सध्या आयपीएल क्रिकेट स्पर्धा जोरदार चालू आहे. त्यामध्ये क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा लावण्याचे प्रकार घडू लागले आहेत.
पुणे/प्रतिनिधीः सध्या आयपीएल क्रिकेट स्पर्धा जोरदार चालू आहे. त्यामध्ये क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा लावण्याचे प्रकार घडू लागले आहेत. ते खेळणार्यांवर पोलिसांची करडी नजर असून पिंपरीत कारवाई करण्यात आली. त्या वेळी खेळणार्यांकडून पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आकुर्डी येथे शुक्रवारी रात्री ही घटना घडली.
श्रीपाद मोहन यादव (वय 22, रा. आकुर्डी), अमित रामपाल अगरवाल (वय 35, रा. निगडी), नितीश रामदास काळे (वय 21, रा. आकुर्डी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह किशोर रेहाल उर्फ किशोर भाई (रा. चेंबूर, मुंबई) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक विजय तेलेवार यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या संघांदरम्यानच्या सामन्यावर आरोपी हे लोटस ऑनलाइन सट्टा हा जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाला मिळाली. पोलिसांनी आकुर्डी परिसरात सापळा लावून कारवाई केली. त्या वेळी आरोपी ऑनलाइन सट्टा खेळत असताना दिसले. त्याच क्षणी पोलिसांनी त्यांना पकडले; परंतु त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की करत गडबड, गोंधळ आणि दहशत केली. पोलिसांना मारहाण केली. पोलिस करत असलेल्या सरकारी कामात आरोपींनी अडथळा निर्माण केला.
COMMENTS