ड्रॅगनचे बदलते धोरण

Homeसंपादकीय

ड्रॅगनचे बदलते धोरण

चीन, जपानसारख्या देशांत युवकांचे प्रमाण कमी झाले आहे. तिथे वृद्धांची संख्या वाढते आहे. कमवती लोकसंख्या कमी होत असल्याने असंतुलन वाढले आहे. त्यातही चीनने ’वन चाईल्ड पॉलिसी’ घेतली होती.

निवडणूक आयोगाने नागरिकांच्या जिविताशी खेळू नये!
नवे मैत्रीपर्व चिंतेचे
अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य !

चीन, जपानसारख्या देशांत युवकांचे प्रमाण कमी झाले आहे. तिथे वृद्धांची संख्या वाढते आहे. कमवती लोकसंख्या कमी होत असल्याने असंतुलन वाढले आहे. त्यातही चीनने ’वन चाईल्ड पॉलिसी’ घेतली होती. त्याचा चीनवर प्रतिकूल परिणाम झाला होता. चीनमध्ये लोकसंख्यावाढीचा तर गेल्या सहा दशकांत प्रथमच नीचांकी पातळीवर आला. चीनमध्ये लोकसंख्या वाढीच्या घटत्या दराबद्दल तज्ज्ञांना चिंता वाढत होती. 


घटत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी पाच वर्षांपूर्वी चीनने ’वन चाईल्ड पॉलिसी’ मागे घेतली. दोन मुलांच्या जन्माला परवानगी दिली. जगात अनेक देशांत घटलेल्या लोकसंख्येमुळे चिंता व्यक्त होत असून अनेक देशांनी मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली आहे. भारताला मात्र ते परवडणारे नाही. गेल्या 40 वर्षांत लोकसंख्या नियंत्रणाच्या अनेक उपाययोजना करूनही हवे तेवढे यश आले नाही; परंतु भारत हा आता तरुणांचा देश आहे, हे चांगले आहे. लोकसंख्या वाढीचा दर घटण्यासाठी केवळ सरकारचे धोरणच जबाबदार नाही, असे चीनमधील काही लोकांचे मत आहे. त्यामुळे आता चीनने एका जोडप्याला तीन मुलांची परवानगी दिली आहे. चीनमध्ये घटत्या लोकसंख्येचे अनेक परिणाम दिसत आहेत. अनेकांना आता मूलच नको असे वाटते. ’बाळाची जबाबदारी आणि चिंता यांचे ओझे न बाळगता त्यांना जीवन जगायचं’ आहे, असा दृष्टिकोन अनेक महिलांचा आहे. ज्यांना मुले आहेत, त्यांच्यासाठी उत्तम आया, चांगली शाळा किंवा कपडे शोधण्यामध्येच पालक व्यग्र आहेत. दोन पिढ्यांमध्ये असलेला बाळाच्या जबाबदारीबाबतचा हा वैचारिक मतभेद, चीनमध्ये शहरी भागात मूल जन्माला घालण्याबाबत दृष्टिकोन किती बदलला आहे याचे संकेत देत आहे. चीन सरकारने मे महिन्याच्या सुरुवातीला लोकसंख्येचे आकडे जाहीर केले होते. त्यानुसार गेल्यावर्षी चीनमध्ये जवळपास एक कोटी वीस लाख बाळांचा जन्म झाला. याउलट 2016 मध्ये हा आकडा एक कोटी ऐंशी लाखांच्या आसपास होता. याचा अर्थ ’वन चाईल्ड पॉलिसी’ रद्द केल्यानंतरही चीनमध्ये बाळांच्या जन्मात साठ लाखांनी घट झाली. चीनमधील तज्ज्ञांच्या मते, लोकसंख्या वाढीचा दर असाच राहिला तर, चीनची लोकसंख्या नकारात्मक दृष्टीने घटत जाईल. म्हणजे देशातील तरुणांची लोकसंख्या कमी असेल आणि एक वेळ अशी येईल, की देशात वृद्धांची लोकसंख्या सर्वाधिक असेल. अभ्यासकांच्या मते, या अशी परिस्थिती निर्माण झाल्यास देशात वृद्धांची काळजी घेण्यासाठीही नागरिक नसतील आणि देशाच्या भवितव्याच्या निर्मितीसाठी हातभार लावणार्‍यांची संख्या आणखी कमी होत जाईल. अशा स्थितीत देशावर आरोग्य आणि सामाजिक जबाबदारी जास्त वाढेल.

