तृणमूल काँग्रेसचा दिल्लीतला चेहरा पुन्हा घरी!

Homeसंपादकीय

तृणमूल काँग्रेसचा दिल्लीतला चेहरा पुन्हा घरी!

पश्‍चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत भाजपची सत्ता येईल, अशा भ्रमात राहिलेल्या नेत्यांनी तृणमूल काँग्रेसची साथ सोडून हाती कमळ घेतलं; परंतु त्यांचा सर्वांचा अंदाज चुकवित ममता बॅनर्जी यांनी पूर्वीपेक्षाही जास्त जागा आणि मतं मिळवून तिसर्‍यांदा सत्ता मिळविली.

समाजमनावर झालेले संस्कार हेच आत्महत्येचे कारण!
आयपीएल : विजेता होतो की ठरतो !
…तर भक्तांची दातखीळ बसेल!

पश्‍चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत भाजपची सत्ता येईल, अशा भ्रमात राहिलेल्या नेत्यांनी तृणमूल काँग्रेसची साथ सोडून हाती कमळ घेतलं; परंतु त्यांचा सर्वांचा अंदाज चुकवित ममता बॅनर्जी यांनी पूर्वीपेक्षाही जास्त जागा आणि मतं मिळवून तिसर्‍यांदा सत्ता मिळविली. त्यामुळं भाजपत गेलेल्यांना घरवापसीचे वेध लागले. तृणमूल काँग्रेसला चार वर्षांपूर्वी सोडचिठ्ठी देणारे मुकुल रॉय यांनी भाजपला रामराम करून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक कॉलही त्यांचा पक्षत्याग थोपवू शकला नाही. आता ममता दीदी आता त्यांच्यावर पुन्हा दिल्लीची जबाबदारी सोपविण्याची शक्यता आहे. 

