ज्येष्ठ गायक व संगीतकार पं. नाथराव नेरळकर कालवश

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्येष्ठ गायक व संगीतकार पं. नाथराव नेरळकर कालवश

मराठवाड्यातील ज्येष्ठ गायक व संगीतकार पं. नाथराव नेरळकर (वय ८७) यांचे रविवारी औरंगाबादेत निधन झाले.

‘व्यंकटेशा’! अधिकार्‍यांना बदनाम करण्याचे षडयंत्र केव्हापासून ?
मराठवाड्यावर पुन्हा गारपीट, अवकाळीचे सावट
चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीका केली  

औरंगाबाद : मराठवाड्यातील ज्येष्ठ गायक व संगीतकार पं. नाथराव नेरळकर (वय ८७) यांचे रविवारी औरंगाबादेत निधन झाले. सुमारे सहा दशकांहून अधिक काळ नाथराव नेरळकरांनी मराठवाड्यात संगीत साधना केली होती. त्यांच्या निधनामुळे मराठवाड्यातील संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. आपल्या अवीट स्वरांनी मराठवाड्याचे संगीत क्षेत्र समृद्ध केले. मराठवाड्याच्या अस्सल मातीतील हे कलंदर व्यक्तिमत्त्व आपल्या संगीत शिक्षण आणि प्रसारात सक्रिय आहे. नाथरावांचे जन्मगाव नांदेड आहे. त्यांच्या पश्चात अनंत व जयंत ही दोन मुले, मुलगी हेमा नेरळकर उपासनी, सून, नातवंडे, असा परिवार आहे.

नाथरावांना मिळालेले पुरस्कार गानमहर्षी अण्णासाहेब गुंजकर यांच्याकडे त्यांनी संगीत शिक्षणाचे धडे घेतले व त्यानंतर संगीत शिक्षणाच्या प्रचार व प्रसारासाठी त्यांनी आपले आयुष्य व्यतित केले. २०१५ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीची सन्मानाची फेलोशिप मिळाली होती. दिल्लीत त्यांचा सन्मान झाला होता. यानंतर २०१७ मध्ये त्यांना चतुरंग प्रतिष्ठानच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. संगीत कला आणि कलाकारांना समाजात मान, प्रतिष्ठा नव्हती अशा काळात गानमहर्षी अण्णासाहेब गुंजकर यांच्याकडे नाथरावांनी संगीत शिक्षणाचे धडे घेतले आणि संगीत शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. नाथरावांनी अनेक होतकरू, गरीब विद्यार्थी शोधले. त्यांना गुरुकुलमध्ये स्वखर्चाने शिक्षण दिले. या गुरुकुलामधून जागतिक कीर्तीचे कलावंत घडले. विद्यार्थ्यांना मिळालेले यश हे काही एका रात्रीत मिळाले नाही. अर्थात त्यामागे सहा दशकांची कठोर संगीत साधना होती. गांधर्व मंडळाच्या मध्यमा, संगीत विशारद तसेच अलंकार परीक्षेत एकाच वर्षात नाथरावांच्या तीन विद्यार्थिनींनी देशात अव्वल गुणांनी प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला.

साहित्य व संगीत क्षेत्रातील दिग्गजांशी स्नेह आणि जिव्हाळा

नांदेडच्या प्रतिभा निकेतनमध्ये नाथराव संगीत शिक्षक होते. संगीत मैफलींच्या निमित्ताने अनेक दिग्गज कलावंत नांदेडला येत आणि मितभाषी नाथरावांच्या प्रेमात पडत. या मितभाषी स्वभावामुळे, साहित्य व संगीत क्षेत्रातील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, श्री. ना. पेंडसे, प्राचार्य राम शेवाळकर, हिराबाई बडोदेकर, गंगूबाई हनगल, पं. भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व, शोभा गुर्टू, किशोरी आमोणकर, पं. जितेंद्र अभिषेकी, संगीतकार यशवंत देव, हार्मोनियम वादक आप्पा जळगावकर, पं. जसराज, बकुळ पंडित, सुरेश वाडकर, झाकीर हुसेन यांच्यासारख्या दिग्गजांशी स्नेह आणि जिव्हाळा निर्माण झाला. नांदेडच्या वास्तव्यात नाथराव संगीत विशारद परीक्षेत देशभरात प्रथम आले आणि त्यांचा पं. विष्णू दिगंबर पलुस्कर सुवर्णपदकाने सन्मान झाला. प्रतिभा निकेतनमध्ये तेरा वर्षे संगीत शिक्षक, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, कोलकाता येथील रिसर्च अकादमीचे गुरुपद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संगीत विभागाचे प्रमुखपद भूषविले.

COMMENTS