धार्मिक स्थळे आणि कोरोना !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

धार्मिक स्थळे आणि कोरोना !

राज्यात सणवार-उत्सवांचे वातावरण असून, कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे मंदिरे, धार्मिक स्थळे बंद आहेत. यावरून राजकारणांस सुरूवात झाली असून, भाजपच्या आ

राज्यकर्त्यांना सर्वसामान्यांचा प्रश्‍नांचा विसर
क्लीन चीटच्या चर्चेचे गुर्‍हाळ
द्रोणाचार्याची वैचारिक वंशावळ

राज्यात सणवार-उत्सवांचे वातावरण असून, कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे मंदिरे, धार्मिक स्थळे बंद आहेत. यावरून राजकारणांस सुरूवात झाली असून, भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने राज्यभर शंखनाद आंदोलनाला सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दहीहंडीला असलेल्या बंदीविरोधात आक्रमक आंदेालनाला सुरूवात केली आहे. धार्मिक स्थळे बंद आहेत. यामागे कुणाला खुश करण्याचा किंवा कुणाला दुखावण्याचा हेतू राज्य सरकारचा नाही. राज्यात निर्बंध शिथील केल्यामुळे कोरोना रुग्णांचा आलेख वाढतच चालला आहे. अशापरिस्थितीमध्ये धार्मिक स्थळे उघडली तर, आज जो कहर केरळमध्ये सुरू आहे, तीच स्थिती महाराष्ट्रामध्ये दिसायला लागायला वेळ लागणार नाही. अलीकडच्या पाच दिवसामध्ये केरळमध्ये दीड लाख कोरोना रुग्ण आढळून आले आहे. दररोज 30 हजारापेक्षा अधिक रुग्ण केरळमध्ये आढळून येत आहे. याला कारण ठरले आहे, ओनम. ओनमच्या सणानिमित्त नागरिकांनी खरेदीसाठी आणि सणानिमित्त बाहेर पडत मोठया प्रमाणावर गर्दी केली. जसे काही कोरोना संपला आहे, अशाच हवेत केरळ नागरिक घराबाहेर पडला. मात्र केरळमध्ये भयावह परिस्थिती असून, कोरोना नियंत्रणात आणणे आव्हानात्मक बनले आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रात चांगली परिस्थिती आहे. राज्यात दररोज चार हजारापेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. पुणे मुंबईमध्ये हे प्रमाण कमी आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या पाच हजाराच्या पुढे जाणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी धार्मिक स्थळांवर तुर्तास बंदी ठेवणे शहाणपणाचे ठरणारे आहे. अन्यथा कोरोनाचा विळखा घट्ट होण्यास वेळ लागणार नाही. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाने ऑक्टोबरमध्ये कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा अंदाज व्यक्त केला आहे. सप्टेंबरपासून तिसरी लाट सुरू होऊ शकते. आणि ही लाट शिखर गाठेल तेव्हा रुग्णसंख्या एका दिवसाला चार ते पाच लाख पर्यंत जाऊ शकते. वाढत्या रुग्णसंख्येसाठी देशभर 2 लाख आयसीयू बेड्स उपलब्ध करावे लागतील. याशिवाय 5 लाख ऑक्सिजन बेड्स आणि 10 लाख विलगीकरण बेड्स तयार ठेवावे लागतील, अशा सूचना आपत्ती व्यवस्थापनाने दिल्या आहेत. दुसरी लाट ओसरत असतानाच भारतातच नाही तर जगभरात कोरोना व्हायरस वेगाने बदलू लागला. या जनुकीय बदलांमुळे नव्याने तयार झालेला आणि अधिक संसर्गजन्य असलेले डेल्टा व्हेरियंट्स जगाला अधिक त्रासदायक ठरतांना दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी प्रत्येकाला जागरूक असावे लागणार आहे. कारण भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कोरोनाची तिसरी लाट परवडणारी नाही. ऑगस्टच्या अखेरीस आणि सप्टेंबरमध्ये येऊ घातलेला गणेशोत्सव, नवरात्री, दसरा या सणावेळी बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी उफाळू शकते. कदाचित या गर्दीतून कोरोनाचा स्फोट होऊ शकतो, आणि कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र कोरोना लसीकरणांचा वेग वाढवण्याची गरज असून, गर्दीवर नियंत्रण आणल्यास राज्यात तरी कोरोनाची तिसरी लाट आपल्याला थोपवता येईल. यासाठी प्रत्येक नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. भारत खंडप्राय देश आहे आणि प्रत्येक राज्याची वेगळी वैशिष्ट्य आहेत. त्यामुळे प्रत्येक राज्यात कोरोनाविषयीची रोगप्रतिकारक शक्तीही वेगवेगळ्या प्रमाणात असणार आहे. अशावेळी तिसर्‍या लाटेचा धोका नाकारता येत नाही. पण त्याचं प्रमाण विविध राज्यांत आणि भागांत वेगवेगळं असेल. अख्ख्या देशालाच तिसर्‍या लाटेपासून धोका आहे, असं नाही. काही राज्यांमध्ये मात्र पुन्हा उद्रेक बघायला मिळू शकतो. आताच्या गतीने देशात लसीकरण पूर्ण व्हायला 2022 चा डिसेंबर उजाडेल, असेही स्वामिनाथन यांना वाटते आणि तोपर्यंत कोरोना विषाणूसोबत राहावे लागू शकेल, असेही त्यांनी म्हटले. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा एकदा धार्मिक स्थळे मंदिरे उघडल्यास कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या कमी होत नाही, आणि सणवार-उत्सव संपत नाही, तोपर्यंत धार्मिक स्थळे, मंदिरे बंदच ठेवण्याची गरज आहे. कारण भारतातील प्रत्येक व्यक्ती धार्मिक असून, प्रत्येकाच्या घरात देव्हारे आहेत. आपले श्रद्धास्थान आहेत. त्यामुळे मंदिरात जाण्यापेक्षा पूजा, प्रार्थना घरी करता येऊ शकतील. राहिला प्रश्‍न धार्मिक स्थळ बंद असल्यामुळे त्यावर उपजीविका करणार्‍या नागरिकांना अनुदानाच्या स्वरूपात मदत करता येऊ शकेल.

COMMENTS