Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खडसेंसाठी इकडे आड तिकडे विहीर !

महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप तळागाळामध्ये रूजवण्याचे, पक्षसंघटन करण्याचे खरे श्रेय भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना जाते. त्याचबरोबर गोपी

केंद्राविरुद्ध दिल्ली संघर्ष पेटणार
चीनचा घुसखोरीचा डाव
शेतकरी आंदोलनाचा भडका

महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप तळागाळामध्ये रूजवण्याचे, पक्षसंघटन करण्याचे खरे श्रेय भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना जाते. त्याचबरोबर गोपीनाथरावांनी जी दुसरी फळी निर्माण करून महाराष्ट्रात भाजप रूजवली त्यामध्ये एकनाथ खडसे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. खरंतर 2014 मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर आपण मुख्यमंत्रीपदाचे खरे दावेदार असून, या पदावर आपलाच हक्क असल्याचा दावा करून खडसे यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीवर धोंडा पाडून घेतला. कारण खडसे मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार असल्यामुळे त्यांचे प्रस्थ वाढू नये, यासाठी पुरेपूर काळजी घेत, त्यांचे पंख छाटण्याचे काम करण्यात आले. त्यासाठी भोसरी जमीन घोटाळा उघड करण्यात आला. विशेष म्हणजे राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असतांना खडसे यांना अभय देणे भाजपला सहजशक्य होते, मात्र त्यांचे राजकीय पंख छाटण्यासाठीस हा उपक्रम राबवण्यात आला. त्यानंतर खडसे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले. आमदार झाले, मंत्रीही झाले असते, मात्र महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना एकनाथ खडसे यांच्या मदतीची गरज होती. आणि नाथाभाऊंनी देखील तत्परता दाखवत राष्ट्रवादीचा राजीनामा दिला, आणि केंद्रात अमित शहा आणि जे.पी.नड्डा यांची भेट घेतली. तसेच पुढील काही दिवसांत आपला भाजपप्रवेश राजधानी दिल्लीत होणार असल्याचे नाथाभाऊंनी पत्रकार परिषद घेवून सांगितले. त्यानंतर ते आजपर्यंत नाथाभाऊंचा भाजपप्रवेश झालेला नाही. राज्यात भाजपला मोठे खिंडार पडले असतांना त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे निवडून आल्या, त्यांना केंद्रात राज्यमंत्री पद देखील देण्यात आले, मात्र नाथाभाऊंना पक्षात सामावून घेतले नाही. याला प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचा असलेला प्रखर विरोध होय. नाथाभाऊंनी गुरूवारी माध्यमांसमोर आपल्या भाजप प्रवेशाला गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांचा विरोध असल्याचे स्पष्ट केले. शिवाय महाराष्ट्रातील दोन नेते जे.पी. नड्डांपेक्षा मोठे आहेत का, असा सवाल देखील त्यांनी केला आहे. वास्तविक पाहता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सपाटून मार खावा लागला. चारशेपारचा नारा देणारी भाजप 239 जागांवर अडकली. त्यातही महाराष्ट्रात बेकार परिस्थिती. अशावेळी भाजप पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते खडसे यांना सामावून घेतील आणि पक्षातील अंतर्गत वाद मिटवतील असे वाटले होते, मात्र गिरे, तो भी टांग उरप, अशीच राज्यातील भाजपची परिस्थिती दिसून येते. त्यामुळे खडसे यांचा राजकीय वनवास संपणार नसल्याचे दिसून येत आहे. खरंतर खडसे यांना भाजपमध्ये घेवून त्यांना राज्यपालपदी नियुक्त करणार असल्याच्या राजकीय वल्गना सुरू होत्या, मात्र त्यांचा राजकीय प्रवेशच अंधातरी दिसून येत आहे. त्यात खडसे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये जाण्याचे संकेत दिले आहे. मात्र त्यामुळे खडसे यांची राजकीय विश्‍वासार्हता कमी होतांना दिसून येत आहे. कारण खडसे यांची विश्‍वासार्हता संपल्यागत जमा आहे. त्यामुळे खडसे यांना भाजपही जवळ करेना आणि राष्ट्रवादी काँगे्रसदेखील विश्‍वासार्ह नेता मानण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. कारण खडसे यांना सोबत घेण्याची चूक होती, असे संकेत खुद्द शरद पवारांनीच दिले होते. खडसेंच्या चाल-ढकल स्वभावामुळे शरद पवारांची जळगावची जागा पडली, असेच त्यातून दिसून येते. त्यामुळे शरद पवार गट त्यांना सहजा-सहजी पक्षात प्रवेश देण्याची शक्यता तशी कमीच आहे. त्यामुळे खडसेंचा राजकीय वनवास लवकर संपणार नाही, असेच दिसून येत आहे. राजकारणात जर-तर या शब्दांना महत्व नसते. राजकारणात स्पष्ट आणि परखड भूमिका घेवून आपली चाल चालून मोकळे व्हायचे असते. शिवाय आपला शत्रू कोण आणि आपला मित्र कोण, हे चाणाक्षपणे हेरता आले पाहिजे. मात्र स्पष्ट भूमिका न घेतल्यामुळेच आज खडसे राजकीय वनवासात असल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS