चक्क भिकारी व अल्पवयीन मुलांच्या नावावर लाखोंचे कर्ज…;शेवगाव नगर अर्बन बँक बनावट सोने तारण घोटाळ्याच्या सुरस कथा चर्चेत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चक्क भिकारी व अल्पवयीन मुलांच्या नावावर लाखोंचे कर्ज…;शेवगाव नगर अर्बन बँक बनावट सोने तारण घोटाळ्याच्या सुरस कथा चर्चेत

अहमदनगर/प्रतिनिधी : बसस्थानकावर भीक मागून उदरनिर्वाह करणार्‍या वयोवृद्ध व्यक्तीच्या नावावर 92 हजाराचे तर 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाच्या नावावर 1 लाख

अहमदनगर : रोहित पवार यांच्या स्वराज्यध्वज पूजन यात्रेचे पेमगिरी किल्ल्यावर पूजन
रेखा जरे हत्याकांड : आरोपी बाळ बोठेचा जामिनासाठी अर्ज l LokNews24
कोरोना काळात आर्थिक संकट ओढवलेल्या महिलांना शिलाई मशीनचे वाटप

अहमदनगर/प्रतिनिधी : बसस्थानकावर भीक मागून उदरनिर्वाह करणार्‍या वयोवृद्ध व्यक्तीच्या नावावर 92 हजाराचे तर 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाच्या नावावर 1 लाख 60 हजाराचे सोनेतारण कर्ज बनावट कागदपत्रांच्या आधारे उचलण्याचा प्रकार नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील सोनेतारण घोटाळ्यात घडला आहे. या सर्वांवर गुन्हा दाखल झाल्याने व त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू झाल्याने या मंडळींना आपल्या नावावर असलेल्या लाखोंच्या कर्जाची माहिती झाली. पण त्याच्याशी काही संबंध नसल्याने आता त्यांच्या नशिबी मात्र न्यायालयाचे खेटे मारणे आले आहे. या प्रकरणी नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे गोल्ड व्हॅल्युअर दहीवाळकर याच्यासह 159 कर्जदारांच्या विरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्यामुळे त्यांची अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी धावाधाव सुरू आहे. गोल्ड व्हॅल्युअर दहिवाळकर याने काही दलालांना हाताशी धरून तसेच काही गरजू, गोरगरीब व निरक्षर लोकांना पैशाचे आमिष दाखवून तर कधी विविध शासकीय योजनेद्वारे आर्थिक मदत मिळवून देण्याच्या बहाण्याने जाळ्यात ओढले असावे अशी धक्कादायक माहिती या प्रकरणातील कर्जदारांचे वकील अ‍ॅड. दीपक शामदिरे यांनी दिली. नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील बनावट सोने तारण घोटाळ्याशी बँकेचे संचालक मंडळ, बँक मॅनेजर, बँक अधिकारी, कर्मचारी व गोल्ड व्हॅल्युअर दहिवाळकर यांचा संबंध आहे. आता गुन्हा दाखल झाल्याने व अटकपूर्व जामीनासाठी शेवगाव न्यायालयात कर्जदारांच्या चकरा वाढल्याने या प्रकरणातील बोगस कर्जदारांच्या थक्क करणार्‍या एकेक सुरस कथा तपासाअंती समोर येत आहेत. या प्रकरणात बस स्टॅन्ड वर भीक मागून आपली उपजीविका भागविणार्‍या गुलाब लाला शेख या वयोवृद्ध व्यक्तीचे आधारकार्ड, फोटो व इतर कागदपत्रे परस्पर वापरून त्याच्या नावावर 92 हजार रुपयांचे कर्ज 2017 साली उचलले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याच्याविरुद्ध बँकेने फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदवला असून गुलाब शेख यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी नगरच्या न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच बरोबर शेवगाव तालुक्यातील मजले शहर येथील असिफ अहमद पठाण या अवघ्या 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाच्या नावावर देखील 1 लाख 60 हजार रुपयांचे कर्ज 2017 साली उचलण्यात आले आहे. त्याच बरोबर शेवगाव तालुक्यातील मळेगाव येथील अमोल मच्छीन्द्र निकम यांच्या नावावरही गुन्हा दाखल झाला असून आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल जोंधळे यांनी अमोल निकम यांना हजर राहण्याबाबतचे समज पत्र शेवगावचे बँकेचे शाखाधिकारी अनिल आहुजा यांच्या फिर्यादीवरून पाठविले आहे. राजेंद्र पानसंबळ यांनी कर्जासाठी तारण ठेवलेल्या सोन्याच्या वजनापेक्षा जास्त वजनाची नोंद गोल्ड व्हॅल्युअरने बँकेतील अधिकारी व कर्मचार्‍यांना हाताशी धरून केली असून पानसंबळ यांची काहीही चूक नसताना बँकेने त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून नोटीस पाठवली आहे. त्याबाबत अ‍ॅड. शामदिरे यांनी त्यांची बाजू मांडून पानसंबळ यांना तात्पुरता जामीन मिळवून दिला आहे. (अन्य वृत्त पान 8 वर)

30 जणांचे अर्ज दाखल
बनावट सोनेतारण कर्ज प्रकरणातील गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे अनेकांनी अटक पूर्व जामिनासाठी धाव घेतली. मात्र, ज्या गोरगरीब लोकांकडे वकिलाची फी देण्याइतके सुद्धा पैसे नाहीत, असे लोक हवालदिल झाले होते. त्यांच्या मदतीला अ‍ॅड. शामदिरे यांच्यासह अ‍ॅड. किरण जाधव व अ‍ॅड. शिवाजी कराळे ही वकील मंडळी धावून आली आहेत. अद्यापपर्यंत सुमारे 30 जणांचे अटक पूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केले आहेत.

COMMENTS