नवीन वर्षात देशभरात घरांच्या विक्रीमध्ये 64 टक्के वाढ झाली आहे. नवीन प्रकल्पांमध्येही 65 टक्के वाढ आहे.
मुंबई / प्रतिनिधी : नवीन वर्षात देशभरात घरांच्या विक्रीमध्ये 64 टक्के वाढ झाली आहे. नवीन प्रकल्पांमध्येही 65 टक्के वाढ आहे. त्याचवेळी पश्चिम भारत हा भविष्याबाबत सकारात्मक असल्याने एका सर्वेक्षणात समोर आले आहे. नाईट फ्रँक, फिक्की व नरेडको या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने केलेल्या सर्वेक्षणातून हे उघड झाले आहे.
या सर्वेक्षणात देशातील एकूण आर्थिक स्थितीचा क्षेत्रनिहाय 2020 या संपूर्ण कॅलेंडर वर्षाचा व जानेवारी-मार्च 2021चा अभ्यास मांडण्यात आला आहे. त्यानुसार, मागील जानेवारी-मार्च महिन्यात देशातील नवीन प्रकल्प फक्त 18 टक्क्यांनी वाढले. त्यानंतर देशात कोरोनाची स्थिती होती; मात्र तरीही सप्टेंबरअखेरपर्यंतच्या दोन तिमाहीत नवीन निवासी प्रकल्पांत 23 व 50 टक्क्यांची वाढ झाली. ऑक्टोबर-डिसेंबर 2020 मध्ये तर ही वाढ 76 टक्के होती. त्यानंतर या वर्षी जानेवारी-मार्चदरम्यान त्यात 65 टक्के वाढ झाली. या सर्व कालमर्यादेत घरांच्या विक्रीतही मागील जानेवारी-मार्चदरम्यान 19 टक्केच वाढ झाली होती. जुलै-सप्टेंबरदरम्यान 66 टक्के व ऑक्टोबर-डिसेंबरदरम्यान 77 टक्के वाढ नोंदवली गेली. त्यानंतर यावर्षी मार्चअखेरपर्यंत 64 टक्के वाढ झाली. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रात मुद्रांक शुल्क कपात झाल्याचा फायदा झालेला दिसला. रिअल इस्टेट विश्वातील भविष्याच्या एकूण सकारात्मकतेचा विचार केल्यास, जानेवारी-मार्चदरम्यान पश्चिम भारतात ही सकारात्मकता 53 टक्के होती. त्याआधी ऑक्टोबर-डिसेंबरदरम्यान ती 66 टक्के व त्याआधी देश टाळेबंदीमधून बाहेर पडतानादेखील 47 टक्के होती. या वर्षीची मार्चअखेरची ही सकारात्मकता पूर्व भारतात 53 टक्केच होती; परंतु उत्तर भारतात 56 व दक्षिण भारतात 63 टक्के आहे. ’रिअल इस्टेट हे 270 सहयोगी उद्योगांना हातभार लावणारे क्षेत्र आहे. यामुळेच या क्षेत्रात सकारात्मकता असणे अत्यावश्यक आहे. ही सकारात्मकता या अहवालात दिसत असून हे खूप आशादायी चित्र आहे’, असे मत याबाबत नरेडको नॅशनलचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी व्यक्त केले आहे.
COMMENTS