तांत्रिक दोषाचे बळी

Homeसंपादकीय

तांत्रिक दोषाचे बळी

अपघाताचे पूर्वानुमान करता येत नाही, हे खरे असले, तरी काळजी घेतली, तर अपघात टाळता येतात.

महागाईचा आगडोंब
मुंबईकरांचा कौल कुणाला ?
परमबीर सिंग यांना झटका

अपघाताचे पूर्वानुमान करता येत नाही, हे खरे असले, तरी काळजी घेतली, तर अपघात टाळता येतात. संवेदनशील किंवा आरोग्याला घातक ठरू शकतात, अशा प्रकरणात अधिक काळजी घेऊन काम करायला हवे. त्यातील छोटीशी चूकही निरपराधांच्या जीवावर बेतू शकते. चूक एकाची आणि शिक्षा दुसर्‍यांना असे बर्‍याचदा घडते. नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात 24 जणांचे गेलेले बळी हे निष्काळजीपणाचेच आहेत. चुकीची जबाबदारी स्वीकारण्यात मोठेपण असते; परंतु राज्यकर्ते मग ते महापालिकेतील असो, की राज्य शासनातील; त्यांनी परस्परांवर जबाबदारी ढकलून मोकळे होण्याचे ठरविलेले आहे. कोरोनावर मात करून अनेक रुग्ण दोन-चार दिवसांत घरचा रस्ता धरणार होतेे; परंतु घराच्या ऐवजी त्यांना वरचा रस्ता धरावा लागला. अशा संकटात राजकारण बाजूला ठेवून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन घटना कशी झाली, त्यात काय त्रुटी होत्या, अशा त्रुटी दूर  करण्यासाठी पुढे काय करावे लागेल, याचा विचार करायला हवा होता; परंतु रुग्णालय महापालिकेचे, तिथे भाजपची सत्ता आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर मात्र सरकारवर आरोप करून मोकळे झाले. त्यामुळे काँग्रेसनेही त्यांना तितकेच चोख प्रत्युत्तर दिले. देशभर कोरोनाची दुसरी लाट आहे. रुग्ण ऑक्सिजनअभावी तडफडून मरत असल्याच्या घटना नालासोपारा, पुणे, शहाडोल (मध्य प्रदेश), भोपाळ, आंबेजोगाई आदी ठिकाणी घडत असताना नाशिकमध्ये ऑक्सिजनची गळती होते आणि रुग्णांकडचा ऑक्सिजन बंद होऊन 24 रुग्णांचा बळी जातो, हे चिंताजनक आहे. या घटनेतील मृताच्या वारसांना प्रत्येकी दहा लाख रुपये देण्यात येणार असले, तरी एका मुलाने वडील गमावल्यानंतर जी प्रतिक्रिया व्यक्त केली, ती जास्त महत्त्वाची आहे. दहा लाख रुपये दिल्याने माझे वडील परत मिळणार आहेत का, असा निरुत्तर करणारा प्रश्‍न त्याने केला. ऑक्सिजनच्या दबावामुळे नोझल तुटले. त्यामुळे ही ऑक्सिजन गळती झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी गेल्या दीड महिन्यांपूर्वी जी टाकी बसविण्यात आली, तिथे इतक्या लवकर नोझल तुटलेच कसे असा प्रश्‍न उपस्थित होतो. या रुग्णालयातील ऑक्सिजन टँकला गळती लागल्याने हजारो लीटर ऑक्सिजन वाया गेले. या वेळी अनेक कोव्हिड रुग्णांवर उपचार सुरू होते. यातील 150 लोक व्हेंटिलेटरवर होते. रुग्णालयात अचानक ऑक्सिजन गळती झाल्याने रुग्णांना होणारा पुरवठा बंद झाला. त्यामुळे व्हेंटिलेटवर असलेल्या रुग्णांपैकी 24 जणांचा तडफडून मृत्यू झाला. ऑक्सिजन गळती झाल्यानंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवळपास एक ते दीड तासानंतर ऑक्सिजन गळती रोखण्यास अग्निशमन दलाला यश आले. या दुर्घटनेत कुणी आई गमावली, कुणी पोटचा मुलगा गमावला तर आणखी कुणी जवळच्या माणसाला गमावले. झाकिर हुसेन रुग्णालयात