुग्णांची संख्या घटू लागल्याचेही दिलासा देणारे चित्र दिसू लागले आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी 1 मे महाराष्ट्रदिनी शासकीय ध्वजवंदन झाल्यावर दुपारी कोरोना आढावा बैठक घेतली होती. या दिवशीची नगरमधील रुग्णसंख्या 817 होती. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्याही या दिवशी 4 हजार 219 होती. पण यात नगर शहरातील संख्या सर्वाधिक होती. त्यामुळे पालकमंत्री मुश्रीफ यांनी फक्त दूध विक्री व मेडिकल दुकाने सुरू ठेवण्याची सूचना मनपाला केली. आयुक्त शंकर गोरे, आ. संग्राम जगताप व महापौर बाबासाहेब वाकळे यांनी त्यानंतर संयुक्त बैठकीत नगर शहरात कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला. आधी 7 दिवसांचा हा लॉकडाऊन नंतर पुन्हा 5 दिवसांनी वाढवण्यात आला. त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. 12 मे रोजी नगर शहरातील रुग्णसंख्या 250 झाली आहे व जिल्ह्याची या दिवसाची एकूण नव्याने बाधितांची संख्या 2711 होती. सुरुवातीला नव्याने बाधितांच्या संख्येत जिल्ह्यात नगर शहर अग्रस्थानी होते, आता त्याचा क्रमांक रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने खाली गेला आहे. कोणत्याही यशाची चढती कमान ही वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होते, पण कोरोनाच्याबाबतीत मात्र यशाची चढती कमान ही रुग्ण संख्या कमी होण्यातून दिसणे महत्त्वाचे असल्याने याबाबत नगर शहराने बाजी मारल्याचे दिसू लागले आहे. नव्या बाधितांची नगर शहरात कमी होत असलेली संख्या नगरकरांसाठी दिलासादायक झाली आहे.

असे झाले आकडे कमी

नगर शहरात 1 मे पासून 12 मे पर्यंत 6 हजार 156 नवे बाधित आढळले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला असलेले नव्या बाधितांचे आकडे आता हळूहळू कमी होऊ लागले आहेत. 1 मे रोजी 817जण, 2 मे रोजी 547, 3 मे रोजी 426, 4 मे-622, 5 मे-760, 6 मे-674, 7 मे-732, 8 मे-428, 9 मे-421, 10 मे-284, 11 मे- 195 व 12 मे रोजी 250 नवे बाधित रुग्ण नगर शहरात आढळले. ही संख्या अशाच पद्धतीने रोज कमी होत शून्यावर येवो, अशी आशा नगरकरांकडून व्यक्त होत आहे.

महापौरांनी मानले नगरकरांचे आभार

नगर शहरात व उपनगरात सुरू असलेल्या कडक लॉकडाऊनमुळे कोरोनाचा आलेख कमी झाला असल्याचा दावा महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केला असून, त्याबद्दल नागरिकांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, नगर शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. दवाखान्यांमध्ये रुग्णांना बेड मिळत नव्हते. नागरिक शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करीत नव्हते. शासनाने सकाळी 7 ते 11 यावेळत भाजीपाला, किराणा, दूध इत्यादीसाठी सवलत दिली होती. पण यावेळेत नागरिक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी करीत होते. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत होती. त्यामुळे याबाबत मनपाने कडक निर्बंध घालण्याचे नियोजन करून सुरुवातीला 10 मेपर्यत व आता 15 मेपर्यंत अत्यावश्यक सेवा सोडून लॉकडाऊन केला होता. त्यामुळे रस्त्यावर गर्दी कमी झाली व नागरिकांनीही या नियमांचे काटेकोरपणे पालन केले. त्यामुळे गेल्या 4 ते 5 दिवसात रुग्णांची संख्या कमी कमी होत आहे. नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे रुग्णांची संख्या घटण्यास मदत झाली, असे महापौर वाकळे यांनी आवर्जून सांगितले. अत्यावश्यक सेवेसाठी हॉस्पिटल, मेडिकल व दूधविक्री सुरू होती. त्याशिवाय सर्व आस्थापना बंद ठेवल्यामुळे नागरिकांना बाहेर फिरण्याची गरज पडली नाही. असेच सहकार्य नागरिकांनी प्रशासनास करावे, आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे, विनाकारण रस्त्यावर फिरू नये, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, वारंवार हात धुणे, मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे या गोष्टीचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापौर वाकळे व आयुक्त शंकर गोरे यांनी केले आहे.

नागरिकांनी तपासणी करावी

कोरोना विषाणूची साखळी पूर्णपणे थांबविण्यासाठी मनपाच्या माध्यमातून मोठया प्रमाणात अ‍ॅन्टीजेन तपासणी सुरू केली असून नागरिकांनी लक्षणे दिसून आल्यास तपासणी करून उपचार घ्यावेत व कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापौर वाकळे व आयुक्त गोरे यांनी केले. शहर व उपनगरातील कोरोनाचा प्रादुर्भावाबाबत तसेच कमी होत असलेल्या रुग्णांच्या संख्येबाबत महापौर वाकळे यांनी बैठक घेतली. यावेळी उपमहापौर मालनताई ढोणे, सभागृह नेता रवींद्र बारस्कर, नगरसेवक महेंद्रभैय्या गंधे, मनोज दुलम,रामदास आंधळे यांच्यासह अजय चितळे, उदय कराळे, मनोज ताठे, सतीश शिंदे उपस्थित होते. या बैठकीत शहरातील रुग्ण संख्या, हॉस्पिटलमध्ये असलेले रुग्ण, कोवीड सेंटरमध्ये असलेले रुग्ण, रस्त्यावरची गर्दी आदींबाबत चर्चा करण्यात आली.

COMMENTS