अहमदनगर/प्रतिनिधी - नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगात येऊ लागली असून, या बँकेत संचालक म्हणून येण्याची तयारी काही घोटाळेबाजांनी सुरू केल्या
अहमदनगर/प्रतिनिधी – नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगात येऊ लागली असून, या बँकेत संचालक म्हणून येण्याची तयारी काही घोटाळेबाजांनी सुरू केल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे प्रमुख व माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी, श्रीगोंदा परिसरात प्रचार करत फिरत असलेल्या टोळीला बँक बचाव समिती चँलेंज (आव्हान) देत आहे. समोरासमोर पत्रकार परिषद घ्यायला या, सगळी पोलखोल समोरासमोर करतो, असे आव्हान दिले आहे. आता हे आव्हान या मंडळींकडून स्वीकारले जाते की नाही, याची उत्सुकता व्यक्त होत आहे.
नगर अर्बन बँकेच्या 18 जागांसाठी 28 नोव्हेंबरला निवडणूक होत आहे. सध्या प्रारुप मतदार यादी अंतिम करण्याचे काम सुरू आहे. एकीकडे ही प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे राजकीय हालचालीही जोरात सुरू आहेत. मागील सत्ताधार्यांचे समर्थक तसेच बँक बचाव कृती समितीचे समर्थक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत व त्यावरून सोशल मिडियात त्यांच्यात घमासान आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर बँक बचाव कृती समितीचे प्रमुख व माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी सोशल मिडियातून सत्ताधारी समर्थकांना आव्हान दिले आहे.
सोशल मिडियातील या पोस्टमध्ये गांधी यांनी म्हटले आहे की, आता नगर अर्बन बँकेची जास्तच काळजी वाटायला लागली आहे. नगर अर्बन बँकेच्या येणार्या निवडणुकीत पॅनेल उभे करायचे म्हणून काही मंडळी नुकतीच श्रीगोंदा गावाचे परिसरात भेटीगाठी व बैठका घेत असल्याचे फोटो सोशल मीडियाला झळकले. ते फोटो व सोशल मीडिया तसेच वर्तमान पत्रातील बातम्यांमधील नावे वाचल्यावर नगर अर्बन बँकेची जास्तच काळजी वाटायला लागली. कारण या व्यक्तींमधील एकाने नगर अर्बन बँकेकडून 2014 व 2018 ला प्रत्येकी 5 कोटी व 4 कोटी कर्ज घेताना आपले तारण मालमत्तेचे बोगस मूल्यांकन रिपोर्ट सादर करून बँकेची फसवणूक केली म्हणून नगर अर्बन बँकेने श्रीगोंदा पोलीस स्टेशन, अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक व भारतीय रिझर्व बँकेकडे लेखी तक्रार दिलेली आहे. दुसर्या व्यक्तीच्या मालमत्तेवर नगर अर्बन बँकेची 4 कोटीचे वसुलीकरिता बँकेने सिम्बॉलिक ताबा घेतलेला आहे. तसेच या व्यक्तीकडे बँकेचे वाहन कर्जाची पण मोठी थकबाकी आहे. तिसरी व चौथी व्यक्ती अहमदनगर मधील एका पतसंस्थेचे चेअरमन व संचालक होते. या व्यक्तींच्या पतसंस्थेच्या कारभारावर सहकार खात्याने खूप गंभीर आक्षेप घेत ही पतसंस्था अवसायनात काढली. 