चौफेर फडणवीस !

Homeदेशदखल

चौफेर फडणवीस !

    Dakhal : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्णपणे बाजी पलटवली आहे. पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात कोणतीही घ

काँगे्रसमधील गोंधळ
इंडिया आघाडीची वाट बिकट
संसदेचा आखाडा

    Dakhal : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्णपणे बाजी पलटवली आहे. पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात कोणतीही घटना घडली की, त्यामागे शरद पवार आहेत, असं सर्रास बोलले जायचं. परंतु, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्राच्या अनेक घडामोडी मागे ते असतात, असं आता मोकळेपणाने बोललं जातं. मुंबईत मराठीच्या विजयासाठी ठाकरे बंधूंचा मेळावा होत असताना या दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, असं वक्तव्य माजी खासदार तथा एआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वपक्षीय राजकारणामध्ये जो प्रभाव आता निर्माण झाला आहे, तो देवेंद्र फडणवीस यांचाच आहे. त्यामुळे कोणत्याही घडामोडी मागे ते आहेत असा आता महाराष्ट्राला विश्वास वाटायला लागला. याचा अर्थ, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस एक चांगले प्रशासक जसे आहेत, तसे, एक मुत्सद्दी राजकारणी त्यांच्यामध्ये पूर्णपणे ठासून भरलेला आहे. शरद पवार यांच्या राजकारणाची चौफेर असलेली गती देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णपणे रोखली आहे आणि त्यामुळे शरद पवार यांच्या राजकारणाला महाराष्ट्र समजूनही चुकला आहे.

त्यामुळे त्यांना नवे प्रयोग काही करता येऊ शकत नाही. दुसऱ्या बाजूला ठाकरे बंधू यांचा होत असलेला विजयी मेळावा, हा राजकीय अनुषंगाने देखील महत्त्वाचा आहे. कारण, या दोघांचं एकत्र येणं म्हणजे मराठीच्या मुद्द्यावर जरी ते एकत्र आले तरी, पुढे त्या दोघांच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या राजकारणात फार मोठा काही बदल होणार नाही. परंतु, एकंदरीत मराठी माणूस आणि मुंबईत एकवटलेला परप्रांतीय किंवा इतर भाषिक माणूस या दोघांमधला समन्वय कसा करता येईल, या दृष्टीने देवेंद्र फडणवीस हे अधिक मुत्सद्दी राजकारणी आहेत. राज्य सरकारने इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीचा, त्रिभाषासूत्रीचा शासन निर्णय मागे घेतला असून यासंदर्भात समिती नेमण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे, मराठीच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार होता, तो रद्द करण्यात आला असून शिवसेना-मनसेकडून विजयी जल्लोष मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

हा मेळावा आकाराला यावा हा उद्देश साध्य झाल्याचे दिसत आहे, तसे काॅंग्रेस आणि अन्य पक्ष उध्दव ठाकरे यांच्यापासून दूर जाताना दिसत आहेत. मोर्चाचे रुपांतर विजयी मेळावा म्हणून करण्यात आलं आहे. या विजयी जल्लोषसाठी मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येत आहे. ५ जून रोजी वरळीत हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यातच, मनसैनिकांनी एका व्यापाऱ्याला मराठी न बोलण्यावर मारहाण केल्यावरुन इतर व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. तर, मुंबईत राहायचं असल्यास मराठी आलं पाहिजे, अशी मनसेची भूमिका आहे. मात्र, एका उद्योजकाने ट्विट करुन थेट राज ठाकरेंनाच डिवचलं आहे. 

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगले विचार मांडले. ते म्हणतात की,भाषेवरून मारहाण करणे चुकीचे आहे. महाराष्ट्रात राहून मराठी बोलली पाहिजे, हा आग्रह चुकीचा नाही. भाषेवरून एखाद्या व्यापाऱ्याला मारहाण करणे चुकीचे असल्याचे स्पष्ट शब्दात सांगताना देवेंद्र फडणवीस दिसले. आपली मराठी माणसे देखील इतर राज्यात व्यापार करायला जातात. त्यांना देखील तिथली भाषा येत नाही, तिथे त्यांना मारहाण होते का? अशाप्रकारे गुंडगिरी होणार असेल तर कारवाई ही केली जाईल, असा थेट इशाराच फडणवीसांनी दिला आहे.

COMMENTS