अहमदनगर/प्रतिनिधी- पुण्यामध्ये जल-वायू व ध्वनी प्रदूषण वाढल्याने नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गालगत पारनेर व श्रीगोंदे तालुक्यातील काही क्ष
अहमदनगर/प्रतिनिधी-
पुण्यामध्ये जल-वायू व ध्वनी प्रदूषण वाढल्याने नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गालगत पारनेर व श्रीगोंदे तालुक्यातील काही क्षेत्रात नवे पुणे शहर वसवता येऊ शकते, असा प्रस्ताव केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गड़करी यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला. नगरचे भाजपचे माजी खासदार (स्व.) दिलीप गांधी यांनी सात वर्षांपूर्वी हा प्रस्ताव मंत्री गडकरींना दिला होता. या पार्श्वभूमीवर दिलीप गांधींचा आवर्जून उल्लेख करीत गडकरींनी हा प्रस्ताव पवारांना दिला आहे. यावर केंद्र व राज्य सरकारने गांभीर्याने विचार केला तर नगर शहरापासून 25 ते 30 किलोमीटर अंतरावर नवे पुणे शहर विकसित होऊ शकते.
पुण्यातील कात्रज पुल उदघाटन कार्यक्रमात बोलताना गडकरींनी, मोठ्या शहरांचे विकेंद्रीकरण करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करताना पवारांना नवे पुणे वसवण्यासाठी पुणे-बंगलोर महामार्गालगतचा भाग तसेच नगर-कल्याण महामार्गालगतचा भाग, असे दोन पर्याय सुचवले आहेत. यादृष्टीने विचार केला तर या दोन्ही नव्या पुणे शहरांना मेट्रो व रस्ता मार्ग अशा दोन्ही पद्धतीने जोडण्यासाठी मदत करण्याची ग्वाहीही गडकरींनी दिली असल्याने यावर आता पवार यांच्यासह राज्यातील महाविकास आघाडी सरकार काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. मात्र, नगर शहराजवळ नवे पुणे शहर होऊ शकते, ही नगरचे माजी खासदार (स्व.) दिलीप गांधी यांची स्वप्नवत कल्पना आता खुद्द मंत्री गडकरींनीच हा विषय छेडल्याने प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हेलिकॉप्टरने केली होती पाहणी
नगर शहराजवळ नवे पुणे वसवण्याच्या मूळ संकल्पनेचे जनक (स्व.) दिलीप गांधी यांचे चिरंजीव माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी या विषयाबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, 2014 मध्ये कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे मंत्री गडकरींच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. त्यावेळी भाजपचे खासदार असलेले दिलीप गांधी यांनी नगरजवळ नवे पुणे होऊ शकते, हा विषय गडकरींना सांगितला तसेच श्रीगोंदे व पारनेर तालुक्यातील कोणत्या क्षेत्रावर हे नवे पुणे शहर होऊ शकते, याची पाहणीही या दोघांनी हेलिकॉप्टरने या परिसरात दोन चकरा मारून केली होती, असे सांगून सुवेंद्र गांधी म्हणाले, श्रीगोंदे तालुक्यातील विसापूर तसेच पारनेर तालुक्यातील सुपा, भाळवणी, कान्हूर पठार, ढवळपुरी, दगडवाडी, सुतारवाडी अशा पट्ट्यातील सुमारे 5 लाख एकर क्षेत्रापैकी 80 टक्के क्षेत्र जिरायती व 20 टक्के बागायती आहे. या भागात नागरीकरणासह औद्योगिक विकासालाही संधी असल्याने (स्व.) दिलीप गांधींनी या प्रकल्पासह पुणे एअरपोर्ट नगरला स्थलांतर करण्याचाही प्रकल्प मंत्री गडकरींसमोर मांडला होता, असे सुवेंद्र गांधी यांनी सांगितले. नगर जिल्ह्यातील शिर्डी व शनि शिंगणापूर ही दोन देवस्थाने तसेच मुळा धरण पाणी उपलब्धता आणि लेबरसह अन्य बाबींचे परवडणारे खर्च याचा विचार करून हे प्रस्ताव दिले होते. खुद्द मंत्री गडकरींनीच आता हे विषय गांभीर्याने घेतल्याने यातून एकप्रकारे माजी खा. (स्व.) दिलीप गांधींच्या दूरदृष्टीचा गौरव झाला आहे, अशी भावनाही सुवेंद्र गांधी यांनी व्यक्त केली.
COMMENTS