तारकपूरजवळील रुग्णालयापासून अमरधामपर्यंत मृतदेह घेऊन जाण्यासाठी साडेचार हजार रुपये घेणार्या संबंधित रुग्णवाहिकेवर कारवाई करण्याची ग्वाही जिल्हाधिकारी डॉ.
अहमदनगर/प्रतिनिधी-तारकपूरजवळील रुग्णालयापासून अमरधामपर्यंत मृतदेह घेऊन जाण्यासाठी साडेचार हजार रुपये घेणार्या संबंधित रुग्णवाहिकेवर कारवाई करण्याची ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शनिवारी तीन मंत्र्यांच्या समोर दिली. तसेच रुग्णालयांनीच त्यांच्याकडील रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह अमरधामला पोहोचवण्याचे काम करण्याबाबत त्यांची बैठक घेऊन तशी सूचना दिली जाईल, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.
दोन दिवसांपूर्व म्हणजे 15 एप्रिल रोजी दैनिक लोकमंथनने मृताच्या टाळूवरील लोणी गोड असे वृत्त प्रसिद्ध केले होते व रुग्णालयांच्या रुग्णवाहिकांद्वारे मृत कोरोना रुग्णाचा मृतदेह अमरधामला पोहोचवण्यासाठी 8 हजार रुपये मागितले जातात व रुग्णांच्या नातेवाईकांनी मिनतवारी केल्यावर साडेचार हजार रुपये घेतले गेल्याचे या वृत्तात स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर शनिवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोनाचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेउपस्थित होते. पत्रकारांच्या विविध प्रश्नांना सामोरे जाताना मुश्रीफ यांना, मृत रुग्णांचे मृतदेह दोन किलोमीटर अंतरावरील अमरधाममध्ये पोहोचवायला 8 हजार रुपये मागितले जात असताना आरटीओ कारवाई का करीत नाही, असा सवाल केला गेला. त्यावर त्यांनी या विषयावर जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांना बोलण्यास सांगितले.
त्या वृत्ताची घेतली दखल
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी उत्तर देताना सांगितले की, मृतदेह नेण्यासाठी साड़ेचार हजार रुपये घेतल्याच्या त्या वृत्ताची दखल घेऊन त्याबाबत आरटीओ यांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. मृतदेहांवर योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार होण्याबाबत दक्षता घेण्याचेही मनपा प्रशासनाला सांगितले आहे. ज्यांच्याकडून रुग्णवाहिकेने 8 हजार रुपये मागून नंतर साडेचार हजार रुपये घेतले, त्यांच्याकडून याबाबत काहीही तक्रार आलेली नाही. पण प्रशासनाने त्याची दखल घेऊन आरटीओ द्वारे कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच ज्या रुग्णालयात संबंधित रुग्णाने उपचार घेतले, त्याच रुग्णालयाने त्या रुग्णाला मृत्यू झाला तर मृतदेह रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेद्वारे अमरधाममध्ये पोहचवण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे व त्यासाठी सर्व रुग्णालयांची लवकरच बैठकही घेतली जाणार आहे, असेही डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले.
COMMENTS