गेल्या आठवड्यात भारतीय जनता पक्षाला पश्‍चिम बंगालमध्ये ममता दीदी धक्का देणार असल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. याच स्तंभात त्याचा परामर्श घेतला होता. त्या वेळी भाजपनं त्याचा इन्कार केला होता; परंतु आठ दिवसांतच भाजपला चांगलाच धक्का बसला. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर दोन्ही काँग्रेस सोडून नेत्यांनी कमळ हाती धरायची जणू रांग लावली होती. महाराष्ट्रात सत्ता आली नाही, त्यामुळं भाजपवासी झालेले नेते हवालदिल झाले आहेत. काँग्रेसची विचारधारा वेगळी आणि भाजपची विचारधारा वेगळी. त्यांना हिंदुत्व मान्य नाही; परंतु आता पक्षातून बाहेर पडता येत नाही आणि सत्ता न आल्यानं विरोधात बसण्याची वेळ आलेली. पाण्यावाचून मासे जसे तडफडतात, तशी तडफड या नेत्यांची होतं आहे. काँग्रेसमध्ये असताना ज्या भाजपवर टीका केली, त्याच भाजपचं गुणगाण करण्याची वेळ आली. अगदी तशीच गत पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सोडलेल्यांची झाली आहे. महाराष्ट्रात किमान करेक्ट कार्यक्रम करण्याच्या आश्‍वासनावर भाजपवासी झालेल्या काँग्रेसी नेत्यांना थोपवून धरलं असलं, तरी पश्‍चिम बंगालमध्ये काही करता येत नाही. ईडी, सीबीआय, प्राप्तिकर खात्यांसारख्या खात्यांचा वापर करून महाराष्ट्रातील नेत्यांना जसं भाजपत नेण्यात आलं, तसंच पश्‍चिम बंगालमध्येही करण्यात आलं. हसन मुश्रीफ यांच्यासारखे नेते बधले नाहीत, हा भाग वेगळा. तृणमूल सोडलेल्या नेत्यांना आता पश्‍चाताप झाला आहे. त्यांनी ममता दीदींना साकडं घालायला सुरुवात केली आहे. किमान पन्नास नेते तरी घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत; परंतु नऊ तारखेला झालेल्या बैठकीत सरसकट सर्वांना प्रवेश न देण्याचा निर्णय पक्षानं घेतला आहे. नाइलाज म्हणून भाजपत गेलेले आणि गद्दार अशी दोन गटांत विभागणी करण्यात येणार असून गद्दारांना प्रवेश दिला जाणार नाही, अशी भूमिका ममता दीदी व त्यांच्या सहकार्‍यांनी घेतली आहे. मुकुल रॉय हे तृणमूल काँग्रेस सोडलेले नेते. त्यांनी 44 महिन्यांपूर्वी भाजपत प्रवेश केला होता. भाजपनं त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष केलं होतं. आता त्यांच्या मुलालाही विधानसभेत उमेदवारी दिली होती. मुकुल रॉय यांच्या पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू असताना तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची वारंवार विचारपूस केली. तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि ममतांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी थेट रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पश्‍चिम बंगालमध्ये सत्ता न मिळाल्यानं भाजपनं तृणमूल काँग्रेसची कोंडी करायला सुरुवात केली होती. त्यावर मुकुल रॉय यांच्या चिरंजीवांनी भाजपलाच आत्मचिंतनाचा सल्ला दिला होता. नव्या सरकारला काम करू द्या, लगेच अडथळे आणू नका, असं ते म्हणाले होते. त्याच वेळी ते भाजप सोडणार, अशी चर्चा सुरू झाली होती. भाजप ते नाकारत होता; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याबाबत खात्री झाली असावी. त्यामुळं तर त्यांनी मुकुल यांना फोन केला. त्यांच्या पत्नीची विचारपूस केली; परंतु मुकुल रॉय यांचा प्रवेश मोदी यांचा फोन ही थांबवू शकला नाही. मुकुल रॉय यांनी केवळ आजारपणात विचारपूस आणि मदतीमुळं भाजप सोडलेला नाही. त्याचं कारण ते आतून दुखावले गेले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरपासून मुकुल रॉय, दिलीप घोष यांच्यासारख्यांना आपल्याला भाजपनं मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढं आणावं, अशी अपेक्षा होती. निवडणुकीच्या निकालानंतर भाजपनं विरोधी पक्षनेतेपदाची माळ तृणमूल काँग्रेसमधून विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपत आलेल्या सुवेंदू अधिकारी यांच्या गळ्यात घातली. भाजपतील जुन्या नेत्यांना हे पसंत पडलं नाही. त्यातच मोदी यांच्या पश्‍चिम बंगालमधील वादळग्रस्त भागातील दौर्‍याच्या  वेळी सुवेंदू यांना महत्त्व देण्यात आलं. त्यामुळं मुकुल रॉय यांच्यासह अनेक नेते दुखावले. त्यातून नाराजी वाढत गेली. तब्बल 44 महिन्यांनंतर मुकुल रॉय स्वगृही परतले आहेत. ते नोव्हेंबर 2017 मध्ये भाजपमध्ये सामील झाले होते. पक्षानं त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवलं होतं; परंतु गेल्या काही दिवसांपासून रॉय हे भाजपवर चिडले होते. रॉय आणि ममता बॅनर्जी यांची संगत 23 वर्षांहून अधिक जुनी आहे. दोघंही युथ काँग्रेसमध्ये एकत्र काम करायचे. 1998 मध्ये जेव्हा ममता यांंनी काँग्रेस सोडली आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) हा स्वत: चा पक्ष स्थापन केला, तेव्हा मुकुलदेखील त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून उभे राहिले. पक्ष स्थापन झाल्यानंतर रॉय हे दिल्लीत तृणमूल काँग्रेसचा राष्ट्रीय चेहरा बनले. 2001 मध्ये त्यांनी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविली; परंतु त्यांना विजय मिळवता आला नाही. यानंतर त्यांना 2006 मध्ये राज्यसभेवर पाठविण्यात आलं. तिथं त्यांनी तीन वर्षे पक्षाचं नेतृत्व केलं. डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या दुसर्‍या काळात ते राज्यमंत्री होते. विरोधकांच्या दबावामुळं जेव्हा दिनेश त्रिवेदी यांना काढून टाकलं गेलं. तेव्हा रॉय यांना रेल्वेमंत्रिपद मिळालं. शारदा-नारदा घोटाळ्यात त्यांचं नाव समोर आल्यानंतर रॉय यांच्या अडचणींना सुरुवात झाली. पक्षविरोधी कारवायामुळं त्यांना 2017 मध्ये निलंबित केलं होतं. त्यामुळं ते अपिरहार्यपणे भाजपत गेले. 11 ऑक्टोबर 2017 रोजी राज्यसभेचा राजीनामा देण्यापूर्वी रॉय यांनी भाजप नेते अरुण जेटली आणि कैलास विजयवर्गीय यांची भेट घेतली होती. यानंतर नोव्हेंबर 2017 मध्ये ते भाजपमध्ये सामील झाले. रॉय हे कैलास विजयवर्गीय यांच्या अगदी जवळचे होते. विधानसभेतील पराभवानंतर विजयवर्गीय यांच्यावर भाजपतून प्रचंड टीका झाली. त्यामुळं ते पश्‍चिम बंगालकडे फिरकलेच नाहीत.

