नगर : राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई 136 ने आरपारची लढाई सुरु करण्य
नगर :
राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई 136 ने आरपारची लढाई सुरु करण्याचे ठरविले आहे. सरकारला जाग आणण्यासाठी राज्य सरकारी, निमसरकारी, जि.प.कर्मचारी महासंघ, ग्रामसेवक युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने 29 ऑक्टोबर रोजी ठिय्या आंदोलनाचे आयोजन केले आहे.
यात राज्यातील सर्व ग्रामसेवक सहभागी होणार आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषद, पंचायत समिती कार्यालयासमोर हे आंदोलन होणार असल्याची माहिती ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी दिली आहे.
एकनाथ ढाकणे यांनी म्हटले आहे की, 1 नोव्हेंबर 2005 पासून महाराष्ट्र राज्य शासनाने परिभाषित अंशदान पेन्शन योजना (डीसीपीएस) लागू केली आहे. राज्य सरकारी, निमसरकारी, जि.प.कर्मचारी, ग्रामसेवक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना ही योजना लागू आहे. सन 2015 पासून या योजनेचे रुपांतर राष्ट्रीय पेन्शन योजनेत (एनपीएस) करण्यात आले.
गेल्या 16 वर्षांत एनपीएस धारक कर्मचारी, ग्रामसेवक यांचे अनुज्ञेय हक्क नाकारण्यात आल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात अनेक कर्मचारी, ग्रामसेवक यांचे अकाली निधन झाल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले, पेन्शन नसल्याने त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना तातडीने लागू करणे आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र विधानसभेने राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करण्याचा ठराव करून तो केंद्र शासनाकडे पाठवावा, अशी मागणी ढाकणे सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी केली आहे.
COMMENTS