झालेल्या या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी सात सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती चौकशी करेल. या समितीमध्ये वैद्यकीय अधिकारी, तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य, महापालिकेचे अभियंता आणि ऑक्सिजन प्लांट उभारणीचे काम करणार्‍या लोकांचा समावेश असेल. खरेतर ज्यांनी प्रकल्पाचे काम केले, त्यांनाच चौकशी समितीत घेतल्याने चौकशी निपक्षपातीपणे होण्यावर प्रश्‍नचिन्ह लागले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दहा किलोलिटर आणि नाशिकरोड येथील नवीन बिटको रुग्णालयात 21 किलो लिटर क्षमतेची प्राणवायूची टाकी बसविण्यात आली होती. या व्यवस्थेची देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदार कंपनीची होती, असे महापालिकेचे म्हणणे आहे. द्रवरूप प्राणवायूची तातडीने उपलब्धता करण्यासाठी महापालिकेने नवीन टाकी खरेदी करून बसविण्याची चाचपणी केली होती; परंतु त्यास तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने तातडीची गरज म्हणून घाईघाईत पुण्यातील एका कंपनीकडून 10 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दोन्ही रुग्णालयांसाठी टाक्या घेण्यात आल्या. दोन, तीन वेळा निविदा मागवूनही पुण्यातील एकाच ठेकेदाराची निविदा आली. तातडीचे कारण देऊन हे काम संबंधित संस्थेला देण्यात आले. कार्यान्वित झालेल्या यंत्रणेची महापालिकेने तपासणी केली की नाही, हा प्रश्‍न आहे. नाशिक येथील झाकिर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीमुळे 22 रुग्णांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व रुग्णालयांमधील ऑक्सिजन साठवणूक टाक्या तसेच व्यवस्थेचे तात्काळ ऑडिट करण्याची आवश्यकता आहे. हा विषय एकट्या झाकिर हुसेन रुग्णालयाचा नसून करोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर ज्या ज्या रुग्णालयांमध्ये अशा प्रकारे ऑक्सिजन साठवणूक टाक्या आहेत, त्या सर्वच रुग्णालयांचा आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत रुग्णसंख्या प्रचंड वाढू लागली. यातील बहुतेक रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असल्याने कोरोना रुग्णालयात रुपांतर केलेल्या बहुतेक रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयात ऑक्सिजन साठवणूक टाक्या बसवायला सुरुवात केली. अनेक रुग्णालयांनी आपली क्षमता दुप्पट केली. या सर्वांत ऑक्सिजन टाक्यांतून अथवा रुग्णालयात या टाक्यांच्या माध्यमातून ऑक्सिजन वाहून नेताना गळती झाल्यास ती तात्काळ रोखणे तसेच तोपर्यंत रुग्णांच्या ऑक्सिजनची पर्यायी व्यवस्था केली आहे अथवा नाही, याची कोणतीच ठोस माहिती आज राज्याची आरोग्य यंत्रणा तसेच महापालिकांकडे नाही. कोणत्याही मोठ्या हॉस्पिटलमध्ये बॅकअप व्यवस्था असणे अपेक्षित असते. महापालिकेच्या सर्वच मोठ्या रुग्णालयात ऑक्सिजन साठवणूक टाक्यांच्या नियमित तपासणीसाठी पूर्णवेळ तंत्रज्ञ नियुक्त करणे अपेक्षित आहे. नाशिक महापालिकेच्या रुग्णालयात तशी व्यवस्था होती, की नाही, हे पाहावे लागेल.

COMMENTS