नगरच्या डॉक्टरांचे जामीन अर्ज फेटाळले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरच्या डॉक्टरांचे जामीन अर्ज फेटाळले

नगर अर्बनच्या दुसर्‍या गुन्ह्यात वर्ग होण्याची शक्यता अहमदनगर/प्रतिनिधी- नगर अर्बन बँकेच्या पिंपरी चिंचवड शाखेतील 22 कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणात

नगर अर्बन बँक शेवगाव शाखेचे व्यवस्थापक यांनी केली आत्महत्या
शेवगावच्या बनावट सोने प्रकरणी 160 जणांना नोटिसा ;गोल्ड व्हॅल्युअर व कर्जदारांचा समावेश, म्हणणे मांडण्याचे पोलिसांचे आदेश
नगर अर्बन बँकेचे निवडणूक रिंगण लागले फुलू…; इच्छुकांनी साधला गुरुपुष्यांमृत योग, 48 अर्ज दाखल

नगर अर्बनच्या दुसर्‍या गुन्ह्यात वर्ग होण्याची शक्यता

अहमदनगर/प्रतिनिधी- नगर अर्बन बँकेच्या पिंपरी चिंचवड शाखेतील 22 कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणातून आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणातील पुण्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केलेल्या नगरच्या तीन डॉक्टरांचे जामीन अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळले आहेत. या आरोपींमध्ये डॉ. भास्कर सिनारे, डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ. रवींद्र कवडे यांचा समावेश आहे. त्यांचे जामीन अर्ज फेटाळल्याने आता त्यांना नगर अर्बन बँकेसंदर्भात नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात वर्ग केले जाण्याची शक्यता आहे.
नगर अर्बन बँकेच्या पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथील शाखेतील 22 कोटी रुपयांच्या कर्ज फसवणुकीचा विषय चांगलाच गाजला आहे. या प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने बँकेच्या माजी उपाध्यक्षांसह कर्जदारांसह आत्तापर्यंत आठ जणांना या प्रकरणामध्ये अटक केली आहे. त्यामध्ये नगरच्या डॉ. सिनारे, डॉ. श्रीखंडे व डॉ. कवडे या तीन डॉक्टरांचा सुद्धा समावेश आहे. या प्रकरणात आरोपी असलेल्या आशुतोष लांडगे याच्या खात्यामध्ये या कर्ज प्रकरणातील अकरा कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले होते. त्यातील सहा कोटी चार लाख रुपयांची रक्कम या तीन डॉक्टरांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात आली होती. लांडगे याला अटक केल्यानंतर त्याच्या तपासामध्ये ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांनी या तीन डॉक्टरांना नगर येथून अटक केली होती. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत 30 जून रोजी संपल्यानंतर त्या तीनही डॉक्टर आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली होती. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर या तीनही आरोपींनी न्यायालयामध्ये वकिलामार्फत जामिनासाठी अर्ज दाखल केलेला होता.

पोलिसांनी घेतला आक्षेप
या जामीन अर्जासंदर्भामध्ये आक्षेप घेताना पुण्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयासमोर लेखी म्हणणे मांडले. त्यात म्हटले आहे की, हा गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे. यामध्ये 22 कोटी रुपयांचा अपहार झालेला आहे. ही रक्कम कोणा-कोणाला व कशा स्वरूपामध्ये दिलेली आहे, हे तपासामध्ये उघड झालेले आहे. त्यामुळे या रकमेच्या संदर्भात अन्य आरोपींचासुद्धा आम्ही शोध घेत आहोत. या घटनेचा तपास अजून पूर्ण व्हायचा आहे, त्यामुळे यांना जामीन देऊ नये, असे म्हणणे सादर करण्यात आल्यानंतर या तीनही आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

नगरच्या गुन्ह्यात वर्ग करणार?
नगरच्या डॉ. सिनारे, डॉ. श्रीखंडे व डॉ. कवडे या तीन डॉक्टरांचा जामीन अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता त्यांना नगरच्या गुन्ह्यात वर्ग केले जाण्याची शक्यता आहे. नगरच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागानेही कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या 3 कोटीच्या चिल्लर घोटाळ्याच्या गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणातही बँकेच्या काही कर्मचार्‍यांसह कर्जदारांना अटक झाली आहे. त्यामुळे आता येथील आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग या तीन डॉक्टरांबद्दल पुढील काय कारवाई करते, हे पाहणे महत्त्वाचे होणार आहे. या तिन्ही डॉक्टरांना नगरच्या गुन्ह्यात वर्ग करून अटक केली जाण्याची शक्यता आहे.

COMMENTS