कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन निर्मिती करायचीय,  पण….काष्टीच्या उद्योजकाला कच्चा मालच मिळेना

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन निर्मिती करायचीय, पण….काष्टीच्या उद्योजकाला कच्चा मालच मिळेना

कोरोना रुग्णांना सध्या ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याने केवळ त्यांच्यासाठी म्हणून ऑक्सिजन निर्मिती करण्याची तयारी श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील भूषण मुनोत यांची आहे, पण त्यांना ऑक्सिजन निर्मितीसाठी आवश्यक कच्चा मालच मिळत नाही.

जिल्हा परिषदेवर आज थाळी-लाटणे मोर्चा
माळढोक संपवण्यामध्ये अजित पवार, बबनराव पाचपुते मुख्य सूत्रधार
स्नेहलताताई कोल्हे यांची दिवाळीची खरेदी स्थानिक बाजारपेठेत

अहमदनगर/प्रतिनिधी- कोरोना रुग्णांना सध्या ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याने केवळ त्यांच्यासाठी म्हणून ऑक्सिजन निर्मिती करण्याची तयारी श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील भूषण मुनोत यांची आहे, पण त्यांना ऑक्सिजन निर्मितीसाठी आवश्यक कच्चा मालच मिळत नाही. याबाबत त्यांनी श्रीगोंदे तालुका प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाकडेही संपर्क साधून ऑक्सिजन निर्मितीची तयारी दाखवली व फक्त कच्चा माल म्हणजे लिक्विड ऑक्सिजन मिळवून देण्याची विनंती केली, पण कोणाकडूनही त्यांना सकारात्मक प्रतिसाद नाही. त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत.

याबाबतची माहिती अशी की भूषण मुनोत यांची काष्टी येथे मुनोत इंडस्ट्रियल गॅसेस ही कंपनी आहे. औद्योगिक उत्पादनासाठी लागणार्‍या ऑक्सिजनची निर्मिती ते करतात. परंतु सध्या कोवीड रुग्णांना सुरळीत ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी इंडस्ट्रियल ऑक्सिजन सप्लाय बंद आहे. त्यामुळे त्यांची कंपनीही 15  दिवसांपासून बंद आहे. तर दुसरीकडे श्रीगोंद्यासह जिल्हाभरात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यांना ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यामुळे आपला बंद कारखाना पुन्हा सुरू करून तेथे केवळ कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन निर्मिती करण्याची त्यांनी तयारी दाखवली आहे. त्यासाठी आवश्यक असलेले अन्न व औषध प्रशासनाचे परवाना पत्रही त्यांना मिळाले आहे. अशा स्थितीत त्यांना आता फक्त कच्चामाल म्हणून लिक्विड ऑक्सिजनची गरज आहे, परंतु तो त्यांना मिळत नाही.

नगर, बारामती, पुणे येथेही येथे लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. परंतु श्रीगोंद्याच्या मुनोत यांच्या मागणीची कुणीही दखल घेत नाही. त्यांना लिक्विड ऑक्सिजन मिळत नाही. रुग्णांची वाढती संख्या पाहता नगरसह श्रीरामपूर, श्रीगोंदा, शिरूर, राहुरी, पारनेर, पारगाव अशा बहुतांश ठिकाणाहून ऑक्सिजन सिलेंडरची मागणी आहे, श्रीगोंद्यात रोज 300 ऑक्सिजन सिलेंडर लागतात. परंतु केवळ लिक्विड ऑक्सिजन मिळत नाही म्हणून मुनोत याना ऑक्सिजन निर्मिती करता येत नसल्याने ते हतबल झाले आहेत. लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा करणार्‍या आयनॉक्स, लिंडे, प्रॅक्झर अशा मल्टीनॅशनल कंपन्या चाकण परिसरात आहेत. त्या राज्यभर लिक्विड ऑक्सिजन पुरवठा कमर्शियल व मेडिकल वापरासाठी करतात, परंतु त्यांना मागणी करूनही त्यांच्याकडून मुनोत त्यांच्या इंडस्ट्रीला लिक्विड ऑक्सिजन मिळत नाही. यासंदर्भात मुनोत यांनी अन्न व औषध प्रशासन अधिकारी व श्रीगोंदा तहसीलदार यांच्याकडे प्रस्ताव दिला आहे. केवळ श्रीगोंदा तालुक्यातील कोरोना रुग्णांना तरी ऑक्सिजन पुरवण्यासाठी लिक्विड ऑक्सिजन द्यावा, असे त्यांचे म्हणणे आहे परंतु त्यासाठीही त्यांना लिक्विड ऑक्सिजनचा कच्चामाल मिळत नाही.

एकीकडे कमर्शियल मागणीचा लिक्विड ऑक्सिजन पुरवठा बंद करून केवळ कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन निर्मिती केली जात असली तरी तीही कमी पडू लागली आहे. अशा स्थितीत नगर जिल्ह्यातील एक युवा उद्योजक सामाजिक भावनेतून केवळ कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन निर्मिती करू इच्छितो. मात्र, लालफितीचा कारभार त्याला मदतीचा हात द्यायला तयार नाही. तर दुसरीकडे कोरोना रुग्णांचे ऑक्सिजन मिळत नसल्याने होत असलेले हाल पाहून आणि मृत्यूचे वाढलेले प्रमाण पाहून समाजमन अस्वस्थ होत आहे.

—-

फोटो ओळी

COMMENTS