…त्यांनी नगरचा पांढरीपूल घाटच मानला माऊंट एव्हरेस्ट ; 38 तासात तब्बल 72 वेळा केली सायकलवर चढ-उतार, चौघांचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

…त्यांनी नगरचा पांढरीपूल घाटच मानला माऊंट एव्हरेस्ट ; 38 तासात तब्बल 72 वेळा केली सायकलवर चढ-उतार, चौघांचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश

नगरमधील चौघा सायकलपटूंनी प्रत्यक्ष माऊंट एव्हरेस्टला जाणे शक्य नसल्याने नगर-औरंगाबाद महामार्गावरील पांढरीा पूल घाटालाच माऊंट एव्हरेस्ट मानून तब्बल 72 वेळा त्याची चढ-उतार केली.

अल्पवयीन मुलीला मुंबईला पळवून नेत तिच्यावर अत्याचार
घंटागाडी येत नसल्याने बाबुर्डी रोड परिसरात घाणीचे साम्राज्य
वालवडमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

अहमदनगर/प्रतिनिधी- नगरमधील चौघा सायकलपटूंनी प्रत्यक्ष माऊंट एव्हरेस्टला जाणे शक्य नसल्याने नगर-औरंगाबाद महामार्गावरील पांढरीा पूल घाटालाच माऊंट एव्हरेस्ट मानून तब्बल 72 वेळा त्याची चढ-उतार केली. उन्हातान्हाची पर्वा न करता व झोप न घेता सलग 38 तास हे चौघेही यात व्यस्त होते. त्यांची ही मोहीम जागतिक विक्रमात नोंदली जाताना या चौघांनाही मानाच्या समजल्या जाणार्‍या हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करून गेली आहे. अहमदनगरमधील या सायकलस्वारांनी माऊंट एव्हरेस्टच्या उंची इतकी सायकल चालवून माऊंट एव्हरेस्ट गाठण्याच्या आव्हानाला आगळीवेगळी गवसणी घातली आहे. 

हिमालयातील सर्वांत उंच शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टला गवसणी घालण्याचे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते. काहींना ते शक्य होते तर अनेकजण या मोहिमेत मृत्यूमुखी पडतात तसेच तेथील हिमवादळे, ऑक्सिजन संपल्याने वा अन्य काही कारणाने काहीजण ही मोहीम अर्धवट सोडून देतात. पण नगरमधील सायकलिस्ट शरद काळे पाटील, उदय टिमकरे, सागर काळे व शशिकांत आवारे या चार सायकलस्वारांनी प्रत्यक्ष एव्हरेस्ट मोहिमेत न जाता जगातील सर्वात उंच असलेल्या या माऊंट एव्हरेस्टच्या उंची इतके मीटर सायकल चालविल्यामुळे त्यांचे नाव हॉल ऑफ फेम मध्ये नोंदवले गेले आहे. शनिवार दिनांक 27 मार्च 2021 रोजी जगातील हे सर्वात अवघड चॅलेंज पाच सायकलस्वारांनी स्वीकारले होते. मात्र, यातील सुयोग मोकाटे यांना काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे राईड पूर्ण करता आली नाही. बाकी चौघांनी मात्र ती यशस्वीरित्या पूर्ण केली.

