'आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका, अशी विनंती मुख्यमंत्री वारंवार करत आहेत; परंतु कोणीही ऐकत नाही.
मुंबई/प्रतिनिधीः ‘आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका, अशी विनंती मुख्यमंत्री वारंवार करत आहेत; परंतु कोणीही ऐकत नाही. अशीच स्थिती राहिली तर जे नियम रात्रीचे आहेत, ते नियम दिवसाही लागू करावे लागतील,’ असा इशारा पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिला.
‘लोकांना टाळेबंदी नको आहे; पण स्वतःचा व्यवसाय नोकरी सांभाळत सर्व काही करायचे आहे. लोकांनी नियम पाळले नाहीत, तर त्यांचा जीव धोक्यात येत आहे, हे देखील समजून घ्यायला हवे. सकाळी किराणा दुकान, रेल्वे इत्यादी ठिकाणी काय व्यवस्था करायची याचे नियोजन सध्या सुरू आहे. कारण या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत असते. त्यात जर कुणाला लागण झाली तर रुग्णांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे,’ अशी भीती त्यांनी व्यक्त केली. मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याने परत एकदा मुंबई शहर आणि उपनगरातील मोठे उपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. राज्यात प्रत्येक दिवशी तीस हजाराच्या आसपास कोरोना रुग्ण आढळत आहेत. राज्यात अडीच लाखापेक्षा जास्त अॅक्टिव्ह रुग्ण असून गृह विलगीकरणात सर्वाधिक रुग्ण आहेत, तर दुसरीकडे लक्षणे गंभीर स्वरूपात असलेले रुग्ण शासनाच्या वेगवेगळ्या रुग्णालयात तसेच खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
पुढच्या कालावधीमध्ये अशीच रुग्ण संख्या वाढत राहिली, तर मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. हेच लक्षात घेत मुंबईत पुन्हा एकदा जम्बो उपचार केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शेख यांनी दिली. कोरोना चाचण्यांची क्षमता वाढवली, तर मुंबईत दिवसाला नऊ ते दहा हजार रुग्ण वाढतील. त्यामुळे याचा ताण प्रशासनावर पडेल; मात्र दिवसाला दहा हजार नवे रुग्ण आढळले, तरी तो ताण मुंबई प्रशासन सहजपणे पेलू शकते, त्यासाठी रुग्णालये सज्ज करण्यात आली आहेत. मुंबई सध्या एकूण 13 हजार खाटा उपलब्ध असून त्यापैकी साडेनऊ हजार खाटा वापरात आहेत. त्यातही दीड हजार रुग्ण हे मुंबई बाहेरील आहेत. सध्या मुंबईत तीन हजार बेड रिकामी असून येत्या काळात काही खासगी रुग्णालयांकडून खाटा उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात मुंबईत आणखी सात हजार खाटा उपलब्ध होतील. त्यामुळे खाटासाठी कोणत्याही रुग्णांची हेळसांड होणार नाही; पण नागरिकांनी ठरवून दिलेली यंत्रणा मोडीत काढू नये आणि चाचणीचा अहवाल घेऊन खाटासाठी धावपळ करू नये, असा सल्ला आयुक्त इक्बालसिंह चहेल यांनी या वेळी दिला. खासगी प्रयोगशाळांनी अगोदर कोरोनाचा अहवाल आधी महापालिकेला द्यावा, त्यानंतर महापालिका पॉझिटिव्ह रुग्णाची घरी जावून तपासणी करेल आणि आवश्यक असेल, तरच त्यांना रुग्णालयात भरती केले जाईल; परंतु नागरिकांनी स्वतः फोन करून बेडची मागणी केल्यास संबंधित रुग्णाला बेड उपलब्ध करून देऊ नये, असा आदेश मुंबई महापालिकेने दिला आहे.
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली, तरी त्यामध्ये लक्षणे नसणाऱ्या रुग्णांचा समावेश जास्त आहे; परंतु लक्षणे नसणारे लोक बेजबाबदारपणे वागल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले.
COMMENTS