भाजपनं सुवेंदू अधिकारी यांना पक्षाचा मुख्य चेहरा बनविला आहे. दिलीप घोष यांचाही स्वत: चा गट आहे. या सर्व बाबींमुळे रॉय यांचा भाजपविषयी गैरसमज झाला. निकालानंतर त्यांनी भाजपपासून अंतर राखणं सुरू केलं. मुकुल हे सुवेंदूइतके वाईट नाही, असं ममतांनी म्हटलं होतं. मुकुल रॉय यांनी तृणमूल काँग्रेस सोडल्यानंतरच्या 44 वर्षांत भाजपत असूनही कधीही ममता बॅनर्जी यांच्यावर कधीही वैयक्तिक टीका केला नाही. मुकुल रॉय आणि सुवेंदू अधिकारी या दोघांनीही विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या; पण पक्षानं मुकुल यांना बाजूला सारत सुवेंदू अधिकारी यांना विरोधी पक्षनेते केलं. पश्‍चिम बंगालच्या राजकारणात मुकुल हे सुवेंदू यांच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर ते पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा होऊ शकतात असा अंदाज वर्तविला जात होता; पण भाजपनं त्यांना फारसं मूल्य दिलं नाही. त्यामुळं त्यांनी भाजपचा त्याग केला. रॉय आता विधानसभेचा राजीनामा देतील. त्यांना ममता दीदी आता राज्यसभेवर परत पाठविणार आहेत. तृणमूल काँग्रेसमध्ये अभिषेक बॅनर्जी यांचं वाढत चाललेलं महत्त्व मुकुल रॉय यांनी पक्ष सोडण्यामागील एक कारण होतं. आता अभिषेक यांना राष्ट्रीय सरचिटणीस करण्यात आलं आहे. त्यांच्या खांद्यावर देशाच्या इतर राज्यात तृणमूल बांधण्याची जबाबदारी आहे. अशा स्थितीत पुन्हा पक्षात वरिष्ठ नेत्यांचं वर्चस्व वाढू शकते. मुकुल रॉय आणि त्यांचा मुलगा शुभृंगशु पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये परतले आहेत. मुकुल स्वगृही परतले असले, तरी त्यातून आता ममतांनी इशारे दिले आहेत. अभिषेकचं तृणमूल काँग्रेसवर कायमच वर्चस्व गाजवणार असल्याचे संकेत ममतांनी दिले. मोदी यांनी फोन करूनही ममता यांनी मुकुल यांचं मन वळविलं नाही. अभिषेकला पुढं केलं. मुकुल दोन-तीन दिवसांपूर्वी दीदींना भेटले. मुकुल रॉय यांना एकेकाळी तृणमूल काँग्रेसमध्ये दुसर्‍या क्रमांकांचं स्थान होतं. आता ते मिळेल, की नाही याबाबत साशंकता आहे; परंतु किमान सन्मान तरी मिळेल.

COMMENTS