1997 ला स्थापन झालेली ही पतसंस्था 2015 ला बंद पडली. एका व्यक्तीने नगर अर्बन बँकेतील कर्जदारांकडून 25 लाख, 50 लाख अशा मोठ्या रक्कमा वारंवार स्वीकारल्याबद्दल भारतीय रिझर्व बँकेने गंभीर ताशेरे ओढलेले आहेत, असे सांगून गांधी यांनी पुढे म्हटले आहे की, यातील एका व्यक्तीने स्वतःच्या पतसंस्थेच्या थकीत कर्जदाराकडील कोट्यावधीची वसुलीकरिता नगर अर्बन बँकेत मोठे कर्जप्रकरण करून आपल्या पतसंस्थेची वसुली करून घेतली व नगर अर्बन बँकेची थकबाकी वाढवली. तसेच यातील काही व्यक्ती या नगर अर्बन बँकेची कोट्यावधीच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी असून अटकपूर्व जामीनामुळे बाहेर फिरत आहेत. आता हे सर्व घोटाळेबाज टोळके नगर अर्बन बँकेत पॅनेल करणार म्हणजे आता बँक बचाव समितीची व बँकेच्या सभासदांची जबाबदारी खूप वाढली आहे. ही घोटाळेबाज मंडळी बँकेला वाचविणेसाठी नव्हे तर स्वतःच्या घोटाळ्यांचे पुरावे नष्ट करण्यासाठी बँकेत येवू ईच्छीत आहेत, हे सांगायला ज्योतिष पाहणेची गरज नाही. परंतु श्रीगोंदा परिसरात प्रचार करत फिरत असलेल्या टोळीला बँक बचाव समिती चॅलेंज देत आहे. ही लिहलेली पोस्ट खोटी आहे असे समोरासमोर पत्रकार परिषद घेवून सांगा, सगळी पोलखोल समोरासमोर करतो, असे आव्हान देऊन गांधींनी पुढे म्हटले आहे की, आम्हाला कोणाचे नाव घेवून टीकाटिप्पणी करायची नाही, परंतु नगर अर्बन बँकेला लुटायचा इरादा घेवून कोणी कट कारस्थान करत असेल तर सभासदांसमोर सगळी पोलखोल नक्की करु, असा इशाराही त्यांनी दिला.
जीवाला धोका होऊ शकतो
बँक बचाव समिती गेल्या पाच वर्षापासून सातत्याने या भ्रष्टाचारी प्रवृत्तीविरूद्ध लढत आहे. ही मंडळी भ्रष्टाचारी आहेत, हे रिझर्व बँकेने वेळोवेळी केलेल्या कारवाईतून सिध्द झालेले आहे. या भ्रष्टाचारी मंडळींच्या हस्तकांनी बँक बचाव समितीच्या प्रमुखांवर शारीरिक हल्ले देखील केले, परंतु हे सर्व सहन करत बँक बचाव समिती घरी बसून न राहता बँक वाचविण्यासाठी संघर्ष करत राहिली आहे व आता बँक बचाव समितीची जबाबदारी आणखी वाढली आहे. हे सर्व लिहिल्यामुळे माझ्यावर पुन्हा हल्ले होवू शकतात, कदाचित माझ्या जीवाला धोका होवू शकतो, अशी भीती व्यक्त करून गांधींनी यात म्हटले आहे की, परंतु मी माझे सहकार्यांना कागदपत्रे दाखविली आहेत. त्यामुळे ते पण ही पोलखोल करू शकतात. नगर अर्बन बँकेची भ्रष्टाचारी मंडळींनी केलेली हालत पाहून व बँकेबद्दल काळजी वाटून बँक वाचविण्यासाठीची धास्ती घेवून (स्व.) सुवालालजी गुंदेचा यांनी ऑक्टोबर 2018 ला प्राण सोडले होते. आम्ही त्यांचेच चेले आहोत, नगर अर्बन बँक वाचविण्यासाठी आम्ही बलिदान देण्यास तयार आहोत, असेही गांधींनी आवर्जून स्पष्ट केले.
हरकती निघाल्या निकाली
नगर अर्बन’च्या प्रारूप मतदार यादीवर अवघ्या चार हरकती आल्या होत्या व त्या सर्व हरकती निकाली निघाल्या असून, अंतिम यादीत 55991 मतदार आहेत. संचालक मंडळ निवडणुकीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करून त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी हरकती मागविल्या होत्या. या यादीवर केवळ चार हरकती आल्या होत्या. त्यात एका शाखेतील नाव दुसर्या शाखेत गेल्याचे तसेच पत्त्यांबाबत हरकतींचा समावेश होता. त्यावर आहेर यांनी सुनावणी घेत त्या निकाली काढल्या. बँकेच्या अंतिम मतदार यादीत 55 हजार 991 मतदारांचा समावेश आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी 26 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. उमेदवारी अर्ज इच्छुकांना विनामूल्य उपलब्ध करण्यात येणार आहेत.
COMMENTS