 75 वेळा केला घाट खाली-वर

या आगळ्यावेगळ्या मोहिमेची माहिती शरद काळे पाटील यांनी दिली. ते म्हणाले की, जगात सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट असून त्याची उंची 8848 मीटर (29,029 फूट) आहे. सायकलस्वाराने हे अंतर एखाद्या टेकडी अथवा डोंगरावर वर-खाली करून तितकी उंची गाठायची असते. हे पूर्ण केल्यास त्याचे नाव हॉल ऑफ फेममध्ये नोंदविले जाते. पाचही सायकलस्वारांनी शनिवारी सकाळी 6 वा पांढरीपूल येथील हनुमान मंदिरापासून सुरुवात केली होती. 75 वेळा पांढरीचा पूल या घाटात सायकलस्वारांनी खालून वर आणि वरून खाली अशी सायकल चालवली. या घाटाच्या पायथ्यापासून माथ्यापर्यंतची उंची 125 मीटर आहे. त्यामुळे सायकलस्वारांना 8900 मीटर (एव्हरेस्ट उंची) भागीले 125 म्हणजे किमान 72 वेळा घाट चढ-उतार करावा लागला. हे करण्यास काळे पाटील यांना 37 तास 58 मिनीट लागले तर सागर काळे यास 38 तास व उदय टिमकरे यास 38 तास 29 मिनिटे लागले.  शशिकांत आवारे यांना 38 तास 32 मिनिट वेळ लागला. ही उंची गाठण्यासाठी या सर्वांनी तब्बल 350 किलोमीटर सायकल चालविली. विशेष म्हणजे सायकलस्वाराने मध्ये कुठेही झोप घेता कामा नये, अशी अट घातली गेली होती. आजपर्यंत जगातील 15,834  स्पर्धकांनी हे चॅलेंज पूर्ण केले आहे. भारतातील फक्त 152 स्पर्धकांना हे चॅलेंज पूर्ण करता आले. त्यात 135 पुरुष तर 17 महिला आहेत.

दोन महिन्यात केली तयारी

मागे दोन महिन्यापूर्वी पुण्यामध्ये 600  किलोमीटरची बी.आर.एम. करीत असताना एव्हरेस्ट समकक्ष मोहिमेबद्दल सायकलिस्ट कांचन बोकील यांच्याकडून माहिती मिळाली. काळे पाटील यांनी मागील गेल्या दोन वर्षापासून सह्याद्री क्लासिक या महाराष्ट्रातील सर्वात अवघड समजल्या जाणार्‍या सायकलिंग स्पर्धेत भाग घेऊन ती वेळेत पूर्ण केली आहे. त्यामुळे आपण ही मोहीम फत्ते करू शकू, असा आत्मविश्‍वास काळे पाटील यांना होता. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यात सराव करून त्यांनी यश मिळवले. मागील तीन वर्षापासून काळे पाटील सायकलिंगमधील सुपर रेंडूनियर एसआर आहेत. त्यांनीच इतर चार सायकलस्वारांना या मोहिमेबद्दल सांगून त्यांना भाग घेण्यास प्रवृत्त केले. विशेष म्हणजे हे चारही सायकलस्वार अकरावी व बारावी या वर्गात शिकत असून त्यांनी नुकताच सायकलींगचा श्रीगणेशा केला आहे व ही मोहीम त्यांच्या जीवनातील पहिलीच आव्हानात्मक मोहीम ठरली.

 —

चौकट

चोरही भेटले व मदत करणारेही

रात्रीच्या वेळी सायकल चालविताना घाटामध्ये चोरांपासून सायकलस्वारांना त्रासही झाला. एमआयडीसीचे पोलीस उपनिरीक्षक युवराज आठरे यांनी चोख बंदोबस्त केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. दुसरीकडे या जागतिक विक्रमाच्या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी अनेकांनी सायकल, मोटार सायकल किंवा फोर व्हिलर घेऊन सायकलस्वारांबरोबर काही अंतर प्रवास केला. त्यामुळे सायकल स्वरांचे मनोबल वाढले व त्यांचा आनंद द्विगुणित झाला. या काळात सायकलस्वारांना चहा, बिस्कीट, चिक्की, चॉकलेट, फळे, काजू, बदाम, खजूर, ताक व लस्सी अशा स्वरूपात अनेकांनी भेटवस्तू दिल्या. या सायकलस्वारांनी ही मोहीम फत्ते केल्यामुळे व त्यांचे नाव हॉल ऑफ फेममध्ये नोंदविले गेल्याने नगरच्या अनेक सायकलिस्टनी त्यांचे समक्ष भेटून अभिनंदन केले. 

ग्रामीण भागातील या चार सायकलपटूंनी केलेली कामगिरी निश्‍चितच अभिमानास्पद आहे. अहमदनगरच्या सायकलिस्टसाठी ही एक भूषणावह व प्रेरणादायी गोष्ट आहे.

चंद्रशेखर मुळे (काका), ज्येष्ठ सदस्य, नगर सायकलिस्ट असोसिएशन.

COMMENTS