नगरची भाजप बांधली राष्ट्रवादीच्या दावणीला? ;प्रदेशाध्यक्ष पाटील आज दखल घेण्याची शक्यता

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरची भाजप बांधली राष्ट्रवादीच्या दावणीला? ;प्रदेशाध्यक्ष पाटील आज दखल घेण्याची शक्यता

अहमदनगर/प्रतिनिधी-नगर शहरातील भारतीय जनता पक्ष चक्क नगर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधल्याचे चित्र सध्या आहे. पक्षाचे नगरसेवक तर राष्ट्रवा

पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेंना संपविण्याचा भाजपचा डाव तर नव्हे ना ? l LokNews24
बंडाच्या स्वल्पविरामाला अंकूर फुटेल?
भाजप यापुढे स्वबळावर…जिल्ह्यात 12 आमदार हवेत

हमदनगर/प्रतिनिधी-नगर शहरातील भारतीय जनता पक्ष चक्क नगर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधल्याचे चित्र सध्या आहे. पक्षाचे नगरसेवक तर राष्ट्रवादीच्या घोळक्यातच असतात व पक्षाचे खासदारही जाहीरपणे राष्ट्रवादीच्या आमदारांचे गुणगान करीत आहेत. परिणामी, नगर शहरातील भाजपचे स्वतंत्र अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शुक्रवारी (23 जुलै) दिवसभर नगरला असून, पक्षाच्या संघटनात्मक बैठका ते घेणार आहेत. या बैठकांदरम्यान शहरातील भाजपच्या सद्य स्थितीची व पक्षाचे नगर शहरात स्वतंत्र अस्तित्व आहे की नाही, याची ते दखल घेण्याची शक्यता आहे.
प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर चंद्रकांतदादा पाटील पहिल्यांदाच नगर शहरात येत आहेत. शुक्रवारी दिवसभर त्यांचे विविध कार्यक्रम व दुपारी संघटनात्मक बैठका आहेत. सकाळी 9 वाजता ते केडगावला येणार असून, तेथे विस्तारक बैठक, दुपारी 12 वाजता मध्य मंडल आढावा बैठक आणि दुपारी 1 नंतर पेमराज सारडा महाविद्यालयात नगर शहर, उत्तर नगर जिल्हा व दक्षिण नगर जिल्हा बुथ समित्या व रचना आढावा बैठका त्यांच्या होणार आहेत. त्याआधी आनंदधाम येथे आचार्यश्री आनंदऋषीजी महाराजांच्या समाधीस्थळी दर्शन घेतल्यानंतर पक्षाचे माजी खासदार दिवंगत दिलीप गांधी यांच्या निवासस्थानीही ते जाणार आहेत. नगरला मुक्काम करून शनिवारी सकाळी ते पुण्याला जाणार असल्याचे सांगितले जाते. दिवसभराच्या या भरगच्च कार्यक्रमात शहरातील भाजपचे व नगरसेवकांचे नेमके काय चालले आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न पाटील यांनी करावा, असे भाजप निष्ठावंतांचे म्हणणे आहे.

पक्ष अस्तित्वहीन
नगर शहराचे राजकारण व समाजकारण महापालिकेभोवती फिरते. महापालिकेत मागील अडीच वर्षे भाजपचे पहिले महापौर बाबासाहेब वाकळे हे राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर विराजमान झाले होते. त्यामुळे त्याची परतफेड आता भाजपने केली आहे. नुकत्याच झालेल्या महापौर-उपमहापौर निवडणुकीत भाजपने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. महापौरपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने व भाजपकडे या प्रवर्गाचे प्रतिनिधीत्व करणारी नगरसेविका नसल्याने महापौरपदासाठी भाजप प्रयत्न करू शकत नव्हता. त्यामुळे शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे या महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पाठिंब्यावर बिनविरोध महापौर झाल्या. मात्र, उपमहापौरपद हे खुले होते व त्यासाठी भाजप निवडणूक लढवू शकत असताना तेथे राष्ट्रवादीचा उपमहापौरपदाचा उमेदवार असल्याने भाजपने तटस्थ राहून महापौरपद दिल्याची परतफेड राष्ट्रवादीला उपमहापौरपद देऊन केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे गणेश भोसलेही बिनविरोध उपमहापौर झाले. मात्र, या सर्व घडामोडींमुळे महापालिकेत असलेले सर्वपक्षीय 67 नगरसेवक आता सत्तेत असल्याचे चित्र आहे.

