देवळाली प्रवरा /प्रतिनिधी महाराष्ट्रामध्ये ज्वारीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून दिवसेंदिवस लोकांमध्ये ज्वारीचे आहारातील महत्व लक्षात येवू लागले
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
महाराष्ट्रामध्ये ज्वारीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून दिवसेंदिवस लोकांमध्ये ज्वारीचे आहारातील महत्व लक्षात येवू लागले आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या ज्वारी सुधार प्रकल्पाने बागायती तसेच कोरडवाहू जमिनींसाठी ज्वारीचे वैशिष्ट्यपूर्ण असे विविध वाण आतापर्यंत विकसीत केलेले आहेत. यामुळे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळालेला आहे. या प्रकल्पाने ज्वारीचे विविध वाण विकसीत करुन शेतकर्यांसाठी उल्लेखनीय कार्य केले असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
भारताचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी नुकतेच विविध पिकांचे वैशिष्ट्यपूर्ण असे 35 वाण राष्ट्राला लोकार्पण केले. या वाणांमध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या ज्वारी सुधार प्रकल्पाने विकसीत केलेल्या सी.एस.एच.-47 या वाणाचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर कुलगुरु डॉ. पाटील यांनी ज्वारी सुधार प्रकल्पाला भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत संशोधन संचालक डॉ. शरद गडाख हे होते. यावेळी वरिष्ठ ज्वारी पैदासकार डॉ. दिपक दुधाडे यांनी ज्वारी प्रकल्पाबद्दल माहिती दिली.
डॉ. शरद गडाख यांनी ज्वारी प्रकल्पाने आतापर्यंत केलेल्या संशोधनाचा आढावा सादर केला. कुलगुरुंनी यावेळी ज्वारी सुधार प्रकल्पातील सर्व शास्त्रज्ञ, कर्मचारी व मजुरवर्ग यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल अभिनंदन केले व पुढील संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कुलगुरुंनी सी.एस.एच.-47 या वाणाच्या प्रात्यक्षिक प्लॉटला भेट दिली. ज्वारी सुधार प्रकल्पावर नविनच सोलर उर्जेवर आधारीत कुंपन तयार करण्यात आले आहे.
याचे उद्घाटन कुलगुरु डॉ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ज्वारी किटकशास्त्रज्ञ डॉ. उत्तम कदम यांनी स्वागत तर डॉ. प्रमोद कोटेचा यांनी आभार व्यक्त केले. यावेळी विभाग प्रमुख डॉ. विजू अमोलीक तसेच प्रकल्पातील प्रा. सुदाम निर्मळ, डॉ. उदय दळवी, डॉ. मनाजी शिंदे, डॉ. जितेंद्र पाटील व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
COMMENTS