    चीनमध्ये जन्मदर घटण्याच्या मागे देशाची आर्थिक आणि सामाजिक प्रगती हे एक महत्त्वाचे कारण आहे. देशाचा विकास ज्या पद्धतीने होत असतो, त्यानुसार त्याठिकाणी साधारणपणे जन्मदर घटत असतो. त्यामागचे कारण म्हणजे लोकांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढते आणि शिक्षणाबरोबर त्यांचे प्राधान्यक्रम बदलत जातात. अशा वेळी ते त्याचे करिअर किंवा इतर गोष्टींबाबत अधिक विचार करू लागतात. जपान आणि दक्षिण कोरिया अशा चीनच्या शेजारी राष्ट्रांमध्येही गेल्या काही वर्षांमध्ये लोकसंख्या वाढीच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. या देशांमध्ये सरकार विविध योजनांच्या माध्यमातून बाळ जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन देत असूनही अशी स्थिती निर्माण झाली आहे. चीनमध्ये लिंग गुणोत्तरामधील संतुलन मोठ्या प्रमाणावर बिघडल्यामुळे याठिकणी स्थिती अधिक गंभीर झाली आहे. चीनमध्ये सध्या विवाह करण्यासाठी महिलांच्या शोधात असलेल्या पुरुषांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. चीनमध्ये पुरुषांची संख्या ही महिलांच्या तुलनेत खूप जास्त आहे. सरकारी आकडेवारीचा विचार करता, गेल्यावर्षी चीनमध्ये महिलांच्या तुलनेत साडेतीन कोटी पुरुष अधिक होते. मुलांपेक्षा मुलींना कमी लेखणार्‍या चीनच्या संस्कृतीमध्ये ’वन चाइल्ड पॉलिसी’मुळे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या धोरणामुळेच 1980 नंतर लोकांनी मुलांच्या हव्यासापोटी मुलींच्या भ्रूणहत्या केल्या. त्यामुळे विवाह संस्था विस्कळीत झाली आहे. विशेषतः ज्या लोकांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती कमकुवत आहे त्यांच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. चीनमधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की सरकारने धोरणामध्ये तर बदल केला आहे; पण एखाद्या कुटुंबाला हवे असणारं आर्थिक आणि सामाजिक पाठबळ मिळण्यासाठी सरकारने काहीही पावले उचलली नाहीत. महागाईच्या काळामध्ये मुलांना वाढवणे आधीच अवघड होऊन बसले आहे. चीनमध्ये गेल्या काही दशकांमध्ये उदरनिर्वाह भागवण्यासाठी लागणार्‍या खर्चामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. चीनमध्ये लोक एखाद्या सरकारी धोरणामुळे मुले जन्माला घालायला घाबरत नसून, बाळाच्या जन्मानंतर त्याचे पालन पोषण महागल्याने ते यासाठी धजावत नाहीत. चीनमध्ये आणि विशेषतः शहरी नागरिकांमध्ये यशस्वी जीवनाची व्याख्याच बदलली आहे. याठिकाणी आता विवाह करणे किंवा मुले जन्माला घालणे या पारंपरिक गोष्टींचा यशस्वी जीवनाशी संबंध लावला जात नाही. लोक सध्या याठिकाणी वैयक्तिक प्रगतीवर अधिक लक्ष केंद्रीत करत आहेत. चीनमध्ये अजूनही हेच मत प्रचलित आहे की, मुलांच्या संगोपनाची जबाबदारी ही प्रामुख्याने आईचीच आहे. बाळाचा जन्म झाल्यानंतर पुरुषांसाठी 15 दिवसांच्या सुटीची तरतूद चीनमध्ये आहे. पण याचा लाभ घेणार्‍यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. चीनमध्ये नव्या पिढीतील तरुणी मूल जन्माला घालण्यासाठी घाबरत आहेत. त्यांच्या करिअरवर याचा वाईट परिणाम होईल, याची भीती त्यांच्या मनात असते. एक तर महिलांसाठी रोजगाराच्या चांगल्या संधी कमी आहेत. त्यात ज्या महिला चांगली नोकरी करत आहेत त्यांना ती संधी गमावण्याची इच्छा नसते. आता चीनमध्ये पुढील पाच सहा वर्षांपर्यंत मुलं जन्माला घालण्याबाबत काहीही निर्बंध नसतील; मात्र काही तज्ज्ञांच्या मते चीनमध्ये लोकसंख्या नियंत्रणासाठी आखण्यात आलेल्या सर्व धोरणांना त्वरीत संपुष्टात आणणे गरजेचे आहे. चीनच्या सरकारने कुठलाही विचार न करता अशा प्रकारचे निर्बंध हटवणे गरजेचे आहे.

COMMENTS