दिलासादायक…यंदा पाणीटंचाई कमी, 3 गावांनाच टँकरने पाणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिलासादायक…यंदा पाणीटंचाई कमी, 3 गावांनाच टँकरने पाणी

मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याचा परिणाम यंदाच्या उन्हाळ्यात झाला आहे. जिल्ह्यात तीन गावे व दहा वाड्या वगळता कोठेही पिण्याच्या पाण्याची टंचाई नाही.

देवळाली प्रवरा नगरपालिकेचे बदनामी करणार्‍यांचा निर्णय नागरिकच घेतील
दोन पोलिस एकमेकांना भिडले…सीसीटीव्हीत कैद झाले
संगमनेरमध्ये जागतिक ग्राहक दिन उत्साहात

अहमदनगर/प्रतिनिधी- मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याचा परिणाम यंदाच्या उन्हाळ्यात झाला आहे. जिल्ह्यात तीन गावे व दहा वाड्या वगळता कोठेही पिण्याच्या पाण्याची टंचाई नाही. ही गावे व वाड्यांसाठी 5 टँकर सुरू करण्यात आले असून, ते रोज पाण्याच्या 15 खेपा करीत आहेत. यातून पावणे आठ हजार नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. 

एका बाजूला कोरोना संक्रमणाच्यासंदर्भातील उपाययोजना सुरू असतानाच इतर आवश्यक बाबींकडेही जिल्हा प्रशासनाचे लक्ष आहे. एप्रिलच्या मध्यापासून वाढत्या तापमानामुळे पठार भागातील काही वाड्या- वस्त्यांची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन त्यांची तहान भागविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू केला आहे. सध्या जिल्ह्यातील तीन गावे व दहा वाड्या वस्त्यावरील 7 हजार 703 नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाने पाच टँकर सुरू केले आहेत. त्यांच्या दिवसाकाठी एकूण 15 खेपा मंजूर आहेत. नगर जिल्ह्याची भौगोलिक स्थिती विषम आहे. प्रवरा, मुळा, गोदावरी, भीमाचे खोरे पाण्याने नेहमी वाहते असते तर दुसरीकडे पाण्यासाठी असूसलेल्या सीना, विंचरणा नद्या आहेत. कुठे नदी, कॅनॉल काठचे हिरवेगार भाग तर कुठे घाट, दरडी, डोंगरबारीचा परिसर आहे. कमांड अर्थात कॅनालखालील परिसराच्या तुलनेत पठार भागात पाणी टंचाई लवकर जाणवणे त्यामुळे साहजिकच असते. त्यातच घटते पर्जन्यमान, दुष्काळ व पाण्याचा अनिर्बंध उपसा यामुळे पाणीटंचाईच्या संकटास जिल्हयास सामोरे जावे लागते. टंचाईच्या काळात जिल्हा प्रशासनाद्वारे टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवून तहान भागवली जाते. पावसाने आगमन लांबवले वा तो नियमित आला नाही तर दसरा-दिवाळीपासूनच टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवण्याची वेळ येते. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठ्याची विक्रमी संख्या जिल्हयाने अनुभवली आहे. 2019 च्या उन्हाळ्यात 6 जून रोजी 827 इतक्या विक्रमी संख्येने प्रशासनाचे टँकर जिल्हाभर धावत होते. ती पाणी पुरवठा करणार्‍या टँकरची संख्या मागील दोन दशकातील उच्चांकी संख्या ठरली होती. मागील वर्षी 19 जून रोजी पाणी पुरवठा करणार्‍या टँकरची संख्या 113 होती. मागील वर्षीच्या पाऊस काळात जिल्ह्यात चांगल्या झालेल्या पावसामुळे शिवाराचा जलस्तर आश्‍वासक राहिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे एरवी जानेवारीपासून टँकरची होणारी मागणी यंदा मार्च उलटला तरी ऐकू आली नाही. मात्र, संगमनेर पठार भागात वाढत्या उन्हापाठोपाठ पाणीटंचाईच्या झळा एप्रिलपासून जाणवू लागल्या. त्यामुळे या परिसराची गरज लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या मान्यतेने संगमनेरातील तहानलेल्या 3 गावे व 10 वाड्यावस्त्यांसाठी 19 एप्रिलपासून प्रशासनाकडून पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी अडचण होणार नाही, याची दक्षता जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली घेतली जात असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांनी सांगितले.

2016 व 2019 ठरले उच्चांकी

मागील सुमारे 20 वर्षांपासून जिल्ह्यातील टँकरने पाणीपुरवठ्याची आकडेवारी पाहता 2016 व 2019 ही दोन्ही वर्षे उच्चांकी टँकर संख्येचे ठरले. वर्षनिहाय टँकरची संख्या अशी- 2002-131, 2003-377, 2004-619, 2005-192, 2006-223, 2007-48, 2008-129, 2009-88, 2010-52, 2011-22, 2012-289, 2013-707, 2014-369, 2015-521, 2016-826, 2017-114, 2018-333, 2019-827, 2020-113 व 2021-सध्या 5 टँकर सुरू.

COMMENTS