राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
मुंबई/प्रतिनिधीः राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मंगळवारी साजर्या होणार्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. कोणतीही मिरवणूक अथवा मोटारसायकल रॅली काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.
मराठी नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे; पण यंदा गुढीपाडवा हा घरातच साजरा करावा लागणार आहे. गेल्या वर्षी राज्यात कोविड या संसर्गजन्य रोगाचा झालेला प्रादुर्भाव विचारात घेऊन आजपर्यंत झालेले सण/उत्सव हे अत्यंत साध्या पद्धतीने लोकांनी एकत्र न जमता साजरे केलेले आहेत. सध्या कोरोनाच्या संसर्गाच्या प्रमाणात गेल्या वर्षी पेक्षा जास्त वाढ होत आहे. त्यामुळे या वर्षी गुढीपाडवा हा सण कोविड- 19 चा वाढता प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्ट्टीने अत्यंत साधेपणाने सकाळी साजरा करणे अपेक्षित आहे. राज्यात काही ठिकाणी गुढीपाडवा हा सण पारंपारिक वेशभूषा परिधान करून तसेच सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करून नवीन वर्ष म्हणून साजरा करण्यात येत असतो. कोविड- 19 या विषाणूचा वाढता फैलाव रोखण्याच्या दृष्टीने या वर्षी गुढीपाडव्यानिमित्त पालखी, दिंडी, प्रभात फेरी, बाईक रॅली मिरवणुका काढण्यात येऊ नयेत तसेच कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी एकापेक्षा अधिक लोकांनी एकत्र न येता सामाजिक अंतर भानाचे काटेकोरपणे पालन करून घरगुती गुढी उभारून हा सण अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात यावा, असे आवाहन राज्य सरकारच्या वतीने करण्यात आले आहे.
COMMENTS