विरोधी पक्ष नेतेपदासाठी फोडाफोडी
महाविकास आघाडीच्या महापौर-उपमहापौर निवडीत तटस्थ राहणार्‍या भाजपमध्ये आता मनपातील विरोधी पक्ष नेतेपद मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे व ती एवढी शिगेला पोहोचली आहे की, आपलेच नगरसेवक फोडण्याचे प्रकारही घडू लागले आहेत. मनपात भाजपचे 15 नगरसेवक असून, विरोधी पक्ष नेतेपदासाठी माजी महापौर वाकळे, केडगावचे मनोज कोतकर व भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे हे तीनजण इच्छुक आहेत. यातील कोतकर यांनी 15 पैकी 8 नगरसेवक आपल्या बाजूने वळवून त्यांच्या सह्यांचे निवेदन महापौर शेंडगे यांना दिले व त्यांचीच विरोधी पक्ष नेतेपदासाठी निवड केली जावी, अशी मागणी केली आहे. राहिलेल्या 7 नगरसेवकांपैकी 5जण माजी महापौर वाकळेंच्या समवेत आहेत तर गंधे एकाकी पडल्याच्या स्थितीत आहेत. गटनेत्या व माजी उपमहापौर मालनताई ढोणे या नेमक्या कोणत्या गटात आहेत, याचाही संभ्रम आहे. या पार्श्‍वभूमीवर, प्रदेशाध्यक्ष पाटील यांनीच स्वतः विरोधी पक्ष नेतेपदासाठी सुरू असलेल्या या पक्षांतर्गत रस्सीखेचीला लगाम घातला असून, गटनेत्या ढोणे यांना सूचना देऊन, प्रदेश भाजपकडून सांगितले जाणारे नावच विरोधी पक्ष नेते म्हणून महापौरांना अधिकृतपणे सुचवण्याचे आदेश दिले आहेत. पण या सर्व घडामोडीत शहर भाजपची चांगलीच नाचक्की होत आहे.

राष्ट्रवादीचे जाहीर गुणगान
नगरमधील भाजप व राष्ट्रवादीचे साटेलोटे आता लपून राहिलेले नाही. पक्षाचे दक्षिण नगर जिल्ह्याचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी मागील अडीच वर्षात मनपातील भाजपच्या सत्तेने केलेल्या विकास कामांचा आढावा सादर करताना राष्ट्रवादीचे शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीला महत्त्व दिले व तेथे त्यांचे जाहीर गुणगानही केले. शहर विकासासाठी आम्ही पक्षभेद मानत नाही, असेही त्यावेळी स्पष्ट करताना चक्क आ. जगताप यांच्या भाषणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा टीव्हीवर लाईव्ह सुरू असलेल्या मन की बात या कार्यक्रमाचा आवाज म्युट केला. विशेष म्हणजे यावेळी सर्वपक्षीय नगरसेवक तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, पक्षाचे पदाधिकारीही उपस्थित होते. त्यानंतर काही दिवसातच स्वतःच्या रुग्णालयाच्या सावेडीतील रुग्ण कक्षाचे उदघाटनही आ. जगतापांच्या हस्ते करून तेथेही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. अशा सगळ्या स्थितीत नगर शहराचा भाजप पक्ष स्थानिक नेते, नगरसेवक व पदाधिकार्‍यांनी चक्क राष्ट्रवादीच्या दावणीला बांधल्याचे चित्र मात्र दिसू लागले आहे.

COMMENTS